अनोख्या जीवन प्रवासाची गाथा सांगणारा ‘जर्नी’ २९ नोव्हेंबर होणार प्रदर्शित
आप जैसा कोई मेरे जिंदगी में आयें…
भारतीय संगीतात पाश्चात्य संगीताचा वापर फार जुना आहे. सी रामचंद्र, सलील चौधरी यांच्या संगीतात हे प्रवाह स्पष्टपणे दिसतात. सत्तरच्या दशकात डिस्कोने एकच धुम उडवून दिली होती. १९७२ साली जेरी बटलर याच्या ’वन नाईट अफेयर’ या गाण्यापासून डिस्को युग सुरू झालं असं म्हटलं जातं. त्या दशकात हिप्पी कल्चर रूढ झालं त्यांच्याही ओठी हेच संगीत असायची. आपल्याकडॆ ज्या गाण्याने डिस्को युग सुरू झालं त्या गाण्याची व त्या गायिकेची कथा मनोरंजक आहे. धर्मात्माच्या यशानंतर फिरोझखान आपल्या नव्या सिनेमाच्या निर्मितीत व्यस्त होता. तरूणाईला आवडेल आणि जागतिक संगीताच्या तत्कालीन ट्रेंडला भारतीय बाजारात आणणारं संगीत त्याला हवं होतं.
योगायोगाने लंडनला एका पार्टीत त्याने एका चौदा-पंधरा वर्षाच्या मुलीला डिस्को गाणं गाताना पाहिलं. तिचं गाणं ऐकता क्षणी, आपल्याला जे हवं आहे ते हेच संगीत आहे याची त्याला खात्री पटली. त्याने हिचा आवाज आपल्या आगामी सिनेमात वापरायचं ठरवून टाकलं. ही मुलगी होती पाकिस्तानात जन्मलेली गायिका नाझिया हसन (Singer Nazia Hassan). ती आणि तिचा भाऊ जोहेब त्यावेळी संगीतकार बिड्डू यांच्या बॅण्डमध्ये, ऑर्केस्ट्रात गात असत. फिरोज खान लगेच कामाला लागला. बिड्डू देखील मूळ भारतीयच (कर्नाटक) होता त्याचं खरं नाव बिड्डू अपय्या होतं. पाश्चात्य संगीताच्या महत्वकांक्षेने ते लंडनला आले होते व त्या काळातील प्रसिध्द टीना चार्ल्स, जिम्मी जेम्स व कार्ल डग्लस या गायकांसोबत गाणी बनवली होती. (Singer Nazia Hassan)
फिरोज खान यांनी नाझिया हसन (Singer Nazia Hassan) व बिड्डू या जोडीला एक गाणं बनवायला सांगितले. बिड्डूने ट्यून बनवली ती ऐकून फिरोज जागच्या जागी उडाला! तन आणि मन डोलायला लावणार्या या धून वर मग इंदीवर यांनी शब्द रचले. या गाण्याचे ध्वनीमुद्रण लंडनला झाले. हे पहिलं भारतीय गाणं होतं ज्याचे रेकॉडींग २४ ट्रॅकवर झालं. या गाण्याचे बोल होते ’आप जैसा कोई मेरे जिंदगी में आये तो बात बन जाये’ या गाण्याच्या बीटस आणि र्हिदमवर आख्खी तरूणाई फिदा झाली. भारत व पाकीस्तानातील रसिक एकमुखाने या गाण्यावर नाचू लागली थिरकू लागली. २० जून १९८० ला ’कुर्बानी’ प्रदर्शित झाला व या गाण्याने लोकप्रियतेचे सारे रेकॉर्ड मोडून काढले. या गाण्याच्या लाखो रेकॉर्डस विकल्या गेल्या.
=======
हे देखील वाचा : सिनेमात दोन सुपरस्टार असूनही चर्चा चिंपांझीच्या मर्कट लीलांची!
=======
या गाण्यासाठी नाझियाला ’फिल्मफेयर’पुरस्कार मिळाला. बिनाकाच्या वार्षिक कार्यक्रमात मात्र आशाच्या ’शीशा हो या दिल हो आखिर टूट जाता है’ने बाजी मारली. या गाण्याने सिनेमाच्या यशाला मोठा हातभार लावला. मला वाटतं बहुधा विदर्भात अकोल्याला ’राऊंड द क्लॉक’ सलग आठ शो होत होते. लोक सकाळी सहाच्या शो ला गर्दी करीत होते! नाझियाचे पुढे तीन चार अल्बम आले पण चाळीशीतच कॅन्सरने तिचा बळी घेतला!