विधू चोप्रा ४००० रुपयांसाठी अडवाणीजींशी भांडले!
मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई, ३ इडियट्स सारख्या पाथब्रेकिंग फिल्मसचे प्रोड्युसर विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) हे आधी दिग्दर्शक होते आणि आताही ते कधी कधी फिल्म्स दिग्दर्शित करतात. हे सगळे नाव मिळवायच्या आधी त्यांनी खूप संघर्ष केला होता आणि त्यातून ते आपल्या लढवय्या स्वभावामुळे निभावून गेले. विधू विनोद चोप्रा हे फिल्म इन्स्टिट्यूट मधून शिकलेले होते आणि फिल्म बनवण्याच्या बाबतीत ते प्रचंड पॅशेनेट आहेत. फिल्मच्या सर्वच बाबी व्यवस्थित व्हाव्यात म्हणून ते कोणताही डोंगर पार करायला रेडी असतात.
त्यांची ‘परिंदा’ फिल्म १९८९ साली रिलीज झाली होती आणि क्रिटिक्सनी त्याची खूप प्रशंसा केली होती. विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) यांना परिंदा फिल्मसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्याचा वितरण सभारंभ दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनात आयोजित केला होता. त्यावेळी विधू विनोद यांच्याकडे त्यावेळी काहीच पैसे उरले नव्हते. दिल्लीला ते १२०० रुपये उधार घेऊन पोहचले होते. तिकडे त्यांना पुरस्कार घेण्यासाठी बोलवले गेले. त्यांनी स्टेजवर जाऊन राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. ट्रॉफीसोबत ४००० रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.
त्यांना वाटले की ४००० रुपये कॅश असतील तर पाकीट थोडे जाड असेल पण ज्यावेळी पाकीट मिळाले तेव्हा ते खूपच छोटे होते. त्यांनी तात्काळ तिथेच उघडून पहिले तर त्यात पोस्टल बॉण्ड्स होते ज्याची किंमत ४००० रुपये होती. त्यांनी राष्ट्रपतींच्या शेजारी उभ्या असलेल्या अडवाणी यांना ही गोष्ट सांगितली, तेव्हा अडवाणी यांनी त्यांना समजावले की ७-८ वर्षात तुम्हाला डबल पैसे मिळतील.
विधू त्यांना बोलले की, मला तर आता लगेच कॅशची गरज आहे. वाटलं तर तुम्ही हे ठेवा पण मला कॅश द्या. तेव्हा अडवाणी बोलले की, असे नाही होत तुम्ही या आता.. पण विधू विनोद चोप्रा ऐकायला तयार नव्हते तेव्हा त्यांचे बोलणे इतका वेळा ऐकत असलेले राष्ट्रपती बोलले की, काही प्रॉब्लेम आहे का ? तर विधू विनोद चोप्रा यांनी त्यांना आपली समस्या सांगितली. राष्ट्रपती यांनी अडवाणी यांना मदत करण्यास सुचवले. त्यांना दुसऱ्या दिवशी शास्त्री भवनमध्ये बोलवले.
विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) यांना कळून चुकले की, आता स्टेजवर आपण घातलेल्या हुज्जतीमुळे आपल्याला खूप ओरडा पडणार आहे. ते जेव्हा शास्त्री भवनला पोहचले तेव्हा अडवाणी यांच्या केबिनमध्ये गेले. अडवाणी बोलले एवढा मोठा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आणि फक्त ४००० रुपयांसाठी तुम्ही भर समारंभात हुज्जत घातली. त्यांनी चोप्रा यांना आपल्या वडिलांना फोन करायला लावला.
=========
हे देखील वाचा : ‘या’ चित्रपटात जितेंद्र व मुमताजचे डबल रोल
=========
ते रिसिव्हर उचलून फोन करण्यासाठी नंबर डायलचं करत होते. तेव्हा त्यांच्या मनात काय विचार चमकला कुणास ठाऊक ते रिसिव्हर ठेऊन अडवाणीजींना एक प्रश्न केला की, तुम्ही सकाळी नाश्ता करून आलात का ? तेव्हा अडवाणीजी बोलले हो केलाय. विधू बोलले मी नाही केला कारण माझ्याकडे पैसे नाहीयेत मी एका व्यक्तीकडून १२०० उधार घेऊन आलोय. कारण मला ४००० रुपये मिळणार होते. काही पैसे प्रवास करण्यात गेले. काही कार्यक्रमासाठी कपडे घेण्यात गेले. इथे माझ्याकडे अंगावरील कपड्यांशिवाय बाकी काही नाहीये आणि आता माघारी जाऊन त्याला काय तोंड दाखवू ? चोप्रांची ही परिस्थिती ऐकून अडवाणीजीनां दया आली आणि पहिल्यांदा त्यांनी चोप्रा यांच्यासाठी नाश्ता मागवला आणि मग पैशाची तजवीज केली.