सांग चेडवा दिस्ता कसो खंडाळ्याचो घाट
आज एक्स्प्रेस हाय वे मुळे खंडाळ्याच्या घाटातील हिरवा निसर्ग फारसा दृष्टीपथात येत जरी नसला तरी ट्रेनच्या प्रवासात आजही डोळे सुखावणारी ही हिरवाई तनामनाला प्रफुल्लीत करून जाते. याचं खंडाळ्याच्या घाटाच्या निसर्ग सौंदर्यावरील एक गाणं (Song) आलं होतं १९७० साली. चंद्रकांत वालावलकर यांनी एक चित्रपट बनविला होता, ’ती मी नव्हेच’. या चित्रपटाला त्यांना संगीतकार शंकर जयकीशन यांचे संगीत हवे होते.
त्यावेळी हे दोन महान संगीतकार स्वतंत्ररित्या वेगवेगळं संगीत जरी देत असले तरी नाव मात्र संगीतकार शंकर जयकीशन हेच वापरत होते. गायिका शारदा हिचे आगमन हे दोघातील दुराव्याचा एक महत्वाचे कारण होते. तर वालावलकर जेव्हा महालक्ष्मी स्थित शंकरच्या कार्यालयात त्यांना भेटावयास गेले तिथे शारदा आणि त्यांचे सहायक चंद्रकांत भोसले होते. शंकर मूळचे हैद्राबादचे. त्यांना मराठीचे ज्ञान यथातथाच होते त्यामुळे मराठी सिनेमाला संगीत कसे द्यायचे हा प्रश्न पडला. पण भोसले यांनी तयारी दाखवली शारदाने देखील आग्रह केला तेव्हा शंकर राजी झाले. या सिनेमाचं दिग्दर्शन मधुकर बावडेकर यांनी केलं होतं. यात तगडी स्टार कास्ट होती.
या सिनेमात चार गाणी (Song) होती व तीन गीतकारांनी लिहिली होती. हिंदीतील नामवंत गीतकार एस एच बिहारी यांनी यात एक गाणं लिहिलं होतं. गायिका शारदाने पहिल्यांदाच मराठीतच गाणी गायली होती. यात तिने एक लावणी देखील गायली होती. जितेंद्र अभिषेकींनी यात गाणे गायले होते. सिनेमाचे संगीत चंद्रकांत भोसले आणि यादव यांनी शंकरच्या मार्गदर्शनाखाली केले. संगीतकार म्हणून सूरज हे नाव घेतले.
आता येऊयात मूळ गाण्याकडे हे गाणं (Song) लिहिलं होतं रमेश अणावकर यांनी. ’हिरव्या हिरव्या रंगाची झाडं घनदाट सांग गो चेडवा दिस्ता कसो खंडाळ्याचो घाट…’ यात कोकणी शब्दांचा मस्त आणि मुबलक वापर केला होता. जयवंत कुलकर्णी आणि शारदा यांनी हे गीत गायलं होतं. या गाण्यात कोरसचा फार सुंदर वापर करण्यात आला. मराठीत हिंदी इतकी ट्रेन सॉग्ज नाहीत. ’झुक झुक आगीनगाडी’ सोडलं तर पटकन दुसरं आठवत देखील नाही. पण या गाण्याने (Song) धमाल आणली. कवीवर्य अणावकरांचे सोपे कोकणी शब्द रसिकांच्या तोंडी बसले यातील चेडवा (मुलगी) या शब्दाने मजा आणली. आज हा सिनेमा कुणालाच आठवत नाही पण पिकनिकच्या वेळी या गाण्याची (Song) आठवण हमखास होते.
हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट
हिरव्या हिरव्या झाडीत हिरवी हिरवी पानां
हिरव्या हिरव्या पानांत वारो गाता गानां
पूना बॉम्बे हीच गो तुझ्या सासरची वाट
खंडाळ्याच्या घाटात हवा थंडगार
थंडीमध्ये लाली चढे गाली गुलजार
तोऱ्यामध्ये होऊ नको उगी अशी ताठ
बोगद्यात गाडी जाता होई अंधार
अंधारात प्रीत घेता प्रीतीचो आधार
इंजिनाच्या मागे जाती डबे मागोमाग
======
हे देखील वाचा : ‘हा’ चित्रपट पाहताच अटल बिहारींनी लावला थेट फोन
======