चित्रपटसृष्टीतील आठवणीतला श्रीगणेशोत्सव…
चेंबूर नाक्याजवळील भव्य दिमाखदार ऐतिहासिक असा आर. के. स्टुडिओ पडलाय पण आजही तेथून जाताना आर. के. फिल्म बॅनरचे ‘बरसात’ पासून ‘बाॅबी’ पर्यंत आणि ‘आवारा’पासून ‘आ अब लौट चले’ पर्यंतचे अनेक चित्रपट आठवतातच आणि त्याबरोबरच आठवतो, आर. के. स्टुडिओतील बहुचर्चित श्रीगणेशोत्सव. राज कपूर कायमच ‘शो’मन म्हणून ओळखला गेला, पण त्याने आपल्या या स्टुडिओत धमाल कलरफुल होळी, श्रीगणेशोत्सव असे सणही दणक्यात साजरे केले. राज कपूरच्या निधनानंतर होळी कालबाह्य होत गेली आणि फ्लॅशबॅकमध्ये होळीच्या आठवणीतील रंग उडवले जाऊ लागले. (Filmy Ganeshotsav)
श्रीगणेशोत्सव मात्र आर. के. स्टुडिओची विक्री आणि पाडाव होईपर्यंत सुरुच होता. काही म्हणा, पूर्वीचे रुपेरी पडद्यावर भव्य दिव्य स्वप्न फिल्मवाले सण, देव पूजा, भक्ती यांतही मग्न असत. त्यांच्या व्यक्तिमत्वाची ही महत्त्वाची बाजू. शोमन राज कपूरने १९४८ साली आपल्या या भव्य स्टुडिओची स्थापना केली आणि त्यात चित्रपट कला आणि सण संस्कृती यांची छान सांगडही घातली. हे त्या काळातील मोठे वैशिष्ट्यच. (Filmy Ganeshotsav)
फक्त फिल्मीपणा नाही तर परंपरा, मूल्ये जपणेही आहे आणि ते फार महत्वाचे आहे. राज कपूर म्हणजे केवळ ग्लॅमर, गाॅसिप्स, मोठ्ठे सेट्स, गीत, संगीत व नृत्य यांची बहार असेच नव्हे. राज कपूर अभिनेत्री, निर्माता, दिग्दर्शक, संकलक आणि स्टुडिओ मालक याबरोबरच सण, संस्कृती, परंपरा, मूल्य जपणाराही होता. सुरुवातीला राज कपूर यांचे पिताजी पृथ्वीराज कपूर या गणपतीची पूजा करीत, त्यांच्यानंतर राज कपूर करु लागला आणि मग रणधीर कपूरने ही प्रथा कायम ठेवली. एका पिढीतून पुढील पिढीत हे जात राहिले.(Filmy Ganeshotsav)
स्टुडिओत मुख्य भव्य सेटच्या उजव्या बाजूचा हा गणपती जनसामान्यांनाही पाहता येई. कालांतराने न्यूज चॅनलच्या काळात या गणपतीच्या विसर्जनाची लाईव्ह बातमी होऊ लागली. चेंबूरपासून सायनपर्यंत रणधीर, ऋषि आणि राजीव कपूर या विसर्जन मिरवणूकीत सामिल झाल्याची ब्रेकिंग न्यूज होई. जेथे सेलिब्रिटीज असते त्या प्रत्येक गोष्टीची डिजिटल मिडियात हमखास बातमी होतेच. एकदा तर त्यात प्रियंका चोप्राही सामील झाली. कपूर खानदान आणि आर. के. स्टुडिओचे अनेक कामगारांनी जपलेली ही प्रथा या स्टुडिओची विक्री होताच खंडित झाली, तरी या स्टुडिओतील कर्मचारी ही प्रथा एका वर्षी का होईना कायम ठेवली आणि आपल्या परिसरात या स्टुडिओचा श्रीगणेशोत्सव साजरा केला. काळ जस जसा पुढे सरकत जाईल तस तसा ही आर. के. स्टुडिओच्या श्रीगणेशोत्सवाची आठवण सतत येतच राहील. अर्थात, आर. के. फिल्मचे अनेक उत्तम थीमवरचे दर्जेदार अभिनय गीत संगीत व नृत्य यांचे चित्रपट कायमचे लक्षात आहेत तसेच तेथील होळी, श्रीगणेशोत्सव हे देखील कायमच लक्षात राहतील हे निश्चित! (Filmy Ganeshotsav)
‘श्री गणेश जन्म’ चित्रपटात निरुपा राॅयनी साकारली पार्वती…
आता श्रीगणेशोत्सवाचा जणू फ्लॅशबॅक सुरु आहे, म्हणून त्या काळातील ही अगदी वेगळीच आठवण. निरुपा राॅय म्हटलं की, पटकन यश चोप्रा दिग्दर्शित ‘दीवार’ मधील शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्या करारी ‘माॅ’ची भूमिका साकारलेली अभिनेत्री. फार पूर्वी म्हणजे एकदम पन्नासच्या दशकात निरुपा राॅय यांनी अनेक पौराणिक तसेच संतपट, भक्तीपट यातून सातत्याने भूमिका साकारलीय. त्याकाळात प्रामुख्याने अशाच पठडीतील चित्रपट निर्माण होत आणि त्याकाळातील प्रेक्षकांना असे चित्रपट आपलेसे वाटत. त्या काळातील रसिक बरेचसे भाबडे, सरळमार्गी, काहीसे भाबडेही होते. ते पौराणिक चित्रपट पाहताना अगदी गहिवरुन जात. पडद्यावरील देवाला काहीजण नमस्कार करीत. आणि असाच एक चित्रपट होता ” श्रीगणेश जन्म” (१९५१). (Filmy Ganeshotsav)
=========
हे देखील वाचा : ‘नैना’ ची वेगळी पन्नाशी…
=========
या चित्रपटात निरुपा राॅय यांनी गणपतीची आई पार्वती ही व्यक्तिरेखा साकारली. हा चित्रपट कृष्ण धवलअर्थात ब्लॅक अॅण्ड व्हाईट स्वरुपात होता. आणखीन एक विशेष म्हणजे जयंत देसाई हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते आणि त्या काळात ते सातत्याने पौराणिक आणि ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शन करीत. हर हर महादेव (१९५०), शिव शक्ती (१९५२), शिवरात्री (१९५४), लक्ष्मी पूजा ( १९५७) हे पौराणिक चित्रपट त्यांचेच! तसेच त्यांनी सम्राट चंद्रगुप्त (१९४५), महाराणा प्रताप ( १९४६) हे ऐतिहासिक चित्रपट त्यांचेच. त्या काळात खरं तर बजेटची समस्या असे आणि तांत्रिक सुविधांचा प्रचंड अभाव असे. तरीही अशा स्वरूपाचे चित्रपट मोठ्या प्रमाणात निर्माण होत आणि त्या चित्रपटांना उत्तम यशही मिळे. याचे कारण म्हणजे, चित्रपट म्हणजे अशाच पौराणिक, ऐतिहासिक गोष्टींचे पडद्यावरचे चित्ररुप होय असेच मानले जाई. आणि त्यात काहीही गैर नव्हते. ‘श्री गणेश जन्म’ या चित्रपटात त्रिलोक कपूर, जीवन आणि उल्हास यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. महत्वाचे आहे ते निरुपा राॅय यांची पौराणिक चित्रपटातील भूमिका! श्रीगणेशोत्सवाच्या निमित्ताने असा हा फ्लॅशबॅक.