‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
शम्मीकपूरच्या एका धूनने बनले होते हे लोकप्रिय गीत!
कपूर घराण्यातील प्रत्येक कलावंतांमध्ये संगीत रोमारोमात भिनलं होतं. राजकपूर त्याच्या प्रत्येक गाण्याच्या सिटिंगसाठी स्वतः उपस्थित असायचा. वेळप्रसंगी तो संगीतकारांना आणि गीतकारांना मार्गदर्शन देखील करायचा. त्यामुळे आर केच्या चित्रपटातील गाणी आज इतक्या वर्षानंतर आपल्याला ठळकपणे आठवतात. तीच गोष्ट शम्मी कपूरची (Shammi Kapoor).
शम्मी कपूर (Shammi Kapoor) हा देखील संगीताच्या बाबत खूप दक्ष असायचा. त्याच्यावर चित्रित होणाऱ्या प्रत्येक गाण्याच्या रेकॉर्डिंगला तो जातीने हजर असायचा. मोहम्मद रफीला तो कायम आपल्याला हव्या त्या सूचना करायचा. त्यामुळेच शम्मी कपूरसाठी रफी ने गायलेली गाणी वेगळी वाटतात. शम्मी कपूरची आणि संगीतकार शंकर जयकिशन मधील जय किशन यांची दोस्ती खूप मशहूर होती. चर्चगेट जवळच्या गेलॉर्ड या रेस्टॉरंटमध्ये हे दोघे वर्षानुवर्ष एकत्र बसून मद्यपानाचा आस्वाद घेत. संगीत विषय गप्पा मारत. जयकिशनच्या बऱ्याच ट्यून्स या गेलॉर्ड हॉटेलच्या त्या टेबलवर बनल्या होत्या! गेलॉर्ड हॉटेलमधील त्यांचे टेबल त्यांच्यासाठी तहयात खास रिझर्व्ह असायचे.
शम्मी कपूर (Shammi Kapoor) हा संगीताचा प्रचंड मोठा भोक्ता तर होताच अभ्यासक देखील होता. तो कायम वेगवेगळ्या ट्यून्स गुणगुणत असे. नवनवीन चाली बनवत असे. अशाच त्याने बनवलेल्या एका ट्यूनवरून एका लोकप्रिय गाण्याची निर्मिती झाली होती! हे गाणे नंतर एका चित्रपटात आले आणि प्रचंड लोकप्रिय झाले! या ट्यूनची मोहिनी साक्षात लता मंगेशकर वर देखील पडली होती. कारण त्या चित्रपटात वस्तुत: आहे गाणे फक्त पुरुषी स्वरात असणार होते पण लताने आग्रह केल्यामुळे हे गाणे तिच्या आवाजात देखील स्वतंत्ररित्या रेकॉर्ड करण्यात आले! काय होता हा किस्सा? कोणते होते ते गाणे?
सत्तरच्या दशकाच्या प्रारंभी अमिताभ बच्चन आणि शम्मी कपूर (Shammi Kapoor) एका चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम करत होते. तसा कपूर आणि बच्चन फॅमिलीचा संबंध फार पूर्वीपासून होता. अमिताभ बच्चन जेव्हा पाच सहा वर्षाचा होता त्यावेळेला अलाहाबादला हरिवंशराय बच्चन पृथ्वीराज कपूर यांच्याकडे आले होते. त्यावेळी अलाहाबादला पृथ्वी थिएटरचे नाटक चालू होते. त्यावेळी नाटक झाल्यानंतर हरिवंशराय बच्चन यांनी रात्री उशिरापर्यंत त्यांच्या कविता ऐकवल्या होत्या. त्यातीलच एक कविता होती ‘मधुशाला’. शम्मी कपूरला ती कविता त्यावेळेस पासून खूप आवडली होती. कालांतराने अमिताभ बच्चन चित्रपटात आले आणि सत्तरच्या दशकाच्या प्रारंभीर बी आर चोप्रा यांच्या ‘जमीर’ या चित्रपटात शम्मी कपूर (Shammi Kapoor) सोबत त्यांनी भूमिका केली.
