हाडाचा शिक्षक अन् जातिवंत ‘स्टार’ कलाकार : सचिन गिरी
दहा-एक वर्षांचा असेल सचिन तेव्हा. बाबा त्याला औरंगाबादच्या संत एकनाथ रंगमंदिरात नाटक पाहायला घेऊन गेले होते. तोवर त्याला नाटकाचा ‘न’ ही माहिती नव्हता. मात्र, ते रंगमंदिर पाहून तो भारावला होता. समोरचा मलमली पडदा खुणावू लागला होता. थोड्याच वेळात तिसरी घंटा वाजली अन् पडदा उघडला. समोर पाहतो तर साक्षात लक्ष्मीकांत बेर्डे. नाटकाचं नाव होतं, ‘उघडले स्वर्गाचे दार.’ पुढचा प्रयोग तो भारावल्यागत अनुभवू लागला. प्रयोगादरम्यान वाजणाऱ्या टाळ्या मनात घर करून गेल्या. त्याच्या महत्त्वाकांक्षेच दार इथं उघडलं होतं अन्, सचिन गिरीमधील(Sachin Giri) कलावंताचा इथूनच जन्म झाला होता.
सचिन गिरी(Sachin Giri) आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वानं अन् अभिनयकौशल्यानं रंगमंच, पडदा व्यापण्याची क्षमता असलेला मनस्वी कलावंत. सुरुवातीला तो डॉक्टर होणार होता. मात्र, शिक्षण क्षेत्राकडे त्याची पावलं वळली. तो हाडाचा शिक्षक आहे अन् जातिवंत कलाकारही. २६ नाटकं-एकांकिका, १४ हिंदी-मराठी चित्रपट, १३ महानाट्ये, ‘संत गजानन शेगावीचा’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ सारख्या काही मालिका, बऱ्याच जाहिराती अशी त्याची प्रवाही वाटचाल आहे. त्याचा हा संघर्षपूर्ण प्रवास रंजक व प्रेरणादायी आहे.
सचिन मूळचा विदर्भातील अकोटचा. वडील मधुकर गिरी वनविभागाचे सेवानिवृत्त अधिकारी तर आई प्रमिला गिरी गृहिणी. वडिलांच्या सतत बदल्या होत. त्याचदरम्यान औरंगाबादेत असताना सचिननं पहिलं नाटक अनुभवलं होतं. त्या नाटकाच्या प्रभावातून तो बाहेर पडतच नव्हता. हे क्षेत्र त्याला साद घालू लागलं होतं. अभ्यासात हुशार असलेल्या सचिननं डॉक्टर व्हावं, ही वडिलांची इच्छा होती. त्यादृष्टीनं प्रयत्न सुरू झाले. मेडिकलला प्रवेशही झाला. मात्र, सचिनचं(Sachin Giri) कलामन त्यासाठी मानत नव्हतं. हे शिक्षण त्यानं सोडून दिलं. त्यामुळे घरच्यांची नाराजी स्वाभाविक होती. यादरम्यान वडिलांची नागपूरला बदली झाली. ‘आता करायचं काय’, असा प्रश्न सचिनपुढं होता. तो एका एसटीडी-पीसीओ बूथमध्ये काम करू लागला. नाटक मनात वसलेलं होतं. मात्र, दिशा मिळत नव्हती. अशावेळी जीवनाला कलाटणी देणाऱ्या काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात. सचिनच्या जीवनातील ती व्यक्ती म्हणजे त्याचे जावई गणेश पुरी. त्यांनी सचिनला धीर दिला अन् डी.एड.चं शिक्षण पूर्ण करण्याचा आग्रह केला. सचिननं त्यांचं मानलं अन् डी.एड. पूर्ण केलं. नशिबाची चांगली साथ होती. त्याला लगेच नागपूरच्या सोमलवार शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली. अडीच वर्षे तिथं सेवा दिल्यानंतर २००५पासून तो नागपूरच्याच हडस शाळेत रुजू झाला.
