मुंबईत बोलवून फसवणूक; तरी ‘चमकला’ शरत सोनू
चार वर्षांनंतर शरत गावी परत आला होता. सगळं बऱ्यापैकी बदललेलं होतं. एवढं की, आपल्या छोट्या भावालाही शरतनं सुरुवातीला ओळखलं नाही. शरतच्या(Sharat Sonu) चेहऱ्यावर आता समाधान होतं. कारण, ‘कुछ बनने तक मैं वापिस नही आऊंगा’ अशी प्रतिज्ञा त्यानं घेतली होती. ती पूर्ण केल्यानंतरच त्यानं गावात पाऊल ठेवलं होतं. घरचे, शेजारचे त्याला बघण्यासाठी, त्याचं स्वागत करण्यासाठी गोळा झाले होते. इथं त्यानं आणखी एक प्रतिज्ञा घेतली, ‘अब इन की नजरों में मुझे और उपर उठना हैं.’
शरत सोनू (Sharat Sonu) छोट्या व मोठ्या पडद्यावरचा सुपरिचित चेहरा. ‘आयडिया’, अजय देवगणसोबतची ‘महिंद्रा’ अशा सत्तरवर जाहिराती, ‘झोंबिवली’, ‘सुपर ३०’, ‘कागज’ असे कित्येक चित्रपट त्याच्या नावावर आहेत. एका ऑडिशनच्या नावाने फसवला गेलेला शरत मुंबईत छोट्या वयातच दाखल झाला. खूप हाल झाले. मात्र, काहीतरी बनल्याशिवाय गावी परत जायचं नाही, असा निश्चय त्यानं केला. खरंतर त्या फसवणुकीचा त्याला फायदाच झाला. कठोर मेहनतीच्या भरवशावर आज यशस्वी वाटचाल करणाऱ्या शरतची कथा रोचक, तेवढीच इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
बिहारच्या पाटण्यात शरतचा जन्म झाला. वडील संजय सिंग रेल्वेत नोकरीला तर आई मीना गृहिणी. बालपणापासूनच कलाक्षेत्रात जाण्याची स्वप्न पाहणारा शरत गावात छोट्या फिल्म्स, टेलिफिल्म्समधून कामं करायचा. बारावीची परीक्षा नुकतीच आटोपली होती. रांचीत एका चित्रपटासाठी ऑडिशन असल्याचं कुठंतरी पाहण्यात आलं. तिथं जायचं तर घरून विरोध होणार होता. म्हणून तो व त्याचे मित्र लपूनच रांचीत गेले.ऑडिशनसाठी ज्या घराचा पत्ता दिला होता, तिथलं वातावरण विचित्रच होतं. गावाच्या दूर घर. दारांना कुलुपं लागलेली होती. तिथं एका खोलीत एका महिलेला कोंडून ठेवलं होतं. माहिती काढली असता, ती मनोरुग्ण व ऑडिशन घेणाऱ्याची पत्नी असल्याचं कळलं. ऑडिशनसाठी बरेच लोक आले होते. प्रक्रिया आटोपल्यानंतर आयोजकानं सांगितलं, ‘तुमच्यापैकी एकच जण सीलेक्ट झालाय, तो म्हणजे शरत सोनू (Sharat Sonu).’ बाकीचे नाराज होऊन परत गेले. मात्र, ‘ज्या मित्राच्या मदतीनं इथवर आलो, त्याला सीलेक्ट करा’, असं शरतनं सांगून पाहिलं. आयोजकानं नकार दिला.
‘मनोज वाजपेयीसोबत ‘माटी’ नावाचा चित्रपट करत आहोत. त्याच्यासोबत तुझी भूमिका असेल. मुंबईला फ्लाइटनं जावं लागेल. कामाचे १ लाख ८० हजार रुपये मिळतील’, असं आयोजकानं शरतला सांगितलं. १ लाख ८० हजारांचा विनासहीचा चेक दिला. सायनिंग अमाउंट म्हणून दीड हजार रुपयेही दिले. आठवडाभरानंतर मुंबईला जाण्याचं ठरलं.शरत मोठ्या खुशीत गावी आला. घरच्यांना सांगितलं. वडिलांनी सुरुवातीला त्याला डोक्यापासून पायापर्यंत निरखून पाहिलं. त्यावेळी आईवडिलांनी शरतला दिल्लीला ग्रॅज्युएशनसाठी पाठवायचं ठरविलं होतं. ‘दिल्लीत जा, तिथं आधी थिएटर वगैरे कर. मग मुंबईचा विचार कर’, असं वडिलांनी सांगून पाहिलं. मात्र, हवेत असलेला शरत मुंबईला जाण्यावर ठाम होता. शेवटी घरच्यांनी परवानगी दिली. पोराची चित्रपटासाठी निवड झाली, एवढ्या मोठ्या रकमेचा चेकही मिळाला म्हणून गावातही मोठी चर्चा अन् अप्रूप होतं. आठवडाभरानंतर शरतनं त्या आयोजकाला फोन केला. त्यानं सांगितलं, ‘मैं तो मुंबई पहुँच गया हूँ. तुम ट्रेन से आ जाओ. यहाँ आने पर तुम्हे मैं फ्लाइट के पैसे दे दूँगा.’ शरत आपला मित्र विनोदसह मुंबईला जायला निघाला. त्यावेळी कित्येक गावकरी त्याला स्टेशनवर सोडायला आले होते. शरतला औक्षण वगैरे करण्यात आलं. ‘तकदीर हो तो शरत सोनू जैसी’ वगैरे बोललं जाऊ लागलं.