या सिनेमाची चित्रीकरण झाल्यानंतर रात्री हॉटेलवर गेल्यानंतर शम्मी कपूर आणि अमिताभ बच्चन उशिरापर्यंत गिटार घेऊन वेगवेगळ्या गाण्यांच्या धून वाजवत असत. शम्मी त्यावेळी वेगवेगळ्या ट्युन्स स्वतः तयार करून अमिताभला गिटार वर वाजवायला सांगत असे. अशीच एक पहाडी रागावरची धून शम्मी कपूर यांनी बनवली. अमिताभ बच्चन यांना ती प्रचंड आवडली. त्यांच्या मनात ही धून खोलवर रुजली होती. ही घटना साधारणतः १९७३ सालची. त्यानंतर खूप वर्षे लोटली. १९८१ साली जेव्हा अमिताभ बच्चन यश चोप्रा यांच्या ‘सिलसिला’ या चित्रपटात काम करत होते त्यावेळी एका गाण्याची सिटिंग चालू होती. या चित्रपटाचे संगीतकार होते शिव-हरी (शिवकुमार शर्मा आणि हरिप्रसाद चौरासिया) आणि गीतकार होते जावेद अख्तर.
त्यावेळी एका गाण्याला संगीत देताना अमिताभला सात-आठ वर्षांपूर्वी शम्मी कपूर सोबत केलेल्या त्या ट्यूनची आठवण झाल त्याने शिवहरी यांना सांगितले,” आपण ही ट्यून वापरूयात परंतु त्यापूर्वी मला शम्मी कपूर यांची परवानगी घ्यावी लागेल!” दुसऱ्या दिवशी अमिताभ बच्चन यांनी शम्मी कपूर यांना फोन करून विचारले,” आपण बनवलेली ती ट्यून मी वापरू का?” एवढी वर्ष लोटल्यामुळे शम्मी कपूर साफ विसरून गेले होते. ते म्हणाले,”कोणती ट्यून? मला तर काहीच आठवत नाही.” त्यावेळी अमिताभने ‘जमीर’ चित्रपटाच्या वेळी हॉटेलमध्ये रात्री बनवलेले ट्यूनची आठवण करून दिली आणि गाऊन दाखवली!
======
हे देखील वाचा : ‘दो घडी वो जो पास आ बैठे…’ गाण्याची भावस्पर्शी जन्मकथा…
======
त्यावेळी शम्मी कपूर (Shammi Kapoor) म्हणाले,” अरे बापरे, तुला इतक्या वर्षानंतर देखील ती धून आठवते! बिनधास्त वापर, काहीच प्रॉब्लेम नाही!” अशा पद्धतीने शम्मी कपूर यांनी परवानगी दिली. त्यानंतर अमिताभने त्यांना पत्र लिहून त्यांचे आभार देखील मानले. ही धून संगीतकार शिव-हरी यांना देखील खूप आवडली. त्यावर जावेद अख्तर यांनी गाणे लिहिले. गाण्याचे बोल होते ‘नीला आसमा सो गया…’ पहाडी रागावरील हे गाणे फार सुंदर बनले होते. अमिताभ बच्चन यांच्या आवाजात हे गाणे रेकॉर्ड झाले. जेव्हा लता मंगेशकर यांनी हे गाणे ऐकले त्यांना ही धून प्रचंड आवडली आणि त्यांनी निर्मात्याकडे,” हे गाणे माझ्या आवाजात देखील रेकॉर्ड करावे” असा आग्रह धरला.
अशा रीतीने या गाण्यानंतर लता मंगेशकर यांच्या आवाजात देखील रेकॉर्ड झाले. दोघांच्या आवाजातील हे गाणे प्रचंड गाजले. ’सिलसिला’ हा सिनेमा भलेही फारसा यशस्वी झाला नसला तरी गाणी प्रचंड गाजली. आज देखील ‘सिलसिला’ हा चित्रपट म्हंटलं की ही धून’ आणि हे गाणे लगेच आठवते. शम्मी कपूर जितका जबरदस्त अभिनेता होता तितकाच तो चांगला म्युझिकचा सेन्स असलेला कलावंत देखील होता हे यावरून कळते. अशा पद्धतीने अगदी हसत खेळत बनवलेली एक धून सात आठ वर्षानंतर वापरली जाते आणि प्रचंड लोकप्रिय होते!