‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
सुपरहिट लावणी देऊनही ‘या’ संगीतकाराला का डच्चू मिळाला?
कलाकारांच्या आयुष्यात कधी कधी संकटांची मालिका सुरु असते. त्या काळात अनेक अडचणी समोर येत असतात. पण याच काळात अशी एखादी घटना घडते की, त्यामुळे सारे आयुष्य उजळवून जाते. संगीतकार राम कदम यांच्या जीवनात अशीच एक घटना घडली ज्याने त्यांना पुन्हा कधी मागे पाहावे लागत नाही. त्यांच्या आत्मचरित्रामध्ये याबाबतच्या बऱ्याच आठवणी सांगितल्या आहेत. ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक मधु पोतदार यांनी शब्दांकित केलेल्या राम कदम यांच्या आत्मचरित्रात या आठवणींचा उल्लेख आहे. १९६० सालचा ‘सांगत्ये ऐका’ हा मराठीतील सुपरहिट चित्रपट पुण्याच्या विजयानंद या थिएटरमध्ये सलग तब्बल १३१ आठवडे हा सिनेमा चालला. आजही हा विक्रम अबाधित आहे. या सिनेमाच्या मेकिंगमध्ये संगीतकार राम कदम यांची भूमिका चित्रपटाच्या संगीतकार वसंत पवार यांच्या सहाय्यकाची होती. वसंत पवार मुख्य संगीतकार होते. खरं तर राम कदम यांनी स्वतंत्र रित्या चित्रपटाला संगीत द्यायला खूप आधीच सुरुवात केली होती. परंतु त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांना अपेक्षित यश मिळत नव्हते त्यामुळे त्यांच्याकडे चित्रपटांचा ओघ कमी झाला होता. सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचे नाही. त्यामुळे त्यांनी ‘सांगत्ये ऐका’ या चित्रपटात संगीतकार ‘वसंत पवार’ यांच्यासोबत सहाय्यक संगीतकार म्हणून काम करायचे ठरवले. (Singer)
दहा वर्ष स्वतंत्र संगीतकार म्हणून काम केल्यानंतर नाईलाजाने पुन्हा त्यांना सहायक संगीतकाराच्या भूमिकेत जावे लागले. या चित्रपटाची गाणी ग दि माडगूळकर यांनी लिहिली होती. यातील जयश्री गडकर या अभिनेत्रीवर चित्रित ‘बुगडी माझी सांडली गं…’ ही लावणी प्रचंड गाजली. या लावणीचे खरं तर श्रेय राम कदम यांचे होते परंतु हे श्रेय त्यांना हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तब्बल वीस पंचवीस वर्षानंतर हे श्रेय मिळाले! याचे कारण या लावणीला संगीत जरी राम कदम यांनी दिले असले तरी मुख्य संगीतकार म्हणून वसंत पवार यांचे नाव होते. ग दि माडगूळकर यांनी लिहिलेल्या लावणीला वसंत पवार यांना काही केल्या चाल लावता येत नाही. दिवसभर आटापिटा चालू होता. पण दिग्दर्शक अनंत माने यांना वसंत पवार यांनी बनवलेली चाल आवडत नव्हती. शेवटी वैतागून वसंत पवार म्हणाले,” आपण माडगूळकरांकडून दुसरी लावणी लिहून घेऊयात!” तेव्हा अनंत माने म्हणाले,” हे बरोबर नाही. आपण याच लावणीला चाल लावायचा प्रयत्न करू.” तेव्हा सहायक संगीतकार असलेले राम कदम म्हणाले ,”मी प्रयत्न करू का?” त्यावर वसंत पवार पटकन म्हणाले,” तुला गदिमांचे शब्द झेपणार नाही.” पण दिग्दर्शक अनंत माने म्हणाले,” राम, तू प्रयत्न कर.” त्यावर राम कदम म्हणाले,” जर मुख्य संगीतकार वसंत पवार परवानगी देत असतील तरच मी या लावणीला चाल लावायचा प्रयत्न करतो.” त्याकाळी असा आदर भाव असायचा. त्यावर अनंत माने म्हणाले,” मी या सिनेमाचा दिग्दर्शक आहे, मी तुला सांगतो आहे तू या लावणीला चाल लाव आणि संगीत दे!” राम कदम यांच्यावर एक मोठी जबाबदारी होती. चित्रपटाचे ते सहाय्यक होते. मुख्य संगीतकार वसंत पवारांना ते कितपत आवडेल हे त्यांना माहीत नव्हते पण स्वत: दिग्दर्शकानेच त्यांना हे काम दिल्यामुळे त्यांनी या लावणीला चांगली चाल देण्याचे ठरवले. त्यांनी आव्हान स्वीकारलं खरं पण त्यांना देखील चाल काही केल्या जमेना. दिवसभर ते चाल लावायचा प्रयत्न करत होते. पण यश मिळत नव्हते.
