या’ गाण्याचे अर्धे रेकॉर्डिंग पाकिस्तानात तर अर्धे भारतात झाले !
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला पण त्याच वेळी फाळणीने आपल्या देशाचा एक मोठा भूभाग वेगळा झाला आणि तिथे पाकिस्तान नावाचे राष्ट्र जन्माला आले. हजारो वर्षे एकत्र आणलेल्या भूभागाचे दोन विभिन्न राष्ट्रात रूपांतर झाले. ही फाळणी भौगोलिक असली तरी त्याचे परिणाम फार मोठ्या स्वरूपात सांस्कृतिक क्षेत्रात उमटले गेले. भारतीय सिनेमातील अनेक कलावंत पाकिस्तानात निघून गेले. भारत आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्रे राजकीय दृष्ट्या कायम एकमेकांचे शत्रू राहिले आहेत. (Song Record)
त्यामुळे मागच्या ७५ वर्षाच्या काळात तीन मोठी युद्ध या देशाच्या दरम्यान झाली. असे असले तरी दोन्ही देशांचा इतिहास एक असल्याने सांस्कृतिक, साहित्यिक आणि सामाजिक दृष्टीने हे दोन देश एकमेकांशी जोडले गेले. भारतात लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी मुकेश, किशोर कुमार तर पाकिस्तानात गुलाम अली, नूरजहां, मेहंदी हसन या कलाकारांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. दोन्ही कडील सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंतांना एकमेकांना भेटण्याची आस होती आणि संधी मिळेल तिथे परस्परांना ते भेटत होते. दोन्हीकडच्या कलाकारांना एक दुसऱ्यांच्या कला संस्कृती बद्दल आदर होता. पाकिस्तानचे गझल गायक गुलाम अली आणि मेहंदी हसन अनेक वेळेला भारतात आले आणि त्यांनी आपली कला कला सादर केली. लता मंगेशकर यांना मात्र कधीच पाकिस्तानला जाता आले नाही. गझल गायक मेहंदी हसन हे लता मंगेशकर या दोघांना परस्परांच्या कलागुणांचा खूप आदर होता. (Song Record)
एकदा स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर किंगस्टन येथे होत्या त्यावेळी त्यांना असे लक्षात आले फरिदा खानम यांच्या एका कार्यक्रमात मेहंदी हसन देखील येणार आहे. त्यामुळे लता मंगेशकर ताबडतोब टोरंटोला येथे गेल्या. लताला तिथे बघताच मेहंदी हसन यांनी हार्मोनियम वरून उठून लताला भेटले. संगीताचा अतूट धागा त्या दोघांना एकत्र बांधत होता. नंतर लताने मेहंदी हसन यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले. पुढे काही वर्षांनी मेहंदी हसन भारतात आले आणि लता मंगेशकर यांना आवर्जून भेटले. त्यांच्या घरी जाऊन त्यांनी पाहुणचार देखील घेतला. त्याचवेळी लता आणि मेहंदी हसन यांनी एकत्र गावे असा प्रस्ताव आला. पाकिस्तानी शायर फरहद शहझाद यांची एक गझल या दोघांनी गावी असे ठरले. पण मेहंदी हसन यांना अधिक काळ भारतात थांबणे शक्य नव्हते. त्यामुळे ते पाकिस्तानला परत गेले. त्यामुळे एकत्र गझल घ्यायचे राहूनच गेले. (Song Record)
पण पुन्हा एकदा नव्याने प्रयत्न सुरू झाले. आता परिस्थिती अशी होती की मेहंदी हसन आजारी असल्याने भारतात येऊ शकत नव्हते आणि लता मंगेशकर पाकिस्तानला जाऊ शकत नव्हते. दोघांची इच्छा एकत्र गाण्याची होतीच. काय करावे? आयडीया केली. २००९ साली मेहंदी हसन यांनी त्या गजलेतील स्वतःचा पार्ट पाकिस्तान मध्येच रेकॉर्ड केला आणि ती टेप मुंबईला पाठवली. इकडे लता मंगेशकरने त्या टेपवर आपल्या स्वरात उर्वरीत गजल रेकोर्ड केली. आणि या दोघांचे पहिले आणि एकमेव गीत तयार झाले. गीताचे बोल होते ‘तेरा मिलना बहुत अच्छा लगे है मुझे तो मेरे दुख जैसा लगे है….’ या गीताला संगीत स्वतः मेहंदी हसन यांनी दिले होते. नंतर २०१५ साली हे गाणे एच एम व्ही ने ‘सरहदे’ या अल्बम मध्ये समाविष्ट करण्यात आले. या अल्बम मध्ये या दोघांच्या गीता शिवाय गुलाम अली, उषा मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर , हरीहरन, रेखा भारद्वाज यांची देखील गाणी होती. अतिशय अप्रतिम बनलेल्या या ‘सरहदे’ या अल्बम वर जगभरातल्या रसिकांनी उदंड प्रेम केले. (Song Record)
=======
हे देखील वाचा : ‘के’ पासून का असतात राकेश रोशन यांच्या सिनेमांची नाव
=======
इच्छाशक्ती जर असेल कुठलेही अवघड काम पूर्ण होऊ शकते. लता आणि मेहंदी हसन यांना एकत्र गायची इच्छा होती ती अशा पद्धतीने पूर्ण झाली. पण दुर्दैवाने हे गाणे मेहंदी हसन मात्र ऐकू शकले नाहीत. १३ जून २०१२ रोजी ते अल्लाला प्यारे झाले. या दोघांनी एकत्र गायलेलं हे एकमेव गीत आहे. याचे रेकोर्डिंग देखील अर्धे पाकिस्तानात तर अर्धे भारतात झाले. खऱ्या अर्थाने हे युनिक सॉंग आहे. तुम्ही देखील नक्की ऐका. त्याची लिंक खाली दिली आहे.