अभिनेता प्रवीण तरडे यांनी सांगितला ‘बलोच’ सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा थरारक अनुभव
सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणाऱ्या ‘बलोच’ चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे तसेच तिथले भयाण वास्तव आता लवकरच पडद्यावर दिसणार आहे. प्रवीण तरडे मुख्य भूमिकेत असणारा ‘बलोच’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.पानिपतच्या लढाईत मराठ्यांना पराभव पत्कारून परक्यांची गुलामगिरी स्वीकारावी लागली. याच भयाण वास्तवाचे दर्शन ‘बलोच’ चित्रपटात घडणार आहे. (Actor Pravin Tarde)
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे अंगावर शहारा आणणारे ट्रेलर प्रदर्शित झाले. ट्रेलरवरून याचे चित्रीकरण किती आव्हानात्मक असेल, याचा प्रत्यय ही आला. पडद्यावर हे वास्तव खरेखुरे भासावे याकरता या चित्रपटात नैसर्गिकतेचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. मेकअप, पोशाख ते अगदी चित्रीकरण स्थळापर्यंत सगळ्याच गोष्टी नैसर्गिक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘बलोच’ चे चित्रीकरण हे जैसलमेरच्या रखरखीत उन्हात ५० डिग्री तापमानात झाले आहे. दिवसा इथले तापमान ५० डिग्री असायचे तर रात्री हे तापमान सुमारे ९-१० डिग्रीपर्यंत जायचे.अशा संमिश्र तापमानात चित्रपटातील सर्व कलाकारांनी चित्रीकरण पूर्ण केले. भारत – पाकिस्तान बॉर्डरवर या चित्रपटाचे चित्रीकरण होत असताना कलाकारांना अनेक चांगल्या वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले. असे असले तरी पाकिस्तानी जवानांनी सीमेपार उभं राहून ‘बलोच’ च्या चित्रीकरणाचा आनंद लुटला.
याच चित्रीकरण दरम्यानचा थरारक अनुभव अभिनेता प्रवीण तरडे यांनी शेअर केलाय.””महाराष्ट्रातील ४० डिग्री तापमानात आपली अवस्था खराब होते. तिथे ५० डिग्री तापमानात आम्ही चित्रीकरण केले. या रखरखत्या उन्हात चित्रीकरण करणे आमच्यासाठी खूप आव्हानात्मक होते. आमची ४०-५० जणांची टीम होती. सीन चित्रित झाल्यावर आम्ही तंबूत जायचो, मात्र तिथेही उन्हाच्या झळा यायच्या. आम्हाला भीती होती की, चित्रीकरणादरम्यान काही शारीरिक अडचणी येऊ नयेत आणि सुदैवानं असं काहीही झालं नाही. सगळं सुरळीत पार पडले. असे ते म्हणाले. तसेच रखरखत्या उन्हात मराठे कसे लढले असतील, याचा अंदाज आम्हाला इथे आला.असे ही त्यांनी सांगितले.त्याबरोबरच पानिपतचे युद्ध हा मराठ्यांचा पराभव नसून ही मराठ्यांची विजयगाथा आहे आणि हेच आम्हाला या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे.”अशी भावना ही त्यांनी व्यक्त केली.(Actor Pravin Tarde)
======================================
हे देखील वाचा: सामाजिक सत्य जगापुढे आणणाऱ्या ‘मुसंडी’ सिनेमाचा टीजर लॉन्च
=======================================
‘बलोच’ या चित्रपटाचे दिग्दर्शक, कथा, पटकथाकार प्रकाश जनार्दन पवार आहेत.तसेच ‘बलोच’ या सिनेमात मध्ये प्रवीण तरडे, अशोक समर्थ, स्मिता गोंदकर, अमोल कागणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या ५ मे रोजी ‘बलोच’ चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून सिनेमाचा ट्रेलर समोर आल्यानंतर प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.