दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
दिलीप कुमार म्हणाले अनुपम तू एक…
दिग्दर्शक सुभाष घई यांनी ८ ऑगस्ट १९८६ रोजी एक मल्टीस्टार चित्रपट दिग्दर्शित केला होता ‘कर्मा’. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात दिलीप कुमार (Dilip Kumar) आणि नूतन पहिल्यांदाच एकत्र आले होते अर्थात दोघेही चरित्र भूमिकामध्ये होते. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, नसरुद्दीन शहा, अनिल कपूर, पूनम धिल्लन, श्रीदेवी यांच्या देखील प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेत अनुपम खेर पहिल्यांदाच दिलीप कुमारच्या सोबत काम करत होते. मध्यंतरी रेडीओ वर एका मुलाखतीत अनुपम खेर यांनी या चित्रपटातील चित्रीकरणाच्या दरम्यानच्या काही आठवणी शेअर केल्या होत्या.
या ‘कर्मा’ चित्रपटांमध्ये दिलीप कुमार (Dilip Kumar) आणि अनुपम खेर यांची खऱ्या अर्थाने जुगलबंदी आपल्याला दिसली होती. यात एका प्रसंगात अनुपम खेर दिलीप कुमारला खूप खरी खोटी सुनावतो. दिलीप कुमारचा राग अनावर होतो आणि दिलीप कुमार त्याला एक जोरदार थप्पड मारतो. त्यावर अनुपम खेर याचा तो सुप्रसिद्ध डायलॉग ‘इस थप्पड की गुंज तुम्ही जिंदगीभर सुनाई देंगी…’ या चित्रीकरणाच्या वेळी अनुपम खेर यांनी दिलीप कुमार यांना “तुम्ही मला खरोखरचीच थप्पड मारा!” असे सांगितले.” त्याशिवाय शॉर्ट मध्ये जिवंतपणा येणार नाही” असे देखील त्यांनी सांगितले. पण दिलीप कुमार यांनी सांगितले ,”मी खरी थप्पड मारणार नाही पण शॉट जिवंत होईल याची खात्री बाळग.” पुढे हसत हसत दिलीपकुमार त्याला म्हणाले “हा एका पठाणाचा हात आहे तो जर खरोखरच तुझ्या गालावर पडला तर मुश्किल होईल!” दिलीप कुमार यांनी तो शॉट जबरदस्त दिला. खरी थप्पड न मारता! यावेळी दिलीप कुमार आणि अनुपम खेर दोघे सेटवर शूटिंग नसताना भरपूर गप्पा मारत. ते म्हणाले “ तू एन एस डी चा गोल्ड मेडलीस्ट आहेस. तुझा चेहराच सर्व सांगून जातो. तुला खरी थप्पड मारून तुझ्याकडून अभिनय करवून घ्यायची काय गरज? तू नैसर्गिक अभिनय करणारा कलावंत आहेस.” दिलीपच्या प्रशंसेने अनुपम खुलला होता. (Dilip Kumar)
अनुपम खेर यांनी त्या मुलाखतीत असे सांगितले की, “दिलीप कुमार हे कायम दुसऱ्याचं काळजीपूर्वक ऐकून घ्यायचे, व्यवस्थित ऐकून घेत असत. मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा विद्यार्थी होतो गोल्ड मेडलिस्ट होतो याचा त्यांना अभिमान होता. ते कायम मला या अभ्यासक्रमाबद्दल विचारायचे. तुम्हाला कशाप्रकारे शिकवले जाते ? त्यावेळेला मी त्यांना तुमचे उच्चार स्पष्ट होण्यासाठी स्पीच थेरेपी कशी दिली जाते हे सांगितले. दिलीप कुमार यांनी खूप काळजीपूर्वक ऐकून माझ्याकडून स्पीच थेरपी शिकून देखील घेतली. खरंतर दिलीप कुमार त्यावेळी अभिनयाचे स्वतःच एक इन्स्टिट्यूशन होते. पण तरीही त्यांना दुसऱ्याकडून शिकून घेण्याची आवड होती” याच मुलाखतीत अनुपम खेर यांनी दिलीपकुमार सोबतच्या त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा विशद केला. तेव्हा अनुपम दिल्लीहून मुंबईमध्ये आले होते. त्यांना कोणीच ओळखत नव्हते. ते दिलीप कुमारचे प्रचंड फॅन होते. स्क्रीन या साप्ताहिकाची एक पार्टी होती. या पार्टीत बॉलीवूडचे सर्व कलाकार उपस्थित राहणार होते. पीटर अली जॉन या स्क्रीनच्या पत्रकाराची अनुपम खेर यांची ओळख होती. त्यांना “काही करून मला पार्टीमध्ये घेऊन जा!” अशी मी गळ घातली. त्याप्रमाणे अली पीटर जॉन अनुपम खेरला पार्टीत घेऊन गेले.
