रसिकांच्या मनात घर करून राहिलेली ‘कथा’
समाजातील मध्यमवर्गीय घटकाच्या सुख दु:खाला, रूढी परंपरा या संस्कारांना जपत आयुष्यातील संकटांना हसतमुखाने सामोरे जाणार्या त्यांच्या विजिगिषु वृत्तीला रूपेरी पडद्यावर कधी फारसं स्थान मिळालंच नाही. सिनेमात कायम दोनच वर्ग. एक अमीर आणि दुसरा गरीब. पण मराठी साहित्यात जसं वपु काळे, शं.ना.नवरे, विद्याधर पुंडलीक यांनी या वर्गाचे जीवन समाजापुढे आणले तसेच ऋषिकेश मुखर्जी, बासु चटर्जी आणि सई परांजपे यांनी काही प्रमाणातून सिनेमात दाखविले.
श.गो साठे यांच्या ससा आणि कासव या कथेवर सई परांजपे यांनी १९८४ साली एक अप्रतिम चित्रपट बनविला होता ’कथा’(Katha). प्रत्येक चमकणारी गोष्ट काही सोनं नसते आणि असे जरूरी नाही की, जी गोष्ट वरून चांगली दिसते ती तशी असेलच. असा युक्तीवाद मांडत सईने ही कथा फुलविली. मध्यमवर्गीय मुलीचे एक स्वप्न असते; जे सुख मला माहेरी मिळालं नाही त्याची पूर्तता लग्नानंतर व्हावी. चांगल्या सुखाची अपेक्षा करणं काही गैर नाही पण सुख सुख म्हणून आपण ज्याला भुलतोय ते खरंच तसं असतं कां? खरं तर हा तसा गंभीर विषय पण सईने आपल्या खास कौशल्याने त्याला इतकं सुंदर रीतीने फुलविलं की, आज देखील या सिनेमाचा फ्रेशनेस मनाला भावून जातो.
ही कथा (Katha) एका चाळीत घडते. (याचे बरेचसे शूट पुण्यातील नारायण पेठेतील साळुंके चाळीत आणि चर्चगेट जवळच्या सरस्वती चाळीत केले गेले.) सतत दुसर्यांच्या सुखाचा विचार करणारा सभ्य, शालीन नायक राजाराम पुरूषोत्तम जोशी रंगविला होत नसिरूद्दीन शहाने. शेजारच्या घरातील ज्या मुलीवर नायक मनातल्या मनातल्या प्रेम करून तिच्या सोबत संसाराची स्वप्ने बघत असतो ती नायिका संध्या सबनीस रंगवली होती दिप्ती नवलने. गुलछबू , बेफिकीर ,बेरकी तितकाच स्वार्थी अशी बासुची व्यक्ती रेखा रंगवली होती फारूख शेखने! तसं म्हटलं तर मुख्य पात्रे तीनच.
पण चाळीतल्या गमती जमती, जीवाला जीव देणारी त्यांची निर्व्याज्य प्रेमाची नाती, रूसवे फुगवे, राग अनुराग या सर्वांचे सईने इतके जिवंत आणि रसरशीत चित्रीकरण केले की, चाळीतील भावजीवन पुलच्या नंतर पहिल्यांदाच अनुभवायला मिळालं. बासु सवईप्रमाणे फ्लर्टींग करीत चाळीतील सर्वांचे मन जिंकतो. संध्या देखील त्याच्या ’स्टाईल’ने प्रभावित होते. बासु इकडे राजारामच्या बॉसला पटवून वरच्या पदाची नोकरी मिळवितो वर बॉसच्या बायकोला (मल्लीका साराभाई) व मुलीला (विनी परांजपे) देखील आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतो. संध्या बेगडी सुखाला भुलते. शेवटी सर्वांना धोका देऊन बासु एका अरबा सोबत दुबईला पळून जातो! या चित्रपटात फारुक शेख यांचे नाव ‘बासू’ ठेवण्यामागे एक गमतीशीर कारण आहे. सई परांजपेचा यापूर्वीचा चित्रपट ‘स्पर्श’ ज्याचे निर्माते बासू भट्टाचार्य होते; त्यांनी सई परांजपेला या सिनेमाच्या वेळी खूप त्रास दिला होता. प्रचंड वैताग दिला होता. त्यामुळे चिडून तिने ‘कथा’ या चित्रपटातील लबाड स्वार्थी नायकाला नाव ‘बासू’ दिले!
==========
हे देखील वाचा : ‘या’ फिल्मचा हँडसम हिरो अरविंद स्वामी गेला कुठे?
=========
आता मात्र राजाराम तिला आधार देतो आणि आपल्या प्रेमाचा पहिल्य़ांदाच इजहार करतो. शेवट अर्थातच गोड. ही कथा (Katha) खुलविण्यासाठी सई ने नाना क्लृप्त्या केल्या. त्यामुळे सिनेमाला एक इमोशनल टच लाभलाय. नासिर, फारूख आणि दिप्ती या तिघांचा नैसर्गिक अभिनय इतका सुंदर परत पाहायला मिळाला नाही. चार्मिंग गर्ल दिप्ती नवल तिच्या साधेपणातील देखणं सौंदर्य, वेणीचा शेपटा झटक्यात मागे टाकण्याची तिची अदा, तिचं लोभस हास्य रसिक आजही विसरले नाहीत. सिनेमाच्या यशाचे सर्वाधिक गुण मात्र सई परांजपेला द्यायला हवेत. १९८३ सालच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ’कथा’ला सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमाचे पारीतोषिक मिळाले होते.