मुंबईत आठवले देव
शरत व विनोद मुंबईत दाखल झाले. दादरच्या एका लॉजवर थांबले. लॉजची खोली म्हणजे फक्त झोपण्यापुरती जागा. उठलं तरी छत डोक्याला लागायचं. तिथं रात्र काढून शरतनं पीसीओतून त्या आयोजकाला फोन लावला. त्यानं त्याला कांदिवलीत बोलवलं. शरत कांदिवलीला गेला. तिथून फोन केला. त्यानं विचारलं, ‘इस्ट में हो या वेस्ट में?’ शरतला काही कळेना. तिथं उपस्थितांना विचारल्यावर कळलं, ते वेस्टला आहे. आयोजकानं त्याला इस्टला यायला सांगितलं. तिथं गेल्यावर शरतनं पुन्हा पीसीओतून फोन केला. आयोजकानं हनुमान मंदिर, कम्प्युटरचं दुकान वगैरे वगैरे करत खूप फिरवलं. संध्याकाळ झाली होती. शरतला काहीच कळत नव्हतं. तो आयोजक मुंबईत नाहीच, हे त्याला कळून चुकलं होतं. त्याचा मोबाइलही आता स्विच्ड ऑफ येत होता. शरतजवळ त्याच्या रांचीच्या घरचा नंबर होता. त्यानं तिथं कॉल केला. त्याच्या आईनं सांगितलं, ‘वो तो दोस्तों के साथ पार्टी करने गया हैं.’ झालं. शरत रस्त्यावर बसूनच धाय मोकलून रडायला लागला. तिथं उपस्थित लोक, विनोदनं त्याला सावरलं. दुसऱ्या दिवशी घरच्यांना त्यानं सर्व सांगितलं. वडील म्हणाले, ‘जो हुआ सो हुआ. चलता ही हैं. घर वापिस आ जाओ.’ मात्र, मुंबईत येताना गावातले जे लोक मोठ्या आशेनं स्टेशनवर सोडायला आले होते, त्यांच्यासमोर कसं जावं, असा प्रश्न शरतसमोर होता. त्यानं निश्चयानं सांगितलं, ‘नही पापा, जब तक स्क्रीन पर नही आऊंगा, घर नही लौटुंगा.’ मग सुरू झाला मायानगरीतला संघर्ष. दिवस कठीण होते. काही दिवस वडिलांनी पैसे पुरविले. मात्र, शरतच्या(Sharat Sonu) मनाला ते पटत नव्हतं. ‘आता काम मिळतंय, माझी व्यवस्था मी करू शकतो’, असं त्यानं घरी सांगितलं. प्रत्यक्षात, तसं काही नव्हतं. छोटीमोठी कामं करीत तो प्रॉडक्शन हाउसेस, दिग्दर्शकांचे उंबरठे झिजवत होता.
‘अन्वर’नं दिली ओळख
ठिकठिकाणी ऑडिशन देणं सुरू होतं. यादरम्यान नाटकांतून कामं केली. पंकज त्रिपाठीसोबतही भूमिका केल्या. त्यावेळी ‘अन्वर’साठी ऑडिशन दिलं. निवडही झाली. मात्र, नंतर कळलं की उत्तर प्रदेशकडल्या स्थानिक कलावंतांनाच संधी देण्याचं ठरलं होतं. शरतनं दिग्दर्शक मनीष झा यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. ‘खूप संघर्ष केलाय मी इथवर यायला. वाटल्यास पैसे देऊ नका, मात्र भूमिका द्या’, अशी विनवणी केली. मनीष यांनी त्याच्याविषयी जाणून घेतलं. शेवटी ती भूमिका त्याच्या वाट्याला आली. स्वप्नपूर्तीच्या दिशेनं पहिलं पाऊल पडलं होतं. ‘अन्वर’चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतरच शरतनं गावी पाऊल ठेवलं. त्यानंतर त्याला कामातून कामं मिळत गेली. जाहिराती मिळाल्या. ‘धरम संकट में’, ‘द लिजंड ऑफ मायकल मिश्रा’, ‘कागज’, ‘सुपर ३०’, ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’, ‘रोमिओ अकबर वॉल्टर’, ‘बहुत हुआ सन्मान’, आदी चित्रपटांत त्याच्या लक्षवेधी भूमिका आहेत. इम्तियाज अलीची ‘पानी पंचायत’ ही मोठ्या पातळीवरची शॉर्टफिल्म करिअरचा टर्निंग पॉइंट ठरली. मुकेश छाबरानं त्यासाठी कास्ट केलं होतं, असं शरत सांगतो.