अनुपमसाठी तो एक स्वर्गीय सोहळा होता. कारण हिंदी सिनेमातील सर्व चमकते तारे त्या पार्टीला उपस्थित होते. अनुपम खेर सांगतात “तोच माझी नजर दरवाजाकडे गेली तर मला साक्षात दिलीप कुमार आणि सायरा बानू त्या पार्टीच्या ठिकाणी येताना दिसले. मी एखाद्या भक्ताने भगवंताकडे पहावे त्या श्रद्धेने मी त्यांच्याकडे बघत होतो. माझ्यासमोर जेव्हा दिलीप कुमार आले तेव्हा मी त्यांना सहज पणे ‘नमस्ते जी.. कैसे हो? असं विचारलं. त्यांना वाटलं कोणीतरी एक जुना ओळखीचा चेहरा आहे. पण आपल्याला नाव आठवतं नाही. त्यांनी लगेच माझा हात हातात घेतला आणि म्हणाले,” कहा रहते हो भाई? आज कल दिखाई नही देते. किधर हो तुम?” आणि असं म्हणत त्यांनी माझा हात हातात घेऊन संपूर्ण पार्टी ते फिरत राहिले. लोकांशी बोलत राहिले. अधून मधून मला विचारत होते “ यार मिलते रहना कभी कभी. आजकाल तो तुम ईद का चांद हो गये.” मला त्या क्षणी असं वाटलं की, संपूर्ण जगाने मला या रूपात पहावं. दिलीप कुमार स्वतः माझा हात हातात घेऊन एका मोठ्या पार्टीमध्ये इतरांशी बोलत आहेत आणि अधून मधून माझ्याशी बोलत आहे. माझा हात पकडून ते संपूर्ण पार्टीत फिरत आहेत. माझ्यासाठी तो आयुष्यभर जपून ठेवावा असा तो क्षण होता. त्यानंतर पुढचे अनेक दिवस मी माझा हात धुतलाच नाही. कारण तो स्पर्श, तो आनंद मला आयुष्यभरासाठी टिकवून ठेवायचा होता ! (Dilip Kumar)
===========
हे देखील वाचा : ऐंशीच्या दशकातला ‘हा’ अभिनेता आहे अमेरिकेतील मनोरुग्णालयात
===========
याच काळात मी दिलीप कुमार यांना माझ्या ‘कुछ भी हो सकता है..’ या नाटकाच्या प्रयोगाला बोलावले. दिलीप कुमार (Dilip Kumar) आणि सायरा बानो दोघेही या प्रयोगाला उपस्थित राहिले. नाटक संपल्यानंतर दिलीप कुमार स्टेजवर आले आणि म्हणाले,” यार बडे अजूबा कलाकार हो तुम. दो घंटे तक बिना थके आप बोलते रहते हो! और आपने मेरे बारे मे जो कहा की, उपरवाला दिलीप कुमार जैसा शख्स बडी मुश्किलसे सदियो मे एक बार धरती पर भेजता है; ऐसा नही है काफी लोग है जो मुझसे बेहतर एक्टिंग करते है!’ दिलीप कुमार यांच्यातील हा नम्रपणा मला आयुष्यभर लक्षात राहिला.” अनुपम खेर यांनी पुढे दिलीप कुमार सोबत इज्जतदार, कानून अपना अपना आणि सौदागर या तीनही चित्रपटात भूमिका केल्या!