नमन नटवरा…
डी.एड. सुरू असतानाही मन नाटकांकडेच ओढलं जात होतं. अशावेळी सचिन (Sachin Giri)नागपूरच्या नाट्यसृष्टीची माहिती घेत होता. त्याचदरम्यान तो ज्येष्ठ रंगकर्मी संजय पेंडसे यांच्याकडे गेला व आपली नाटकाविषयीची रुची सांगितली. पेंडसेंनी त्याला एक मोठी स्क्रिप्ट दिली. ती पाहून सचिनच्या पोटात गोळाच आला. ‘सर,आता तर कुठं सुरुवात आहे. एखादी छोटीशी भूमिका द्या’, त्यानं सांगून पाहिलं. पेंडसे ‘पाहतो’ एवढंच म्हणाले. आता आपली संधी गेली, असं सचिनला वाटलं. मात्र, पेंडसेंनी त्याला बोलवून घेतलं अन् पहिल्यांदा ‘कमलाताई होस्पेट’ या नाटकात भूमिका मिळाली. नटेश्वराला नमन करून रंगमंचावर प्रवेश झाला. कमलाताईंचं केशवपण होत असताना त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या भावाची भूमिका यात सचिननं(Sachin Giri) साकारली होती. प्रयोग चांगला झाला. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये फोटो छापून आले. त्यामुळे आत्मविश्वास वाढला होता. संजय पेंडसे यांनी नाटकांतील बारकावे शिकवले, असं तो सांगतो. नंतरच्या प्रवासात संजय भाकरे, सलीम शेख अशा प्रसिद्ध रंगकर्मींचं मार्गदर्शन त्याला मिळत गेलं, त्यांच्यासोबत कामं करता आली. इकडे, पोरानं आता शिक्षकाची नोकरी पकडली म्हणून आई-बाबा निश्चित झाले होते.
कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा…
राज्य नाट्यस्पर्धेत आठ, एकांकिका १२, तब्बल १३ महानाट्ये आणि इतर सात नाटके असा सचिनचा आजपर्यंतचा रंगमंचावरील प्रवास आहे. या प्रवासादरम्यान आता कॅमेरा खुणावू लागला होता. सुरुवातीला श्याम धर्माधिकारी यां (Sachin Giri)च्या ‘मैं कौन हूँ’ या चित्रपटाची ऑडिशन त्यानं दिली. सलीम शेख दिग्दर्शित ‘अघोर’ हा त्याचा पहिला चित्रपट. त्यात संतोष जुवेकर, सई ताम्हणकर, अनिकेत विश्वासराव, डॉ. विलास उजवणे आदी कसलेल्या कलावंतांसोबत काम करण्याची संधी मिळाली. सिनेसृष्टीतही आता प्रवेश झाला होता. संजीव कोलते यांचे ‘पिलांटू’, ‘इंदू’, ‘अंजना’, शैलेंद्र कृष्णा यांचा ‘पिफ’मध्ये गाजलेला ‘गोत’, अनिल प्रजापती यांचा ‘माँ की आँखो से’, सुभाष दुरुगकर यांचा ‘तेजस्विनी’, विशाल पाटील यांचा ‘दंगा’, शैलेश दुपारे यांचा अलीकडेच प्रदर्शित ‘पल्याड’, सलीम शेख यांचा आगामी ‘फिरस्तू’ आदी त्याचे प्रमुख चित्रपट आहेत. याचदरम्यान काही शॉर्टफिल्म्सही केल्या. तसेच ओन्ली टूडे राइस, पंचधारा पाइप्स, स्ट्रॉबेरी फार्म्स, दिनशॉ दूध, घरकुल मसाले, गो गॅस या जाहिरातींतही कामं केलीत.
मालिकांमध्ये प्रवेशण्याची त्याची महत्त्वाकांक्षा मोठी रंजक आहे. आपल्या घरी आई-बाबा ज्या मालिका बघतात, त्यांत आपणही दिसावं, या इच्छेनं त्याच्या मनात मूळ धरलं. महत्त्वाकांक्षेला मेहनतीची जोड असली तर यश तुमच्याकडे येऊ लागतंच. सह्याद्री वाहिनीवरील नंदू शिंदे यांच्या ‘धुरंधर’ मालिकेत त्यानं पहिल्यांदा इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. नंतर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत त्यानं गौरीच्या वडिलांची भूमिका साकारली. अलीकडेच सन मराठीवरील ‘संत गजानन शेगावीचे’मध्ये त्याची विश्वनाथ बक्षी ही भूमिका गाजली. ‘ब्लाइंड गेम’ या वेबसीरिजमध्येही त्यानं काम केलंय.
