ऐंशीच्या दशकातला ‘हा’ अभिनेता आहे अमेरिकेतील मनोरुग्णालयात
सत्तरच्या दशकाच्या मध्यावर एक चित्रपट आला होता ‘कागज की नाव’. बी आर इशारा दिग्दर्शित हा चित्रपट आज कुणालाही आठवण्याची सुतराम शक्यता नाही. पण या चित्रपटातून राजकिरण या देखण्या अभिनेत्याने हिंदी सिनेमात एन्ट्री केली होती. काय दुर्दैव असते पहा या चित्रपटाच्या नावाला साजेसच आयुष्य या अभिनेत्याला जगावं लागलं. अक्षरशः कागदाची नाव पाण्यात ज्याप्रमाणे धक्के खात इकडून तिकडे मिळेल त्या दिशेला जात असते आणि त्याच डोहात जलसमाधी घेते अगदी तसंच आयुष्य राजकिरण या अभिनेत्याच्या बाबतीत घडलं. आज अभिनेता राजकिरण जिवंत आहे की नाही, हे देखील कुणाला माहिती नाही ! अतिशय दुर्दैवी आणि हृदय द्रावक अशी त्याची कहाणी आहे.
१९ जून १९४९ या दिवशी त्याचा जन्म झाला. संपूर्ण नाव राजकिरण महतानी. सिंधी परिवारात जन्मलेल्या राजकिरणला अभिनयाची आवड होती. १९७५ साली बी आर इशारा यांनी सारिका सोबत त्याला ‘कागज की नाव’ या चित्रपटासाठी साईन केले. हा चित्रपट बनायला बराच काळ गेला आणि कसाबसा मॉर्निंग शो मध्ये हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमातील ‘हर जनम मे हमारा मिलन’ हे गाणं त्या काळात खूप गाजलं होतं. चित्रपट चालला नाही पण राजकिरण अभिनेता म्हणून निर्मात्यांच्या लक्षात आला. राजश्री प्रोडक्शनच्या ‘शिक्षा’ या चित्रपटात त्याला मुख्य भूमिका मिळाली आणि तो राजश्री या चित्र संस्थेचा लाडका नायक बनला. (America)
नंतर मनोकामना, मान अभिमान या त्यांच्या चित्रपटातून तो झळकत राहिला. त्याची रोमँटिक इमेज निर्माण झाली पण सिनेमा मिळण्यात सातत्य नव्हते. सुभाष घई यांनी १९८० सालच्या ‘कर्ज’ या मेगा प्रोजेक्ट चित्रपटात त्याला सहाय्यक अभिनेत्याची भूमिका दिली आणि हा चित्रपट प्रचंड गाजला. यानंतर यश चोप्रांच्या ‘बसेरा’,’नाखुदा’ या चित्रपटात त्याने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका केली. १९८३ साली आलेल्या महेश भट यांच्या ‘अर्थ’ या चित्रपटाने राजकिरण प्रचंड लोकप्रिय ठरला. शबाना आजमी सोबतच्या चित्रपटातील त्याच्यावर चित्रित झालेल्या गझल्स रसिकांना खूप आवडल्या.’तुम इतना जो मुस्कुरा रहे हो क्या गम है जिसको छुपा रही हो…’ जगजित सिंह यांनी गायलेली ही गझल राजकिरण साठी सिग्नेचर सॉंग ठरले.(America)
त्यानंतर त्याला चित्रपट मिळत होते पण तो फारसा कोणाच्या लक्षात येत नव्हता. नव्वदच्या दशकात तो छोट्या पडद्याकडे वळला. शेखर सुमन सोबत त्याने रिपोर्टर ही विधु विनोद चोप्रा यांची मालिका केली. नव्वदच्या दशकात नवीन स्टार्सची बॉलीवूडमध्ये एन्ट्री झाली आणि सहाजिकच राजकिरण मागे पडत गेला आणि हळूहळू तो डिप्रेशनमध्ये गेला. नव्वदच्या दशकामध्ये त्याला मध्य मुंबईतील भायखळा येथील एका मनोरुग्णालयात ठेवण्यात आले. काही दिवसांनी तो बाहेर आला. असे म्हणतात, दिलीप कुमार दिग्दर्शित ‘कलिंगा’ या चित्रपटात त्याला भूमिका मिळाली होती, पण प्रकृतीच्या कारणाने त्याला ती करता आली नाही. नंतर तो चित्रपटच डब्यात गेला. बॉलिवूडला रामराम ठोकून राजकिरण त्याच्या मोठ्या भावाचा बिजनेस सांभाळण्यासाठी अमेरिकेला (America) गेला पण दुर्दैव येथेही त्याची पाठ सोडत नव्हते. बिजनेस तर काही करता आलाच नाही पण तो चक्क तिथे कॅब ड्रायव्हर झाला.
=========
हे देखील वाचा : अभिनेता जितेंद्र सोबत अभिनेत्री साधना? एक हुकलेला योग !
=========
पुढची दहा एक वर्ष त्याच्याबद्दल काहीच ऐकू येत नव्हतं. या काळात अभिनेत्री दीप्ती नवलने २००७ साली एक फेसबुक पोस्ट टाकली. दीप्ती नवलच्या १९८७ सालच्या ‘हिप हिप हुर्ये’ या चित्रपटात राजकिरण तिचा नायक होता. तिने या पोस्टमध्ये ‘राजकिरण आता कुठे आहे?’ याबद्दल पोस्ट लिहिली होती. २०११ साली अभिनेता ऋषी कपूर जेव्हा अमेरिकेत गेला तेव्हा त्याने राजकिरणच्या मोठ्या भावाशी संपर्क साधला. भावाने सांगितले की ,”राजकिरण जिवंत आहे पण अटलांटा येथील एका मेंटल असायलम मध्ये तो आहे!” राजकिरण यांची पत्नी आणि मुलगी यांनी मात्र ऋषी कपूर यांचा हा दावा खोडून काढला. त्यांनी सांगितले,” आम्ही गेली पाच वर्ष राजकिरण यांना शोधत आहोत. न्यूयॉर्कमधील पोलीस देखील त्याचा शोध घेत आहे. आम्ही एका प्रायव्हेट डिटेक्टिव्ह कडून देखील त्याच्या शोधात आहोत. ऋषी कपूर कुठलेही तथ्य नसलेल्या गोष्टी सांगत आहेत!”
त्यानंतर मागची दहा-बारा वर्षे राजकिरण बाबत कुठलीही बातमी ऐकायला मिळाली नाही. आज हा अभिनेता जिवंत आहे का ? कुठे आहे ? कसा आहे ? काहीच कल्पना नाही. एक हँडसम, सहृदयी हसतमुख नायकाच्या भूमिका करणाऱ्या राजकिरणच्या आयुष्यामध्ये मात्र कायम अंधारच आला.