यामुळे श्रीदेवी आणि आमिर खान एकत्र काम करू शकले नाहीत!
आपल्याकडे हिंदी सिनेमात काही समज आहेत आणि ते पक्के आहेत. या समजूतीवर निर्माते इतकी चिकटून आहेत की, त्याच्या बाहेर पडायला तयारच नाही. अर्थात अलीकडे यात थोडे बदल दिसताहेत काही वर्षात तसे परिणाम दिसू लागलेले आहेत पण त्याचं प्रमाण थोडेसे कमीच आहे. आपल्याकडे हिंदी सिनेमांमध्ये नायक हा कायम नायिकेपेक्षा उंच असावा लागतो! कमी उंचीचा नायक आणि अधिक उंचीची नायिका असला प्रकार इथे कधी चालत नाही. त्यामुळेच समकालीन असून ही काही जोड्या जमू शकल्या नाहीत. त्यापैकी एक म्हणजे आमिर खान आणि श्रीदेवी. (Sridevi)
आमिर खान हिंदी सिनेमाच्या दुनियेत १९८४ साली होली या चित्रपटातून त्याच्या एक वर्ष आधी श्रीदेवीचा (Sridevi) पहिला चित्रपट ‘हिम्मतवाला’ प्रदर्शित होऊन सुपर हिट झाला होता. परंतु पहिले पाच सहा वर्ष आमिर खान सिनेमाच्या इतर गोष्टींच्या अभ्यासात बिझी असल्यामुळे त्याचा नायक म्हणून पहिला फुलफ्लेज सिनेमा ‘कयामत से कयामत तक’ १९८८ साली आला. तो पर्यंत श्रीदेवी (Sridevi) सुपरस्टार बनली होती. प्रत्येकजण तिच्यासोबत काम करायला उत्सुक होता. मागच्या पिढीच्या धर्मेंद्र, अमिताभ, राजेश खन्ना, जितेंद्र सोबतच ऋषी कपूर, राजबब्बर, कुणाल गोस्वामी, सनी देओल, संजय दत्त हे सुद्धा तिचे नायक बनत होते. याचं कारण श्रीदेवीचा फॅन फॉलोअर संपूर्ण देशभर पसरला होता. श्रीदेवी (Sridevi) म्हणजे हमखास यश असं जणू सूत्रच तयार झालं होतं. त्यामुळे सहाजिकच प्रत्येक नायकाला तिच्यासोबत काम करायचं होतं. परंतु आमिर खान आणि श्रीदेवी (Sridevi) यांनी एकत्रित एकही सिनेमा केला नाही याचं कारण होतं दोघांमधल्या उंचीतील जवळपास तीन साडेतीन इंचाच्या फरकाचे! श्रीदेवीची उंची पाच फूट सहा इंच होती तर आमिर खानची उंची पाच फूट तीन-साडेतीन इंच आहे.
या दोघांचे पहिले फोटोशूट १९८९ साली झाले. तेव्हा आमिर खानचा ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि लोकप्रिय झाला होता. त्यामुळे सगळीकडे त्याची मोठी डिमांड होती. ‘मूव्ही’ या मॅगझिनचे संपादक दिनेश राहेजा यांनी या दोघांना घेऊन एक फोटोशूट करून आपल्या अंकाच्या मुखपृष्ठावर छापायचे ठरवले. त्या पद्धतीने या दोघांना एकत्रित आणले गेले. त्या दिवशी श्रीदेवी हाय हिलच्या सँडल्स म्हणून आली होती. आमिर खान आणि श्रीदेवी (Sridevi) दोघे फोटोशूट साठी तयार झाले परंतु जेव्हा आमिर खानने बघितले की, श्रीदेवीची उंची आपल्यापेक्षा बरीच जास्त आहे त्यावेळेला तो खूप नर्व्हस झाला. फोटोग्राफर, संपादक यांनी श्रीदेवीकडे (Sridevi) पाहिले तिने ताबडतोब ओळखले आणि आपल्या पायातील हाय हिल्स सँडल्स काढून टाकले आणि दोघे पुन्हा फोटोशूटला तयार झाले. पण तरीही श्रीदेवी जास्तच उंच दिसत होती. त्यामुळे पहिला फोटो श्रीदेवीला (Sridevi) उभा करून घेतला आणि तिच्याजवळ आमिर खान खाली बसलेला दिसला. यानंतरच्या फोटोशूटमध्ये श्रीदेवीने मॅच्युरिटी आणि प्रोफेशनलिझम दाखवत अशी पोस्ट दिली ज्यामध्ये आमिर खान तिच्यापेक्षा उंच दिसला. अशा पद्धतीने त्यांचे पहिले फोटोशूट पूर्ण झाले आणि हा फोटो ‘मूव्ही’ या मॅगझिनच्या कव्हर वर प्रकाशित झाला.
=======
हे देखील वाचा : शम्मीकपूरच्या एका धूनने बनले होते हे लोकप्रिय गीत!
=======
आमिर खानला श्रीदेवीचा (Sridevi) अभिनय प्रचंड आवडत होता. तिच्यासोबत एखादा तरी चित्रपट करावा असं त्याला कायम वाटत होतं. त्याने महेश भटकडे तसा हट्ट देखील धरून होता. ‘रोमन हॉलिडे’ या गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक हिंदीत करावा असं त्याला वाटत होतं आणि या रिमेकमध्ये श्रीदेवीसोबत आपण भूमिका करावी अशी त्याची इच्छा होती. परंतु महेश भटने आमिर खानला सांगितले,” या रोमन हॉलिडेवर आपल्याकडे भरपूर हिंदी चित्रपट येऊन गेलेले आहेत. त्यातील एका चित्रपटात तू पूजा भट सोबत काम देखील केलेले आहे. त्याचा दिग्दर्शक मी स्वतः होतो. चित्रपट होता ‘दिल है के मानता नही…’ “तरी आमिर खानला कथानकात काहीसे बदल करून चित्रपट करू असा आग्रह त्याने महेश भटकडे धरला होता. परंतु काही कारणाने तो योग जुळून आलाच नाही आणि आमिर खान आणि श्रीदेवी (Sridevi) यांनी कधीही एका चित्रपटात काम केले नाही. खरंतर आमिर खानचे समकालीन सलमान खान आणि शाहरुख खान या दोघांनाही श्रीदेवी सोबत चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. सलमान खानने श्रीदेवीसोबत (Sridevi) ‘चांद का टुकडा’ आणि ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात तर शाहरुख खानने श्रीदेवीसोबत ‘आर्मी’ या चित्रपटात भूमिका केली. परंतु आमिर खानला मात्र अशी संधी कधी मिळाली नाही याचे दुःख त्याला कायम वाटत राहिले. श्रीदेवीच्या निधनानंतर तिला श्रद्धांजली अर्पण करताना देखील त्याने या भावना व्यक्त केल्या होत्या.