‘दृश्यम’ को तो गायतोंडे चाहिये ही…
भारतीय चित्रपटसृष्टीतला ‘दृश्यम’ हा महत्त्वाचा टप्पा. अतिशय लोकप्रिय म्हणून ख्याती पावलेला हा चित्रपट आजही तेवढ्याच आवडीनं पाहिला जातो. यात विजय साळगांवकरचं पात्र जेवढं केंद्रस्थानी, तेवढंच गायतोंडे हे पात्र अतिशय महत्त्वाचं. हा गायतोंडेच ‘दृश्यम’ची कथा पुढं नेतो. आता त्याचा हिंदी सीक्वेल येतो आहे. या आगामी ‘दृश्यम-२’मध्ये खास सरप्राइज आहे, ते गायतोंडेच्याच रूपात. त्याची कथा मोठी रोचक आहे.(Story of ‘Drishyam2’)
मूळ मल्याळम सीक्वेल आधीच रिलीज झाला. त्यात नायक जॉर्ज कुट्टीची भूमिका मोहनलाल यांनी साकारलीय. तर जॉर्ज व त्याच्या कुटुंबीयांच्या मागे लागलेल्या, त्यांना छळणाऱ्या इन्स्पेक्टर सहदेवनची भूमिका कलाभवन शाजोन यांनी साकारली आहे. हिंदीत या भूमिका अनुक्रमे अजय देवगण, कमलेश सावंत यांनी साकारल्या आहेत. मूळ मल्याळम सीक्वेलमध्ये इन्स्पेक्टर सहदेवन नाही. त्यामुळे हिंदी ‘दृश्यम-२’मध्येही गायतोंडे नसणार, असंच जवळपास स्पष्ट होतं. प्रेक्षकांनाही याबाबतची चुटपूट लागली होती. मात्र, निर्माते-दिग्दर्शकांनी प्रेक्षकांना सुखद धक्का दिला.
मल्याळम ‘दृश्यम-२’ (Story of ‘Drishyam2’) बहुतांश रसिकांनी पाहिला. त्यामुळे त्याची कथा त्यांना ठाऊक झाली. मग, हिंदी ‘दृश्यम-२’मध्ये नवं ते काय असणार, असा सूर उमटत होता. मात्र, निर्माते-दिग्दर्शकांनी हट के काहीतरी करण्याचं ठरवलं. हिंदी ‘दृश्यम-२’मध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. कथेला नवी ट्रीटमेंटही देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, इन्स्पेक्टर गायतोंडेला (कमलेश सावंत) यात आणण्यात आलंय.
हे सरप्राइज आहे...
मूळ मल्याळम सीक्वेलमध्ये इन्स्पेक्टर सहदेवन नाही. त्यामुळे हिंदी सीक्वेलमध्ये गायतोंडे नाही, हे जवळपास निश्चित होतं. कमलेश सावंत यांनाही तसंच वाटलं होतं. मात्र, एक दिवस अचानक पॅनोरामा स्टुडिओजमधून को-प्रोड्युसरचा कॉल आला आणि त्यानं कमलेश यांना कार्यालयात बोलवलं. कशाला बोलवलं असेल म्हणून कमलेश यांना जरा टेन्शनच आलं. ते ‘पॅनोरामा’ला गेले. तिथं दिग्दर्शक अभिषेक पाठक आणि त्यांची टीम होती. त्यांनी सांगितलं, ‘आप का गायतोंडे का रोल फिक्स हुआ हैं.’ कमलेश यांना आश्चर्य वाटलं. ‘यात माझी भूमिका कशी काय?’, असं त्यांनी विचारलं. अभिषेक यांच्यासह सर्वजण हसत म्हणाले, ‘दृश्यम-२ची (Story of ‘Drishyam2’) घोषणा झाली, तेव्हापासून आधीच्या ‘दृश्यम’मध्ये असलेले कलाकार फोन करून करून विचारताहेत की यात माझी भूमिका असेल का… आणि तुम्ही ‘मी का?’ विचारताय…’ स्टुडिओत हशा पिकला. तेव्हा दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी स्पष्ट सांगितलं, ‘दृश्यम को तो गायतोंडे चाहियेही. गायतोंडे के बिना ‘दृश्यम’ होगी कैसे?’ सर्व प्रक्रिया पार पडल्या. कमलेश यांना त्यांचे सीन्स देण्यात आले, काम सुरू झालं. गायतोंडे या सीक्वेलचं सरप्राइज आहे, ते ट्रेलरमध्येच सर्वांना कळेल, त्याआधी जाहीर करायचं नाही, असं ठरलं. मात्र, पहिल्या ‘दृश्यम’चे दिग्दर्शक दिवंगत निशिकांत कामत यांची कमलेश यांना प्रकर्षानं आठवण झाली. कारण, निशिकांत यांच्या बहुतांश चित्रपटांत कमलेश आहेत. स्टुडिओतून बाहेर पडल्यानंतर कमलेश आपल्या गाडीत बसले अन् निशिकांत यांचे जवळचे सहकारी सचिन पाठक यांनाच फक्त ‘दृश्यम-२’मध्येही गायतोंडे साकारणार असल्याची कल्पना दिली. बाकी, ट्रेलर रिलीज होईपर्यंत हे गुपित ठेवण्यात आलं. कमलेश यांच्या ड्रायव्हरलाही ‘दृश्यम-२’च्या शूटबाबत व त्यातील गायतोंडेबाबत माहिती नव्हतं.
सात वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या…
‘दृश्यम-२’चं (Story of ‘Drishyam2’) शूटिंग आधीच्याच गोवा, हैदराबादजी रामोजी फिल्मसिटी येथे झालं आहे. सात वर्षांनंतर अजय देवगण, तब्बू, रजत कपूर, श्रीया सरन, इशिता दत्ता, मृणाल जाधव, डॉ. शरद भुताडिया, प्रथमेश परब, योगेश सोमण असे कलावंत व टीमचे काही सदस्य एकत्र आले होते. पहिल्या ‘दृश्यम’च्या शूटवेळीच्या आठवणी इथं ताज्या झाल्या. सर्वजण निशिकांत कामत यांना मिस करत होते. ‘दृश्यम-२’मध्ये अक्षय खन्नासह अन्य काही नव्या कलाकारांचा समावेश आहे. अभिषेक पाठक उत्तम दिग्दर्शक आहेत. २४ दिवसांच्या शेड्युलमध्ये त्यांच्यासोबत काम करताना मजा आली, असं कमलेश यांनी सांगितलं.
========
हे देखील वाचा : ‘सिंघम रिटर्न्स’ फेम संध्याचा अंदाज सदैव ‘स्पेशल’च
========
भूमिका उगाच घुसवलेली नाहीय…
विजय साळगांवकर व त्याच्या कुटुंबाची केस ‘दृश्यम-२’मध्ये रिओपन झाली आहे. पहिल्या ‘दृश्यम’प्रमाणेच यातही थरार आहे. मूळ मल्याळम सीक्वेलच्या तुलनेत यात बरेच बदल करण्यात आले आहेत. गायतोंडेचा प्रवेश यात महत्त्वाचा आहे. हे पात्र उगाच घुसवलेलं नाहीय. तर कथेला वेगळी वळणं देण्यासाठी ते महत्त्वपूर्ण आहे. चित्रपट पाहताना वेगळीच मजा येईल, असं कमलेश यांनी नमूद केलं. येत्या १८ नोव्हेंबर रोजी ‘दृश्यम-२’(Story of ‘Drishyam2’) प्रदर्शित होतो आहे. ‘खाकी’, ‘दीवार’, ‘फॅमिली’, ‘मुंबई मेरी जान’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘जेल’, ‘राइट या राँग’, ‘फोर्स’, ‘भूतनाथ रिटर्न्स’ अशा कित्येक हिंदी, मराठी चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या कमलेश सावंत यांचे दोन हिंदी चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.
अभिषेक खुळे