..आणि असा बनवतो ‘जवान’ तुम्हाला जिंदा बंदा !
उसूलो पर जहाँ आंच आ जाये तो टकराना जरुरी हैं और बंदा जिंदा हो तोह जिंदा दिखना जरुरी हैं।
शाहरुखच्या मागच्या काही कालावधीतील फिल्मस फ्लॉप झाल्या. त्याची सद्दी संपली, त्याने रिटायर व्हावे असे बोललं जाऊ लागलं, तो सुद्धा थोडा काळ प्रकाशझोतातून बाजूला गेला होता मग त्या कालावधीत एका मागून एक सामाजिक प्रश्नांवर किंवा ऐतिहासिक विषयांवरती बेतलेल्या अतिशय सुमार फिल्म्स आल्या आणि गेल्या. त्यांनी स्वतःच आम्ही हिट झालो म्हणून टिमकी वाजवली प्रेक्षकांच्या मनात पण शाहरुखच्या स्टारडमवरती प्रश्न उपस्थित झाले होते. मग पठाण आली, शाहरुखच्या नवीन इनिंगची खबर घेऊन आणि आता ‘जवान’ या मेगा मासी फिल्ममार्फत तो काय चीज आहे आणि तो का last of the stars आहे हे दाखवून दिले आहे.
सिनेमाची थोडक्यात कथा अशी की, आझाद हा बेहराम महिला जेलचा जेलर, जेलमधील चुकीच्या आरोपाखाली अटक झालेल्या महिलांच्या मदतीने त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध बेकायदेशीररित्या पण रॉबिनहूड स्टाइलने न्याय मिळवत असतो आणि त्याचा मेन शत्रू आहे आर्म डीलर काली गायकवाड पण कालीला कळू न देता त्याच्याच पैशातून तो हे सर्व करत असतो इकडे आझादच्या वडिलांचे आणि कालीचे जुने वैर असते. कालीला या दोघा पितापुत्राबद्दल कल्पना नसते. आझाद त्याच्या न्याय मिळवण्याच्या मार्गावर असताना कथेत एक पॉईंट येतो की, कालीला या दोघांबद्दल कळते. मग सुरु होतो खरा संघर्ष.
तामिळ दिग्दर्शक ऍटलीचा हा पहिलाच हिंदी सिनेमा आणि तो पण सुपरस्टार शाहरुखसोबत! सुदैवाने या फिल्मचे बॉलिवूडकरण झाले नाही हा याचा एक स्ट्रॉंग पॉईंट ! फिल्म सर्वच अंगाने फ्रेश जाणवते मग ते ॲक्शन सिक्वेन्स असो, बॅकग्राऊंड म्युझिक असो, अभिनेत्यांची निवड असो, सामाजिक प्रश्नांच्या कथेत समावेश करण्याबद्दल असो.. कथेची मांडणी खूपच मस्त केली आहे. स्क्रिनप्ले हा एका मासी फिल्मला साजेसा आहे. यात आताच्या सामाजिक प्रश्नांचा खूप खुबीने अंतर्भूत करण्यात आला आहे आणि आजच्या वातावरणात तेवढ्याच धैर्याने तो सादर केल्याबद्दल ऍटली आणि शाहरुख या दोघांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत.
सामाजिक संदेश देताना ते कुठेही प्रिची आणि बोरिंग होणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. गंभीर आणि गुंतगुंतीच्या प्रश्नांची सोप्पी सुटसुटीत मांडणी आणि त्याला झटपट उत्तर हा जुना फॉर्मुला वापरून सुद्धा फिल्मची मनोरंजकता कमी होत नाही. याचे बरेचसे श्रेय डबल रोल करणाऱ्या शाहरुखसोबत इतर एक्टर्सना पण जाते. ज्यात विजय सेथुपतीचा खुनशी आणि थंड डोक्याने सर्व काही करणारा काली गायकवाड जबरदस्त वाटतो, नयनतारा, प्रियामनी, दीपिका पादुकोण यांच्यावरून नजर हटत नाही. सानिया मल्होत्रा तिच्या डॉक्टर एरमद्वारे आपल्या काळजाला हात घालते. सुनील ग्रोव्हर इराणी या नयनताराच्या असिस्टंटच्या भूमिकेत चमकला आहे पण त्याला अजून स्क्रीन टाइम मिळायला हवा होता. लेहर खान कल्कीच्या भूमिकेत आपल्या डोळ्यांच्या कडा ओल्या करते. सिनेमातील छोट्यात छोटे पात्र सुद्धा आपल्या ध्यानात राहते अशा पद्धतीचे भाग त्यांच्यासाठी लिहिले आहेत आणि तेवढीच त्या त्या कलाकारांनी त्यावरती मेहनत केली आहे.
