‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
या मराठी संगीतकाराने दोन ‘भारतरत्न’ स्वरांना एकत्र आणले!
काही योग खूपच दुर्मिळ असतात. संपूर्ण आयुष्यामध्ये फार कमी वेळेला असे सुवर्णयोग जुळून येतात. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि स्वर सम्राट भारतरत्न भीमसेन जोशी या हिमालयासारख्या उंच कर्तृत्व असणाऱ्या कलाकारांनी फक्त एका अल्बममध्ये एकत्र गाणी गायली आहेत. हा अल्बम संगीतबद्ध केला होता आपले मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांनी. हा अल्बम आज संगीताच्या दुनियेतील एक अभिजात म्हणून ओळखला जातो. ‘राम शाम गुणगान’ हाच तो अल्बम. अलीकडे आपण अल्बम म्हणतो पण त्यावेळी त्याला रेकॉर्ड म्हणायचे. तर ‘राम शाम गुणगान’ ही रेकॉर्ड १९८५ साली ध्वनिमुद्रित झाली. लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी या दोन्ही कलाकारांना पुढे भारत सरकारच्या सर्वोच्च असा भारतरत्न या सन्मान प्राप्त झाला. (Musician)
त्यामुळे दोन भारतरत्न एका संगीताच्या अल्बममध्ये एकत्र आलेले इथे दिसले आणि ही किमया साध्य केली आपले मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांनी. अलीकडेच प्रकाशित झालेले एका पुस्तकांमध्ये श्रीनिवास खळे यांनी सांगितलेल्या या रेकॉर्डच्या निर्मितीच्या काही आठवणी आहेत. खरं तर श्रीनिवास खळे आणि भीमसेन जोशी यांची ओळख १९५० साली झाली. तेव्हा श्रीनिवास खळे संगीतकार के. दत्ता (दत्ता कोरगावकर) यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करत होते. एकदा भीमसेन जोशी के. दत्ता यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी खळ्यांना तिथे बघितले. भीमसेन जोशी यांनी दत्ता कोरगावकर यांना विचारले,” हा तुमचा मुलगा का?” तेव्हा त्यांनी सांगितले,” हा माझा मुलगा जरी नसला तरी मुलासारखाच आहे!” श्रीनिवास खळे हे अतिशय उत्तम शिष्य होते या नात्यातून के.दत्तांचा हा अभिप्राय होता. पुढे खळे आणि भीमसेन जोशी यांच्या गाठीभेटी होत्या पण एकत्र काम करण्याचे योग काही येत नव्हते. १९७३ साली लता मंगेशकर आणि श्रीनिवास खळे यांची ‘अभंग तुकयाचे’ ही ध्वनिमुद्रिका बाजारात आली. या रेकॉर्डमुळे संत तुकाराम महाराजांचे अनेक अभंग पुन्हा एकदा रसिक गुणगुणू लागले. या रेकॉर्डला अमाप लोकप्रियता मिळाली. (Musician)
यानंतर एकदा भीमसेन जोशी श्रीनिवास खळे यांना म्हणाले, ” मला देखील काही संत रचना तुमच्या संगीत नियोजनाखाली गायच्या आहेत!” श्रीनिवास खळे यांना तो खूप मोठा सन्मान वाटला. ते म्हणाले,” तो दिवस माझ्यासाठी सोनियाचा दिनू असेल!” लवकरच हा योग जुळून आला. एच एम व्ही ने पंडित भीमसेन जोशी आणि श्रीनिवास खळे यांना एक रेकॉर्ड ध्वनिमुद्रित करायला सांगितली. यासाठी त्यांनी अनेक संत रचनांचा अभ्यास करून सहा संत रचना निवडल्या. या ध्वनीमुद्रिकेत ‘सावळे सुंदर रूप मनोहर’, ’ राजस सुकुमार मदनाचा पुतळा’, ‘जे का रंजले गांजले’, ‘विठ्ठल गीते गावा’, ‘पंढरीचा वास चंद्रभागे स्नान’, ‘कसा मला टाकुनी गेला राम’ या रचना होत्या. या ध्वनी मुद्रिकेच्या रेकॉर्डिंगच्या आठवणी सांगताना श्रीनिवास काळे यांनी सांगितले की ,”एवढा मोठा गायक असून देखील भीमसेन जोशी यांची शिकण्याची विद्यार्थी वृत्ती होती. इतक्या उच्च स्थानावर पोचल्यावर देखील त्यांच्यातील विद्यार्थी हा कायम जिवंत होता. संगीतकाराला ते कायम गुरु म्हणून मानत. मी सांगितलेल्या सुचनांचा ते आदर करीत. हे करताना पुन्हा कमालीची विनम्रता आणि निगर्विवृत्ती!” श्रीनिवास खळे यांनी हे अभंग गाताना भीमसेन जोशीना,” तुम्ही ताना न घेता फक्त आलाप घ्या” अशी बहुमोल सूचना केली आणि ती देखील भीमसेनजी यांनी मोठ्या मनाने मान्य केली. तालमीला सुरुवात करण्यापूर्वी भीमसेन जोशी यांनी श्रीनिवास खळे यांच्या पायाला स्पर्श केला त्यावेळेला ते अक्षरशः शहारुन गेले. कारण भीमसेनजी त्यांच्यापेक्षा वयाने, ज्ञानाने आणि कर्तृत्वाने मोठे होते पण भीमसेन जी म्हणाले,” माझ्यासाठी संगीतकार हा माझा गुरु असतो त्या नात्यातून मी तुम्हाला नमस्कार करत आहे!” (Musician)
