‘डॉन’ चित्रपटाच्या निर्मिती मागे मनोज कुमार यांचे कनेक्शन
काही सिनेमांच्या मेकिंगची कहाणी अफलातून असते. अनेक अडीअडचणी पार करून तो सिनेमा बनलेला असतो. अशा भरपूर आव्हानांना झेलत जेव्हा असा सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकतो आणि सुपर हिट होतो तेव्हा मात्र सिनेमातील प्रत्येक घटक समाधानाच्या भावनेने कृत कृत्य होतो. असाच काहीसा प्रकार अमिताभ बच्चन आणि झीनत अमान यांच्या ‘डॉन’ या चित्रपटाच्या बाबत झाला होता.
या सिनेमाच्या मेकिंगमध्ये अभिनेता मनोज कुमार (Manoj Kumar) यांचे देखील मोठे कॉन्ट्रीब्युशन आहे. ते नेमकं काय आहे ते हा किस्सा वाचून कळेल. लोकांना फक्त धवल यशच दिसत असते. त्याच्या मागचा संघर्ष दिसत नाही. अमिताभ बच्चन यांच्या टॉप टेन सुपरहिट सिनेमात ‘डॉन’ चा समावेश होतो. या सिनेमाची मोहिनी पुढच्या पिढ्यांवर देखील पडली आणि शाहरुख खानने देखील या सिनेमाचा सिक्वेल केला. अर्थात रसिकांना आजही अमिताभ बच्चन यांचाच ‘डॉन’ आवडतो! याचा प्रत्यय गेल्या वर्षी अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मल्टिप्लेक्समध्ये हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित झाला होता. मुंबईच्या एका चित्रपटगृहात या चित्रपटातील ‘अरे दिवानो मुझे पहचानो…’ या गाण्यावर पब्लिकने अक्षरशः कल्ला केला होता. ‘डॉन’ हा चित्रपट १२ मे १९७८ रोजी प्रदर्शित झाला. सुरुवातीला थंडेच स्वागत झाले. पण नंतर माउथ पब्लिसिटीने सुपरहिट ठरला. अमिताभ बच्चन यांच्या स्वत:च्या आवडत्या सिनेमांमध्ये त्याचा समावेश होतो.
या सिनेमाचा मेकिंगची कहाणी खूपच अडचणीची आणि खच खळग्यांनी भरलेली आहे. पन्नास आणि साठच्या दशकामध्ये नरीमन इराणी हे नाव सिनेमॅटोग्राफर अर्थात छायाचित्रकार म्हणून लोकप्रिय होते. त्यांच्या अनेक चित्रपटांनी रौप्य महोत्सवी यश मिळवलं होतं. यात रुस्तम सोहराब, फुल और पत्थर, बहु बेगम,तलाश,शोर ,सरस्वतीचंद्र…. या चित्रपटांचा समावेश होतो. सत्तरच्या दशकामध्ये त्यांना निर्माता होण्याची इच्छा झाली.
१९७२ साली दिग्दर्शक नरीमन इराणी यांनी एक चित्रपट निर्माण केला होता ‘जिंदगी जिंदगी’ नावाचा. या सिनेमात वहिदा रहमान आणि सुनील दत्त यांच्या प्रमुख भूमिका होत्या प्रचंड पैसा या मध्ये त्यांनी ओतला. परंतु सिनेमा व्यावसायिक दृष्ट्या सुपरफ्लॉप ठरला. इराणी एका रात्रीत सावकाराचे भिकार झाले आणि अक्षरशः रस्त्यावर आले. बँकेने त्यांच्या प्रॉपर्टीवर जप्ती आणली. यातून बाहेर कसे पडायचे याचा विचार विनिमय सुरू झाला. नरीमन इराणी यांचे मित्र होते मनोज कुमार. मनोज कुमार यांच्या ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटाचे छायाचित्रण नरिमन इराणी करत होते. त्या पूर्वीचा ‘शोर’ चित्रपट त्यानीच निर्माण केला होता. ते कायम आपल्या आर्थिक विवंचनेत असत. त्यांना या प्रश्नातून बाहेर काढण्यासाठी मनोज कुमार यांनी जाणीवपूर्वक काही प्रयत्न केले.(Manoj Kumar)
त्यांनी सांगितले,” तुम्हाला या कर्जातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही आणखी एक चित्रपट तयार करा! यासाठी मी तुम्हाला सर्व सहाय्य करायला तयार आहे.” मनोज च्या रोटी कपडा और मकान चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक होते चंद्र बारोट. त्यांना मनोज कुमारने (Manoj Kumar) बोलावून सांगितले ,”आपण सर्वांनी नरीमन याना त्यांच्या या संकटकाळी मदत करायला पाहिजे! तू त्यांच्या या सिनेमाचे दिग्दर्शन कर.” याच चित्रपटात काम करीत असणाऱ्या अमिताभ बच्चन आणि झीनत अमान यांना देखील हाच संदेश मनोज कुमार (Manoj Kumar) यांनी दिला. सर्वजणांनी मनापासून त्याला होकार दिला. मनोज कुमारचे मित्र प्राण यांना देखील या सिनेमात काम करण्यासाठी राजी केले. (अभिनेते प्राण हे कायम मनोज कुमारचे ऋणी होते कारण त्यांचा खऱ्या अर्थाने मेक ओव्हर मनोज कुमारच्या ‘उपकार’ या चित्रपटापासून झाला होता. खरंतर रोटी कपडा और मकान या चित्रपटात प्राण यांना काम करायचे होते पण त्याच वेळी त्यांचा जंजीर हा चित्रपट फ्लोअर वर असल्यामुळे त्यांनी नकार दिला नंतर ही भूमिका प्रेमनाथ ला मिळाली.
============
हे देखील वाचा : सुपरहिट लावणी देऊनही ‘या’ संगीतकाराला का डच्चू मिळाला?
============
त्यामुळे मनोज कुमारने (Manoj Kumar) डॉन सिनेमासाठी दिलेला शब्द ते टाळणे शक्यच नव्हते.) आणि काम करायला तयार झाले. अशा अर्थाने चित्रपटाची निर्मिती १९७४ साली सुरू झाली. परंतु या दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. सेटवर झालेल्या एका एक्सीडेंट मध्ये निर्माते नरीमन इराणी यांचे अकाली निधन झाले. पुन्हा हा चित्रपट बंद पडला. पण नंतर सर्वांनी इराणी यांच्या कुटुंबीयांना मदत व्हावी म्हणून चित्रपट पूर्ण केला. या सिनेमाचे अजिबात प्रमोशन केले नाही. कारण तेवढे पैसे कुणाकडे नव्हते. प्रिंट मीडियामध्ये काही जाहिराती देऊन हा सिनेमा प्रदर्शित केला. सुरुवातीला या सिनेमाकडे पब्लिकमध्ये दुर्लक्ष केले पण हळूहळू मात्र डॉन ने वेग पकडला. यातील गाणी आणि विशेषत: ‘खाई के पान बना रस वाला… प्रचंड गाजले आणि सिनेमाकडे पब्लिक येऊ लागली. सिनेमा सुपर डुपर हिट ठरला.इराणी यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करून त्यांना आर्थिक अनिष्टातून बाहेर काढले गेले! या सर्व संघर्षात मनोजकुमार यांचे कॉन्ट्रीब्युशन खूप मोठे आणि मोलाचे होते.