‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
सुनील दत्तचा एक ’पात्री’ प्रयोग
सिनेमाच्या साचेबध्द चौकटीला नाकारून काही जणांनी धाडसी प्रयोग केले. त्यांच्या या प्रयोगांची दखल समीक्षकांनी वेळोवेळी घेतली. साठच्या दशकाच्या उत्तरार्धात समांतर सिनेमाने सशक्त कथामूल्य असलेल्या प्रादेशिक भाषेतील कथांना प्रेक्षकांपुढे आणले. यालाच पुढे कलात्मक सिनेमा असं नाव मिळलं. अर्थात असे प्रयोग या पूर्वी होतचं नव्हते असे नाही.पण अशा चित्रपटांना राजाश्रय (आणि काही प्रमाणात लोकाश्रय) या काळात मिळू लागला हे नक्की. १९६४ साली अभिनेता सुनील दत्त (Sunil Dutt) याने एक अभिनव प्रयोग रूपेरी पडद्यावर केला. त्याने ’यादे’ या एकपात्री सिनेमाची निर्मिती केली. जागतिक सिनेमाच्या दृष्टीने असा पहिलाच प्रकार होता. जगातला हा पहिला एकपात्री सिनेमा होता.
या सिनेमाची नोंद ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने देखील घेतली. यात तो अनिल नावाचा कलासंपन्न तरूण असतो. त्याच्या आयुष्यात प्रिया नावाची सुंदर सालस आणि सुविद्य पत्नी येते. संसार वेलीवर आता दोन फुलं देखील उमललेली असतात. अशा या क्षणी नेमकी संसाराची घडी विस्कटते. तो बाहेरख्याली, व्यसनी बनतो. पिता आणि पती या कर्तव्याचा त्याला विसर पडतो. हळूहळू संसारात धुसफूस सुरू होते आणि एक दिवस पत्नी खरेच आपल्या मुलांना घेऊन घर सोडते. इथून सिनेमाची सुरूवात होते. पती कामावरून घरी परतल्यानंतर पाहतो तर घरात त्याची पत्नी आणि मुले दोघेही नसतात. ज्याचा कधी विचारच केला नाही ती परीस्थिती उदभवते. तो विचार करू लागतो. आपल्या तिच्या प्रती असल्या वागण्याने ती घर सोडून निघून गेली याची त्याला पक्की जाणीव होते. तो हताश होतो, चिडतो, दु:खी होतो, खचतो, कोसळतो, रडतो.
पुढचे दोन तास तो स्टेजवर एकटा असतो. पत्नी सोबतच्या आठवणी, रूसवे फुगवे, राग अनुराग, मान अपमान, आरोप प्रत्यारोप सारं सारं त्याला आठवत राहतं. जणू त्याचा आत्म संवाद सुरू होतो. एका क्षणी त्याचं मन त्याचाच धिक्कार करू लागतं. क्षुद्र स्वार्थ आणि अहंकारापायी तिची केलेली वंचना आठवून व्याकूळ होतो. शेवटी आत्महत्येचा विचार त्याच्या मनात येतो…. पण शेवटी पहाटे पत्नी मुलांसह घरी परत येते आणि सिनेमातील ताण संपतो. (तिचं येणं हे ’शॅडो प्ले’ मध्ये दाखवलय.) हे सारे दाखवतानाचा सुनील दत्तचा (Sunil Dutt) अभिनय लाजवाब होता. त्याच्या चेहर्याचे क्लोज अप्स, आशा-निराशेचे गडद रंग, आवाजातील चढ उतार, मनातील भावनांचे कंगोरे चित्रपट कृष्ण धवल असूनही प्रेक्षकांपर्यंत पोचले. त्याच्या अभिनयाचा एवढा सुंदर अविष्कार पुढे अभावानेच पाहायला मिळाला. या सिनेमाची खरी संकल्पना त्याची पत्नी नर्गीसचीच होती. या सिनेमाला वसंत देसाई यांचे अप्रतिम संगीत होते. यात लताची दोन गाणी होती पण संगीता पेक्षा पार्श्वसंगीत महत्वाचं होत. कारण पडद्यावर एकाच व्यक्तीचा वावर असल्याने प्रत्येक प्रसंग ’बोलका’ करण्याची जबाबदारी वसंतरावांची होती. सिनेमाचे प्रभावी संवाद अख्तर-उल-इमान यांचे होते तर छायाचित्रण एस रामचंद्र यांचे होते. ’यादे’ ही एक सुखांतिका असली तरी भारतीय स्त्री-पुरूष यांच्या नाते संबंधातील विचार फार सुरेख पध्दतीने मांडला गेला.
======
हे देखील वाचा : सांग चेडवा दिस्ता कसो खंडाळ्याचो घाट
======
१९६५ साली या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सुनील दत्तने दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट होता. सुनील दत्तचा हा एक अप्रतिम प्रयोग होता दुर्दैवाने बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला यश मिळाले नाही परंतु cult classic म्हणून हा सिनेमा आजही नावाजला जातो. युट्युबवर हा सिनेमा उपलब्ध आहे त्याची लिंक मी खाली देतो आहे, जाणकारांनी हा चित्रपट अवश्य पाहावा.