‘अभंग वाणी’ या नावाने आलेली ही रेकॉर्ड देखील प्रचंड लोकप्रिय झाली. पंडित भीमसेन जोशी जिथे जिथे संगीतमय कार्यक्रम करायला जात तिथे तिथे यातील गाण्यांची फर्माईश रसिकांकडून होत असायची. नंतर काही वर्षांनी एचएमव्हीचे व्हाईस प्रेसिडेंट विवेक दुबे श्रीनिवास खळे यांना भेटले आणि त्यांनी सांगितले, ” तुम्ही मराठीमध्ये जसे अभंग तुकयाची ही रेकॉर्ड बनवली आहे तशीच आपण हिंदीमध्ये काही बनवूया.” त्या पद्धतीने मग विचार सुरू झाला आणि यातूनच ‘राम शाम गुणगान’ ही ध्वनीमुद्रीका निघाली. यातील सर्व गाणी पंडित नरेंद्र शर्मा यांनी लिहिली होती. श्रीनिवास खळे यांनी पंडित भीमसेन जोशी यांच्यासोबत लता मंगेशकर यांचा स्वर वापरायचे ठरवले. लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी दोघेही फार मोठे कलाकार. एकमेकांसोबत गातील का? हा प्रश्न होताच. म्हणून त्यांनी पहिल्यांदा लता मंगेशकर यांना यांच्याकडे जाऊन हा विषय काढला. त्यावेळेला लताबाई म्हणाल्या, ” खळे साहेब, तुम्ही मला भीमसेनजी सोबत रेकॉर्ड करायचे सांगत आहात; पण ते तर थेट तीन सप्तकात ताना मारतात अशा मोठ्या गायकांसमोर मी कशी जाऊ?” त्यावर श्रीनिवास खळे म्हणाले ,”तुमचं म्हणणं अगदी शंभर टक्के बरोबर आहे. पण तुम्हाला कुठे त्यांच्यासारखे गायचं आहे? हे काही शास्त्रीय संगीत नाही. हे लाईट म्युझिक आहे आणि हा प्रांत तुमचाच आहे.” दिदींनी हो – नाही करत अखेर कबुली दिली. त्यानंतर श्रीनिवास खळे भीमसेन जोशी यांच्याकडे गेले. त्यावेळेला भीमसेन जोशी यांनी सुरुवातीला नकार दिला. ते म्हणाले,” अहो मी शास्त्रीय गायक. तो प्रांत सोडून तुम्ही मला या लाईट म्युझिकमध्ये कुठे गायला सांगत आहे? त्यात आणखी एक गोष्ट म्हणजे मी तुमच्या रचना ऐकल्यात त्या नेहमीच अवघड असतात. हे कसं जमायचं? शिवाय लाईट म्युझिक हा प्रांत लताबाईंचा आहे. मी तिथे त्यांच्यासमोर कसे काय गाऊ?” परंतु श्रीनिवास खळे यांनी त्यांना देखील खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आणि हे दोघेही कलाकार गाणे रेकॉर्ड करण्यासाठी तयार झाले.(Musician)
या रेकॉर्डमधील दोन भजनं भीमसेन जोशी तर दोन भजनं लता मंगेशकर यांनी सोलो स्वरूपात गायली. तर उरलेली चार भजनं जुगल स्वरूपात गायली होती. या रेकॉर्डच्या भनिमुद्रणाच्या वेळची एक गमतीशीर आठवण खळे यांनी सांगितली. ते म्हणाले,” लता मंगेशकर यांना गाताना उभे राहून गायची सवय होती. तर भीमसेन जोशी यांना प्रशस्त बैठकीवर मांडी घालून गाणं गाण्याची सवय होती. त्यामुळे रेकॉर्डिंगच्या वेळेला ह्या दोन्ही सोयी केल्या होत्या. लताबाईंनी गाणे उभे राहून गायले तर पंडितजींनी बसून गायिले. हे रेकॉर्डिंग करताना वातावरण कमालीचे भरलेलं असायचं. सर्व वादक, सहाय्यक जबरदस्त खुश असायचे. एक वेगळीच अनुभूती यातून त्यांना मिळत होती!”(Musician)
=======
हे देखील वाचा : महंमद रफी विमानातून उतरून पुन्हा कार्यक्रम स्थळी गेले!
=======
यानंतर श्रीनिवास खळे आणि भीमसेन जोशी यांनी एक संस्कृत अभंगाची रेकॉर्ड ‘भजनामृत’ ध्वनिमुद्रित केली. भीमसेन जोशी बाबतच्या आठवणी शेअर करताना श्रीनिवास खळे यांनी काही गमतीशीर आठवणी देखील सांगितल्या आहेत. पुण्याला ज्या ज्या वेळी खळे येत त्यावेळी त्यांचा मुक्काम भीमसेन जोशी यांच्या घरी असायचा. भीमसेन जोशी हे क्लासिकल सिंगर जरी असले तरी त्यांना ढिशुम ढिशुम मारधाड मूवी खूप आवडायच्या. त्यामुळे घरी गेल्यानंतर ते त्याच्या सीडी आणून हॉलीवुड मूव्हीज पाहत बसायचे!!