‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
धर्मेंद्रला खऱ्या अर्थाने स्टारडम मिळवून देणारा सिनेमा !
अख्ख बॉलीवूड ज्याला ही मॅन म्हणून ओळखतो त्या धर्मेंद्रने आता वयाची नऊ दशक पार करत असला तरी त्याची रसिकांमधील लोकप्रियता कायम आहे. काही दिवसापूर्वी करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात धर्मेंद्रचे दर्शन झाले होते. यात धर्मेंद्र आणि शबाना आजमी यांचे एक चुंबन दृश्य देखील होते ! त्याचे फिजिक, त्याची बॉडी, त्याचा डान्स, त्याची ॲक्शन, त्याची कॉमेडी, त्याचं गाणं सर्वच गोष्टींवर पब्लिक फिदा असतं. अलीकडचा काळ हा सिक्स पॅकचा जमाना आहे. शर्ट काढून आपले व्यायामाने कमावलेले उघडे शरीर दाखवण्याचा ट्रेंड हिरोमध्ये जोरात आहे. सलमान खान याबाबतीत अग्रेसर आहे. पण पन्नास वर्षांपूर्वी धर्मेंद्रने हा ट्रेंड सुरू केला असे म्हणता येईल. धर्मेंद्रने पहिल्यांदा आपली बॉडी कधी दाखवली होती ? कोणत्या चित्रपटापासून धर्मेंद्रला ही मॅन म्हणून ओळखायला लागले ? कोणत्या सिनेमा (Cinema) पासून त्याला खऱ्या अर्थाने स्टारडम मिळाले ?
या साऱ्या प्रश्नांची उत्तरे म्हणजे १९६६ साली प्रदर्शित झालेला ‘फूल और पत्थर’ हा सिनेमा. ओ पी रल्हन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात धर्मेंद्रची नायिका होती मीनाकुमारी. या सिनेमात पहिल्यांदा धर्मेंद्रने आपला शर्ट स्टाईल मध्ये उतरवून टॉपलेस होऊन आपले शरीर सौष्ठव पहिल्यांदा दाखवले होते. त्याची ही शर्ट स्टाईल मध्ये उतरवण्याची अदा इतकी लोकप्रिय झाली की हा सिनेमा (Cinema) बंपर हिट ठरला. १९६६ सालचा सर्वाधिक बॉक्स ऑफिसवर कलेक्शन करणारा ‘फूल और पत्थर’ हा चित्रपट होता. तसा धर्मेंद्रने शर्ट त्याच्या पहिल्याच चित्रपटात उतरवला होता. हा चित्रपट १९६० सालचा होता. चित्रपटाचे नाव होते ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ (दि. अर्जुन हिंगोरानी) या सिनेमात त्याला एक बॉक्सिंग शॉट करायचा होता. त्यात त्याने आपला शर्ट उतरवला होता. पण त्याची ही टॉपलेस अदा त्यावेळी कोणाच्या लक्षात आली नाही. यानंतर धर्मेंद्रने ‘अनपढ’ आणि ‘बंदिनी’ हे दोन नायिका प्रधान चित्रपट केले. १९६४ साली त्याने चेतन आनंद यांचा ‘हकीकत’ हा युद्धपट देखील केला. पण या मल्टीस्टारर चित्रपटात तो अनेकांमधील एक होता. त्यामुळे त्याची फारशी दखल इथे देखील घेतली नाही. याच वर्षी म्हणजे १९६४ साली ‘आई मिलन की बेला’ या चित्रपटात राजेंद्रकुमार नायक होता तर धर्मेंद्र हा सेकंड लीड होता. काहीशी खलनायकी स्वरूपाची त्याची भूमिका होती. अशा पहिल्या पंचवार्षिक योजनेत धर्मेंद्र फारसा कुणाच्या नजरेत भरला नाही. (Cinema)
पण १४ ऑगस्ट १९६६ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘फूल और पत्थर’ या चित्रपटापासून त्याला पब्लिकने स्वीकारले. या चित्रपटातील शर्ट स्टाईल मध्ये काढण्यास चा शॉट खरंतर त्याने मीनाकुमारीसाठी दिलाच नव्हता. या चित्रपटातील या शॉट मध्ये धर्मेंद्र रात्री दारू पिऊन आपल्या मोहल्ला मध्ये येत असतो तिथे त्याला एक अंध भिकारी लीला चिटणीस दिसते ती थंडीने कुडकुडत असते. तिची दया येऊन धर्मेंद्रने आपला शर्ट काढून तिच्या अंगावर टाकलेला असतो आणि तसंच तो शर्टलेस टॉपलेस अवस्थेत मीनाकुमारीच्या घरात पोहोचतो. तिथे मीनाकुमारी झोपेचे नाटक करत असते. पण इथे देखील तिला तो स्पर्श देखील करत नाही उलट तिच्या पाया जवळचे पांघरून तिच्या अंगावर टाकतो. हा शॉट पब्लिक ला प्रचंड आवडला. (Cinema)
===========
हे देखील वाचा : ‘या’ गायकाच्या एका ‘धुंद’ गीताचा रसिला किस्सा !
===========
धर्मेंद्रने एका मुलाखतीत सांगितले होते की, या शॉटची संपूर्ण संकल्पना ही त्याची स्वतःची होती आणि त्यानेच दिग्दर्शकाला सांगितले होते. दिग्दर्शकाला देखील हा शॉट इतका आवडला की या सिनेमाच्या (Cinema) पोस्टरवर याचे दर्शन घडले.यातील धर्मेंद्र ने रंगवलेल्या ‘शाका’ या रफ आणि टफ भूमिकेला रसिकांची दाद मिळालीच शिवाय फिल्मफेयर चे नामांकन देखील मिळाले. या सिनेमाचे चमकदार संवाद अख्तर उल इमान यांनी लिहिले होते. सिनेमाला संगीत रवि यांचे होते. दिग्दर्शक रल्हन आणि धर्मेंद्र यांचे या सिनेमाच्या शुटींगच्या दरम्यान जोरदार भांडण झाले होते. त्या मुळेच कदाचित इतका हिट सिनेमा देवून दोघे परत एकत्र आले नाही. (शालीमार सिनेमात रल्हन यांनी अभिनय केला.) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट. तर ठरलाच पण इथूनच धर्मेंद्र आणि मीनाकुमारी यांच्या प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली. नंतर त्यांनी बहारों की मंजिल, मझली दिदी, चंदन का पलना हे चित्रपट केले.