‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या प्रेम अदिब यांचा जीवनप्रवास
पौराणिक चित्रपटांचा एकेकाळी भारतीय सिनेमांमध्ये फार मोठा वाटा होता. या चित्रपटांनी संपूर्ण देशात प्रचंड यश मिळवले होते. भारतीयांना आपल्या संस्कृती, पुराणकथा, रामायण, महाभारत याची खूप आवड असल्यामुळे असे चित्रपट एकेकाळी खूप चालायचे. यात्रा, उत्सव, सण, समारंभ या काळात हे चित्रपट हमखास पुन्हा पुन्हा रिलीज व्हायचे आणि चांगला व्यवसाय करून जायचे. (Prem Adib)
ऐंशीच्या दशकामध्ये रामानंद सागर यांनी ‘रामायण’ ही दूरदर्शन मालिका निर्माण केली. तेव्हापासून ‘प्रभू रामचंद्र म्हणजे अरुण गोविल’ असे एक समीकरणच तयार झाले. अर्थात दूरदर्शन मालिका घराघरात आणि मोफत गेल्यामुळे हा इम्पॅक्ट खूप मोठा होता. पण त्याच्या ही पूर्वी चाळीस आणि पन्नास च्या दशकामध्ये एका कलाकाराने ‘सिल्वर स्क्रीनवरील राम’ ही त्याची पक्की ओळख निर्माण केली होती. आज हा अभिनेता संपूर्णपणे विस्मृतीत गेला असला तरी त्याची आठवण अनेक अर्थाने ठेवणे गरजेचे आहे. कोण होता हा अभिनेता? कोणत्या चित्रपटात त्याने रामाच्या भूमिका केल्या होत्या? हा अभिनेता होता प्रेम अदिब. नावावरून कदाचित हे नाव एखाद्या मुस्लिम व्यक्तीचे वाटू शकते पण तसे नव्हते. प्रेम अदिब हा हिंदू कश्मीरी ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेला कलाकार होता. १० ऑगस्ट १९१६ या दिवशी जन्माला आलेल्या प्रेम अदिब यांचे मूळ नाव शिवनारायण धर असे होते. ते मूळचे कश्मीरचे पण त्यांचे आजोबा उत्तर प्रदेश मध्ये आले होते. तिथे नवाब वाजिद अली शहा या राजाकडे ते शायर म्हणून होते. त्यांची शायरी वाजिद अली शहा यांना खूप आवडत असल्यामुळे त्यांनी त्यांना अदिब हे नाव दिले. अदिबचा अर्थ खूप आदरार्थी ! (Prem Adib)
प्रेम अदिब यांचे शालेय शिक्षण उत्तर प्रदेश मध्ये झाले. त्यांना पहिल्यापासूनच चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून ते कलकत्त्याला निघून गेले. तिथे अनेक स्टुडिओ त्यांनी पालथे घातले पण त्यांना काम काही मिळाले नाही. तिथून ते सरळ लाहोरला गेले पण तिथून देखील हात हलवत परत आले. शेवटी ते महानगरी मुंबईमध्ये आले आणि इथे त्यांचा भाग्योदय झाला. त्यांचा पहिला चित्रपट १९३६ साली आला होता आणि पहिल्यांदा नायक म्हणून ते १९३९ झाली पडद्यावर आले. यात त्यांची नायिका होती शोभना समर्थ. (अभिनेत्री नूतन आणि तनुजा यांची आई आणि अभिनेत्री काजोल ची आजी) या जोडीला घेऊन प्रकाश पिक्चर्स यांनी १९४२ साली ‘भरत भेट’ मराठीत तर ‘भरत मिलाप हा हिंदीत चित्रपट निर्माण केला. हा चित्रपट खूप गाजला. याच संस्थेने हीच जोडी कायम ठेवून १९४३ साली ‘राम राज्य’ हा चित्रपट निर्माण केला. हा चित्रपट देशभर प्रचंड गाजला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आयुष्यात पाहिलेला हा एकमेव हिंदी चित्रपट होता. या चित्रपटाने संपूर्ण हिंदुस्थानामध्ये मोठे व्यावसायिक यश मिळवले.