फिल्ममध्ये चित्तथरारक ॲक्शन सिक्वेन्स खच्चून आहेत अर्थात ते कथेची गरज म्हणून आहेत आणि खूपच कल्पकतेने आणि उत्तमरीत्या डिझाइन केले आहेत. खूप दिवसांनी बॉलिवूड फिल्ममध्ये एवढ्या चांगल्या क्वालिटीचे ॲक्शन सिक्वेन्स बघायला मिळाले. हे सर्व ॲक्शन सिक्वेन्स पुढील ६ ॲक्शन डिरेक्टर्सनी एकत्र येऊन डिझाइन आणि डिरेक्ट केले आहेत. ज्यात फास्ट अँड फ्युरिअस, कॅप्टन अमेरिका अशा फिल्मचे ॲक्शन डायरेक्टर स्पिरो रझातोस, डंकिर्क, इन्सेप्शन फिल्मचे ॲक्शन डायरेक्टर यानिक बेन, मॅड मॅक्स फ्यूरी रोड फिल्मचे ॲक्शन डायरेक्टर क्रेग मॅकरे, बाहुबली २ फिल्मचे ॲक्शन डायरेक्टर केचा खमफागडे, सुलतान, शेरशाह, सूर्यवंशी आणि किक फिल्मसचे ॲक्शन डायरेक्टर सुनील रॉड्रिग्स व अनल अरसु यांचा समावेश आहे.
ॲक्शन डिरेक्टर्ससोबत फिल्मचे सिनेमॅटोग्राफर जी.के विष्णू आणि एडिटर रूबेन यांचेही कौतुक करावे तेवढे कमी आहे. जी.के विष्णू यांनी कलर्स, लाइट आणि अँगल्स यांचा खूप मस्त मेळ घालत हे काल्पनिक जग प्रेक्षकांना रिलेटेबल बनवलय. एडिटर रूबेन यांनी एका मासी फिल्ममधील ॲक्शन सिक्वेन्स, भावनिक, विनोदी सीन्स किंवा ओव्हरऑल कथेला साजेसा आणि परिणामकारक पेस आणि रिदम क्रियेट करण्यात यशस्वी झाले आहेत. म्युझिक डिरेक्टर अनिरुद्ध रवीचंदेर यांचे कमाल म्युझिक या सगळ्या गोष्टींना वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. बंदा जिंदा, रमय्या वस्तावय्या या गाण्यांच्या कंम्पोजिशन खूपच नवीन आणि ठेका धरायला लावणार आहेत.
=========
हे देखील वाचा : जेंव्हा साक्षात मृत्यूच मनोज वाजपेयीचा पाठलाग करत होता!
=========
कथेत खूप सारे लॉजिकल लूपहोल्स आहेत तसेच, बरेच ट्विस्ट हे आधीच प्रेडिक्ट केले जाऊ शकतील, कथेचा वेग मधेच स्लो होतो, काही ठिकाणी डायलॉग्स रटाळवाणे आणि अगदीच माठ आहेत हे सर्व इथे उदाहरणासह एक्सप्लेन केले तर स्पॉयलर ठरतील. पण असं सर्व असूनसुद्धा हे आपल्या एन्जॉयमेंटच्या आड येत नाहीत. हे जगच एवढं रिलेटेबल बनवलं असल्यामुळेही असेल किंवा शाहरुखचा करिष्मा म्हणा किंवा काहीतरी अद्भुत जादू म्हणा पण प्रत्येक सीन ना सीन हा मनोरंजक वाटतो.
शाहरुखचे स्मोकिंग करत असतानाचे एंट्री टाइप खूप सारे सीन्स आणि त्यासोबत अनिरुद्धचे कडक बॅकग्राऊंड म्युझिक हे कोणत्याही हार्डकोर शाहरुख फॅनसाठी मेजवानीच ठरतीलच पण बाकी प्रेक्षक सुद्धा या करिष्म्यातून वाचू शकणार नाहीत.
जवानमध्ये ८०च्या दशकातील सिनेमांमध्ये असतात तसे योगायोग, धक्के, डोळ्यांच्या कडा ओल्या करणारे प्रसंग, थरारक आणि थोड्याशा विनोदी ॲक्शन सिक्वेन्स यांची लयलूट केली आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला एका मनोरंजक इमोशनल रोलरकोस्टर राइड वर नेऊन नक्कीच झिंदा बंदा बनवेल याच शंकाच नाही. कथा, एक्शन सिक्वेन्स, अभिनय, एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी अशा मॅजिकल टीम वर्कसाठी कलाकृती मिडिया या फिल्मला ५ स्टार देते.