‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
भीमसेन जोशी यांनी अधिकचे पैसे घ्यायला दिला नकार
पंडित भीमसेन जोशी (Bhimsen Joshi) म्हणजे आभाळा एवढ्या उंचीचा कलावंत. ते कलावंत म्हणून जितके महान होते तितकेच महान व्यक्ती देखील होते. त्यांच्या एका लोकप्रिय गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळच्या किस्स्यामधून ही बाब स्पष्ट होते. १९६३ साली वाडिया मूवी ब्रदर्स एक चित्रपट बनवत होते ‘स्वयंवर झाले सीतेचे’ या सिनेमात लंकाधिपती रावण यांच्यावर एक गाणे चित्रित होणार होते. ते गीत लिहिले होते, ग दि माडगूळकर यांनी तर संगीत होतं वसंत देसाई यांचे. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते मधुकर पाठक. गाणं तर जबरदस्त लिहिले होते. या गाण्यासाठी तितकाच तोलामोलाचा गायक हवा होता. जेव्हा याची चर्चा सुरू झाली तेव्हा एकच नाव सर्वांच्या डोळ्यापुढे आलं पंडित भीमसेन जोशी यांचे.
चित्रपटाचे दिग्दर्शक मधुकर तथा बाबा पाठक पंडित भीमसेन जोशी (Bhimsen Joshi) यांना भेटण्यासाठी पुण्याला आले व त्यांनी गाण्याबद्दलची माहिती त्यांना दिली. तेव्हा पंडितजी म्हणाले,”मी गाणं नक्की घेईल पण या गाण्याचे मला दीड हजार रुपये मानधन मिळाले पाहिजे.” मधुकर पाठक म्हणाले,” ठीक आहे आम्ही दोन हजार रुपये देतो पण रेकॉर्डिंग मात्र मुंबईला होईल.” तेव्हा पंडितजींची पत्नी आजारी होती आणि त्यासाठी त्यांना पैशाची निकड होती म्हणून त्यांनी मानधन सुरुवातीला सांगितले.रेकॉर्डिंगसाठी पंडितजी मुंबईला आले. दादरच्या पोर्तुगीज चर्च जवळच्या बॉम्बे लॅब मध्ये गाण्याचे रेकॉर्डिंग होते. पंडित भीमसेन जोशी गाणार म्हणून सर्व वाडिया कुटुंब तिथे उपस्थित होते. त्यांचे अनेक मित्र देखील तिथे आलेले होते. पंडितजींनी आल्यावर गाण्याच्या कागदावर नजर टाकली. संगीतकार वसंत देसाई यांनी गाण्याची चाल समजावून सांगितली.
पंडितजींनी एक दोनदा गुणगुणून पाहिली. मग त्यांनी गाऊन दाखवली सर्वांनी टाळ्या वाजवल्या. गाण्याची रिहर्सल उत्तम झाली होती. संगीतकार वसंत देसाई म्हणाले,” आता फायनल टेक घेऊयात.” तेव्हा पंडितजी म्हणाले,” थांबा मी आता आलोच!” असे म्हणून मधुकर पाठक यांना घेऊन ते बाहेर पडले. संगीतकार वसंत देसाई यांना संशय आला. त्यांनी मधुकर पाठक यांना खुणेनेच सांगितले,” आता पंधरा मिनिटांनी रेकॉर्डिंग आहे. त्यांना ‘काही’ घेऊ देऊ नकोस!” लिफ्टने मधुकर पाठक आणि पंडितजी खाली आले. तिथून चालतच एका इमारतीपाशी ते गेले. मधुकर पाठक यांनी त्यांना आपल्या गाण्याच्या रेकॉर्डिंगची आठवण करून दिली परंतु पंडितजींनी,” अरे काही होत नाही रे” असे म्हणून ते आत जाऊन त्यांचे आवडीचे कृत्य करून आले. बाहेर येऊन एका पान वाल्याकडे गेले आणि मस्त पान खात ते रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आले. वसंत देसाई यांच्या लक्षात आले. त्यांनी डोक्याला हात लावला. आता रेकॉर्डिंग कसे होणार? निर्माते वाडिया, त्यांचे कुटुंब, त्यांचे मित्र सर्व आलेले आहेत त्यांच्यासमोर काही प्रॉब्लेम व्हायला नको ही चिंता त्यांना वाटू लागली.