=======
हे देखील वाचा : जेव्हा वहिदा रहमानने केलेला एक ‘मजाक’ तिच्यावरच ‘बूमरॅंग’ सारखा उलटला!
=======
साथ आहे, म्हणून शक्य आहे…
‘आपल्या प्रवासात कुणाची साथ असेल तरच हा प्रवास शक्य नि सहज होत जातो. माझ्या प्रवासात आई-बाबा, पत्नी ज्योती, मुलगी जान्हवी, मुलगा आराध्य, जावई गणेश पुरी, बहीण सुनीता पुरी यांनी चांगली साथ दिली. सोबतच, हडस हायस्कूल, तेथील सहकारी नेहमी माझ्या कामाला पाठबळ देतात’, असं सचिन नमूद करतो. सचिनचं व्यक्तिमत्त्व तसं रांगडं. मात्र, कुठलीही भूमिका तो सहजरीत्या करू शकतो, हे त्यानं कित्येक कलाकृतींतून दाखवून दिलेलं आहे. ‘गोत’साठी तर त्यानं २५ किलो वजन कमी केलं होतं. आदिवासी लूकसाठीही बरीच मेहनत घेतली होती. ‘प्रत्येक भूमिका आव्हानात्मक असते अन् प्रत्येकच भूमिकेसाठी मेहनत ही आलीच’, असं त्याचं मत आहे. ‘नाटकानं मला ताकद दिली. भूमिकेविषयीचं माझं होमवर्क पक्कं असतं’, असं तो सांगतो. उषा नाडकर्णी, नागेश भोसले, मिलिंद शिंदे, देवेंद्र दोडके आदींसोबत काम करताना बरंच काही शिकायला मिळाल्याचं तो नमूद करतो. रोमॅण्टिक भूमिका साकारायची त्याची इच्छा आहे.
मुंबईबाहेरील कलावंतांशी दुजाभाव केला जातो, असं बरेचदा म्हटलं जातं. याविषयी विचारलं असता सचिन सांगतो, ‘मला अजिबात असा अनुभव आलेला नाही. मनोरंजनक्षेत्राची मंडई मुळातच मुंबई आहे, हे खरंय. मात्र, त्यांच्यासाठी कलावंत अन् कला महत्त्वाची असते. सीमावाद तिथं कधीच जाणवला नाही. उलट, कलेची कदर दिसली. आपलं नाणं खणखणीत असेल तर कुठल्याच समस्या येत नाहीत. समजा समस्या आल्या तरी मेहनतीची तयारी ठेवावी. आधी चरितार्थाची सोय लावूनच या क्षेत्रात यावं.’
सचिनची(Sachin Giri) तत्त्वं पक्की आहेत अन् पाय सदैव जमिनीवर आहेत. म्हणूनच नोकरी अन् कलाक्षेत्र यात तो यशस्वीरीत्या समतोल साधू शकतोय. चारचौघांत त्याचा वावर ‘पॉझिटिव्हिटी’ देणारा अन् ‘कूल’ आहे. म्हणूनच, नाटक असो वा सिनेमा किंवा कुठलीही कलाकृती… सचिनला पसंती असतेच असते. मुंबईबाहेर राहूनही ‘स्टार’पण जपता येतं, याचं हे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्याला त्याच्यातील क्षमतांची जाणीव आहे, मेहनतीवर विश्वास आहे अन् माणुसकीची जाण आहे. म्हणूनच तर हा ‘धुरंधर’ तेवढ्याच सफाईनं कलाक्षेत्राच्या या भल्यामोठ्या ‘गिरी’वर यशस्वी चढाई करतो आहे.
अभिषेक खुळे