आज पाकिस्तान मध्ये असलेल्या लाहोर, कराची, रावळपिंडी इथे देखील या चित्रपटाला उदंड यश मिळाले. तिथे या चित्रपटाचे उर्दू भाषेमध्ये पोस्टर रिलीज करण्यात आले होते. प्रेम आदिब एका चित्रपटाने नॅशनल हिरो बनला. लोक त्याचे दिवाने झाले. नंतर आयुष्यात त्याने नऊ वेळेला राम रुपेरी पडद्यावर साकारला. त्या काळात कॅलेंडरवर प्रभू रामचंद्र म्हणून प्रेम आदीब यांचेच छायाचित्र प्रकाशित होत असे. इतकी प्रचंड क्रेझ निर्माण झाली होती. लोक त्यांची अक्षरशः पूजा करत. प्रेम आदिब रसिकांना सांगत,” मी तुमच्यासारखाच एक सामान्य माणूस आहे. माझी पूजा करून तुम्ही प्रभू रामचंद्राचा अपमान करू नका!” पण तरी देखील रसिक ते ऐकायला तयार नसे.राजस्थानातील उदयपूर जवळील एका राम मंदिरामध्ये रामाची जी मूर्ती आहे ती प्रेम आदिब यांना समोर ठेवूनच बनवण्यात आली होती. (Prem Adib)
लोकांचे त्यांच्यावर इतके प्रेम होते की एका चित्रपटाच्या चित्रीकरण्याच्या दरम्यान शॉट संपल्यानंतर प्रेम अधिक जेव्हा सिगारेट पिऊ लागला तेव्हा रसिक प्रचंड चिडले त्यांना मारायला धावले आणि त्याना धुम्रपाना पासून परावृत्त केले! त्यांच्या दृष्टीने ते प्रभू रामचंद्रच होते. प्रेम आदिब यांनी देखील नंतर धूम्रपान आणि मांसाहाराचा त्याग केला. १९४९ साली प्रेम आदिब यांनी ‘ रामविवाह’ हा चित्रपट स्वतः दिग्दर्शित केला. पन्नास च्या दशकात मात्र त्यांनी धार्मिक चित्रपटांच्या सोबतच काही सामाजिक चित्रपटात देखील भूमिका करायला सुरुवात केली. पण रसिकांना ते कायम राम म्हणूनच हवे होते. त्यामुळे त्याच्या इतर चित्रपटांना फारसे यश मिळत नव्हते.(Prem Adib)
===========
हे देखील वाचा : रागात लिहिलेले गाणे आज पन्नास वर्षानंतरही लोकप्रिय…
===========
त्या काळात काश्मीर मधून आलेल्या अनेक कलाकारांनी रुपेरी पडद्यावर चांगली यश मिळवले होते. त्यात जीवन, सप्रू, उल्हास हि नावे प्रामुख्याने घ्यावे लागतील. सर्व काही व्यवस्थित चालू असतानाच अचानकपणे २५ डिसेंबर १९५९ या दिवशी ब्रेन हॅमरेज होऊन प्रेम आदिब याला मरण आले. अवघे ४३ वर्षे आयुष्य लाभलेल्या प्रेम आदिब चाळीस आणि पन्नास चे दशक आपल्या रामाच्या भूमिकांनी गाजवून सोडले. त्यांची पत्नी प्रतिमा आदिब यांचे २०१६ साली निधन झाले म्हणजे तब्बल ५७ वर्ष त्या एकाकी होत्या. त्यांनी ‘बीते हुए दिन’ या वेब पोर्टलला मुलाखत देताना प्रेम आदिब यांच्या अनेक आठवणी शेअर केल्या.