पंडितजी आले बैठकीवर बसले. त्यांच्यासमोर मोठा माईक आला आणि त्यांनी वसंत देसाई यांना हातानेच खूण केली आणि म्हणाले,” चला फायनल टेक घेऊयात!” अशा पद्धतीने त्यांनी मोठ्या जल्लोषात” रम्य ही स्वर्गाहून लंका” हे गाणे रेकोर्ड केले. सर्वांना खूप आवडले. पण पंडित जी स्वतःच म्हणाले,” आपण आणखी एक टेक घेऊया. मला दुसऱ्या कडव्यात थोडासा प्रॉब्लेम वाटतो. तुम्हाला जो टेक ओके वाटेल तो ठेवा.” पंडितजींनी पुन्हा एकदा संपूर्ण गाणे रेकॉर्ड केले. सर्वांना खूप आवडले. वसंत देसाई यांनी तर सुटकेचा निश्वास सोडला. त्यांना जी भीती वाटत होती ती कुठल्या कुठे पळून गेली. उलट पंडितजींनी अतिशय जल्लोषामध्ये आणि भावोत्कट पद्धतीने ते गाणं गायलं!
त्यानंतर पंडितजी म्हणाले,” थांबा, मला आणखी गायचे आहे!” वसंत देसाई यांना प्रश्न पडला. रेकोर्डिंग तर झाले मग आता काय गायचे आहे? पंडितजींनी आचरेकर या तबलजीना खूण केली आणि ‘बाबुल मोरा नैहर छूटो भी जाय…’ ही भैरवी आळवायला सुरुवात केली. पुढचा एक तास भर संपूर्ण हॉल पंडितजीच्या सुरांनी भरून गेला. पंडित भीमसेन जोशी (Bhimsen Joshi) यांनी अतिशय तन्मयतेनं ती भैरवी गायली. रसिकांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रूंच्या धारा वाहू लागल्या, भैरवी संपली. ही अनपेक्षित आणि सुखद मैफल उपस्थितांना ऐकायला मिळाली. सर्वजण निघाले.
=========
हे देखील वाचा : किशोर कुमारने ‘या’ चित्रपटासाठी एकही पैसा न घेता गाणे गायले.
=========
जाताना एक पाकीट पं. भीमसेन जोशी (Bhimsen Joshi) यांच्या हातात दिले. कारमध्ये बसताना भीमसेनजींनी ते पाकीट उघडून पाहिले. पाकिटात तब्बल पाच हजार रुपये ! त्यांनी लगेच मधुकर पाठक यांना बोलावून सांगितले,” हे पैसे जास्त आहेत. आपले फक्त दोन हजारच ठरले होते!” त्यावर पाठक म्हणाले “वाडियासाहेबांनी गाण्याचे पैसे दिलेत पण तुम्ही जी भैरवी ऐकवली त्याचे वेगळे पैसे त्यांनी दिलेले आहेत!” त्यावर पंडित भीमसेन जोशी म्हणाले,” ती भैरवी मी माझ्या आनंदासाठी तुम्हाला ऐकवली. त्याचे कसले पैसे ? त्याचे पैसे मी घेणार नाही!” वाडिया साहेबांनी खूप आग्रह केला परंतु त्यांनी विनम्रपणे ते तीन हजार रुपये परत केले. मित्रांनो, लक्षात घ्या तिकडे पुण्याला भीमसेन जोशी यांच्या पत्नी आजारी होत्या. दवाखान्यात ऍडमिट होत्या. पैशांची त्यांना गरज होती. असे असतानाही त्यांनी ते पैसे परत केले. माणसाचं मोठेपण अशा गोष्टीतूनच सिद्ध होत असतं!