झोंबिवली अन् मराठी
युडली फिल्म्सच्या ‘बहुत हुआ सन्मान’मध्ये शरतनं काम केलं होतं. युडलीचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर संजित सिंग यांच्या संपर्कातून ‘झोंबिवली’त भूमिका मिळाली. त्याचाही एक अजब किस्सा आहे. हा मराठी चित्रपट आहे, हे सुरुवातीला त्याला माहितीच नव्हतं. जेव्हा रीडिंगसाठी डायलॉग अन् स्क्रिप्ट आली, तेव्हा तो चाटच पडला. सगळंच मराठीत होतं अन् तेही पान पानभर. ‘हे जमणार नाही’ म्हणत त्यानं नकार दिला. मात्र, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी सांगितलं, ‘आलाच आहेस तर एकदा रीडिंग करून घे, मग बघू.’ शरतनं रीडिंग सुरू केलं, तेव्हा त्याचे मराठीतील उच्चार ऐकून सगळेच हसायला लागले. ‘असाच टोन हवा होता’, असं आदित्य यांनी सांगितलं. शेवटी प्रकाश दुबे ही भूमिका त्याच्या वाट्याला आली. त्यावेळी ललित प्रभाकर, अमेय वाघ, विजय निकम, जानकी पाठक अशा सर्वांनी सांभाळून घेतलं, मदतही केली, असं शरत सांगतो. ‘त्यावेळी माझ्या मराठी मित्रांना मी शब्द विचारू विचारू त्रास देत होतो. कित्येकांनी तर कॉल घेणंच बंद केलं होतं’, असंही तो हसून कथन करतो.
==========
हे देखील वाचा : छोट्याशा खेड्यातून ‘आंतरराष्ट्रीय’ झेप घेणारी रावी किशोर
==========
‘ते’ बरंच झालं
रांचीत ज्या कथित निर्माता, आयोजकानं ऑडिशनचा बनाव केला होता, त्याचा ‘माटी’ चित्रपटाचा प्रोजेक्ट नव्हताच. मुंबईत आल्यावर शरतनं मनोज वाजपेयी व त्याच्या पीएकडून माहिती घेतली, तेव्हा अशा कुठल्याही प्रोजेक्टविषयी बोलणं वगैरे झालंच नव्हतं, असं कळलं. मग, त्या कथित निर्मात्याचा उद्देश तरी काय होता? उलट त्यानंच दीड हजार रुपये देऊ केले होते, हॉटेलमध्ये राहायची व्यवस्थाही केली होती. मग असं का? हे प्रश्न आजही शरतच्या मनात आहेत. मात्र, त्याच्यामुळेच मी मुंबई गाठू शकलो, कुछ कर दिखाने का जज्बा त्यानंच दिला, असंही नमूद करतो.आता शरतची ‘वूट’वर वेबसीरिज येते आहे. काही चित्रपटही आहेत. एका चित्रपटात तो अमित सियालच्या छोट्या भावाची भूमिका साकारतोय. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनीसोबतची एक जाहिरात येणार आहे. पत्नी गुडिया, मुलगी रिजुल यांची त्याला चांगली साथ आहे. मनोज वाजपेयी, परेश रावल, विजय राज हे त्याचे आवडते कलावंत आहेत. शिवाय, आजोबा रामलोभित सिंग यांना तो आपला हिरो मानतो. ते शिक्षक होते. स्टोरीटेलिंगची त्यांची शैली जबरदस्त होती. त्यांच्याकडून बरंच काही शिकता आलं, असं तो सांगतो.
आयुष्यात बऱ्याच अतर्क्य गोष्टी घडत असतात. मात्र, त्यातूनही काही चांगलं घडत असतं. त्याचंच उदाहरण म्हणजे शरत सोनू(Sharat Sonu). काहीतरी बनल्यावरच आई-वडील आणि गावकऱ्यांच्या नजरेला नजर भिडवू, ही आग मनात तेवत त्यानं कठोर परिश्रमातून स्वत:ला या क्षेत्रात सिद्ध केलं. तरी तो कमालीचा नम्र आणि माणुसकीवर विश्वास ठेवणारा आहे. उस का अंदाज ही अलग हैं.
अभिषेक खुळे