त्या विमनस्क अवस्थेत संध्याकाळी त्यांच्या वादकांपैकी एकाचे वडील वारल्यामुळे त्याला भेटायला त्यांच्या गल्लीत गेले. तिथे बायका जोरजोरात हंबरडा फोडून रडत होत्या. ‘किती चांगला होता ग…’ ‘मला सोडून गेला गं….’ , ‘मला पुन्हा कधी भेटेल गं…’ ‘असा कसा गेला गं..’ असे त्या विव्हळून विव्हळून रडत होते. अंत्यसंस्कार करून राम कदम घरी आले. पण त्यांच्या बायकांचे रडणे चालूच होते. … आणि त्यातून च दिवसभर जी चाल त्यांना सापडत नव्हती ती सापडली ! आणि लावणी तयार झाली. ‘ बुगडी माझी सांडली गं….’ यात त्यांनी ‘गं s s s’ वर भर दिला. आशा भोसले यांना देखील चाल खूप आवडली. यात ‘हाय’ हा शब्द टाकायची कल्पना आशा भोसले यांची होती. (Singer)
========
हे देखील वाचा : जेव्हा संजू बाबा ऋषी कपूरला जीवे मारायला धावून गेला होता…
========
लावणीचे रेकॉर्डिंग तर झकास झाले पण राम कदम यांना काय मिळाले? लावणीच्या दुसऱ्या दिवशीच निर्मात्यांनी राम कदम यांना चित्रपटापासून दूर केले! राम कदम यांनी कारण विचारले असते ते म्हणाले,” दोन दोन क्लॅरोनेट वादक काय करायचे? त्यामुळे तुला काढून टाकत आहोत.” कारण राम किंकर नावाचे आणखी एक क्लॅरोनेटवादक राम कदम यांच्या सोबत होते. अशा प्रकारे सुपरहिट लावणी बनवून देखील राम कदम यांच्या हाती काहीच मिळाले नाही ! अर्थात राम कदम यांच्या कारकीर्दीचा खरा यशस्वी कालखंड यात ‘लावणी’पासून सुरू झाला. पुढे साठ आणि सत्तर चे दशक त्यांनी आपल्या संगीताने अक्षरशः गाजवले.(यात १९७२ सालचा ‘पिंजरा’ देखील होता.) राम कदम यांनी संगीत (Singer) दिलेली ही लावणी प्रेक्षकांना मात्र वसंत पवार यांनीच संगीतबद्ध केली आहे असेच अनेक वर्षे वाटत होते . पण ऐंशीच्या च्या दशकामध्ये दिग्दर्शक अनंत माने यांनी एका कार्यक्रमात याचा गौप्यस्फोट केला आणि तिथूनच या लावणीचे खरे संगीतकार राम कदमच आहे हे सर्वांच्या लक्षात आले. राम कदम यांनी मात्र तो वर याचा तसूभर ही उल्लेख कधी केला नाही !