लता मंगेशकर यांनी या व्यक्तीकडे मागितली ही ओवळणी
स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आपण गात असलेल्या गाण्यांच्या बाबत खूपच दक्ष असायच्या, आपण गात असलेल्या त्या गाण्यातील प्रत्येक शब्द, त्याचा अर्थ याकडे त्यांचं खूप बारकाईने लक्ष असायचे. त्यामुळेच त्यांनी संपूर्ण कालखंडात खूप कमी अशी गाणी गायली त्यातून दुसरा ‘वेगळा’ अर्थ ध्वनीत होतो, त्यातून अश्लीलता दिसून येते किंवा ज्या गाण्यातून डबल मिनिंगचा इफेक्ट जाणवतो. त्यामुळे गीतकार देखील लता गाणार म्हटल्यानंतर त्या गाण्यातील प्रत्येक शब्द कसा अचूक येईल हेच पाहत होते. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना थोडा जरी संशय आला तरी त्या ते गाणे तात्काळ रिजेक्ट करत असायच्या. याचा फटका बऱ्याच संगीतकारांना बसला याबाबतच्या अनेक कथा गोल्डन इरा मध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
हास्य अभिनेते ओम प्रकाश निर्माण करीत असलेल्या ‘चाचा जिंदाबाद’ (१९५९) या चित्रपटात एक गाणे लताने रेकॉर्ड केले होते. जे कॅब्रे सदृश्य गीत होते. हे गाणे राजेंद्र कृष्ण यांनी लिहिले होते आणि त्याला संगीत मदन मोहन यांचे होते. मदन मोहन यांच्या आग्रहास्तव लताने ते गाणे रेकॉर्ड तर केले पण तिला आपल्याकडून नक्कीच काहीतरी चूक झाली आहे हे जाणवत होते. पुढचे काही दिवस तिने अत्यंत बैचैनीत काढले. नंतर योगायोगाने काही दिवसात राखी पौर्णिमा आली. ओम प्रकाश आणि लता मंगेशकर यांच्यामध्ये रक्ताचे जरी नातं नसलं तरी भावा बहिणीचे नातं होतं. त्या राखी पौर्णिमेला लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी ओमप्रकाश यांना राखी बांधली. ओम प्रकाशने विचारले “दिदी तुला काय ओवाळणी देऊ?” तेव्हा तिने सांगितले,” माझी फक्त एकच विनंती आहे आपण मागच्या महिन्यात रेकॉर्ड केलेले गाणे कृपया रद्द करा. माझ्याकडून चुक झाली ते गाणं मी गायला नको होते. हीच माझ्यासाठी या वर्षाची ओवाळणी!” ओम प्रकाशला लताच्या सच्च्या भावना लक्षात आल्या. त्यांनी देखील मोठ्या मनाने लताच्या विनंती ला मात देत ते रद्द करून गाणं आशा भोसले च्या स्वरात पुन्हा रेकॉर्ड केलं. तो काळ एकमेकांचा आदर जपण्याचा काळ होता. ते गाणं होतं ‘नजरे उठा के जरा देख ले…’ सिनेमात हे गीत अनिता गुहा वर चित्रित झालं.
असे अनेक गाणी आहेत जे लता ने गायचे टाळले होते विशेषता कॅब्रे नंबर त्या गातच नव्हत्या. त्याला अपवाद ठरला १९६९ सालच्या ‘इंतकाम’ चित्रपटातील ‘कैसे रहू चुपके मैने पी हे साकी…’ आणि ‘आ जाने जा मेरा ये हुस्न जवा..’ या दोन गाण्याच्या. अर्थात ही दोन्ही गाणी उत्तान पध्दतीने चित्रित करू नये अशी सुचना लताने दिग्दर्शकाला केली होती. यातील ‘कैसे रहू चुपके मैने पी हे साकी…’ हे गाणे तर १९६९ सालचे बिनाका टॉप चे गीत होते. १९६८ साली आलेल्या ‘पडोसन’ या चित्रपटातील ‘भाई बत्तुर भाई बत्तुर’ या गाण्यातील काही ओळींना लताने आक्षेप घेतला होता. १९९६४ साली प्रदर्शित झालेल्या आर के बॅनरच्या ‘संगम’ चित्रपटातील ‘मै का करू राम मुझे बुड्ढा मिल गया…’ हे गाणे देखील गायला लताबाई तयार नव्हत्याच. राज कपूर खूप विनंती केल्यानंतर लताबाई गायल्या पण त्यांना हे गाणं मनापासून आवडलं नव्हतंच. (Lata Mangeshkar)
======
हे देखील वाचा : गुरुदत्त यांनी ‘साहीब बीवी और गुलाम’ या चित्रपटाचा क्लायमॅक्स का बदलला?
======
११८३ साली एक चित्रपट आला होता ‘सौतन’ या चित्रपटातील सर्व गाणी लता मंगेशकर यांनी गायलेली होती. पण यातील एक होली गीत होते जे गायला त्यांनी नकार दिला. हे गाणं चित्रपटाचे दिग्दर्शक सावन कुमार यांनी लिहिलं होतं. जनरली होळीच्या गाण्यांमध्ये छेडछाड मौज मस्ती भरपूर असते पण या गाण्यांमध्ये जरा जास्तच होती. लताबाईंना ते काही आवडलं नाही त्यामुळे त्यांनी हे गाणं गायला नकार दिला. गाण्याचे बोल होते ‘ओ मेरी पहले ही तंग थी चोली…’ नंतर हे गाणे अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांच्या स्वरात रेकॉर्ड झाले. १९९१ साली आलेल्या ‘ फर्स्ट लव लेटर’ या चित्रपटातील ‘हम दोनो एक कंबल में… ‘ हे गाणी देखील लताने गायला नकार दिला कारण ते गाणे त्यांना अश्लील वाटले होते. नंतर ते गाणे आशा भोसले आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायले. अशा पद्धतीने लताने आपल्या गीतातून जास्तीत जास्त पावित्र्य, नीतिमत्ता जपली. यातूनच त्यांचे वेगळेपण अधोरेखित होते!