महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ ‘अशोक मा.मा.’ च्या निमित्ताने छोटा पडदा
‘तीसरी कसम’ एक शापित क्लासिक सिनेमा
हिंदी सिनेमाच्या इतिहासात असं बर्याचदा घडलेलं दिसतं ज्या ज्या वेळी खूप मन लावून एखादी कलाकृती बनवली जाते त्या त्या वेळी दुर्दैवाने त्या कलाकृतीला अपयशाचा सामना करावा लागतो. बिमल रॉयचा ‘देवदास’ (१९५५) गुरूदत्तचा ’कागज के फूल’ (१९५९) ,राजकपूरचा ’मेरा नाम जोकर’(१९७०) ही त्याची ज्वलंत उदाहरणं. यातच आणखी एक नाव आहे शैलेंद्रचा ‘तीसरी कसम’. (Classic cinema)
कालांतराने या सिनेमांची महती प्रेक्षकांना उशिरा कळते आणि रीपीट रन ला हे सिनेमे यशस्वी देखील होतात.पण प्रथम प्रदर्शनात त्यांना अपयशाचा सामना करावा लागतो. फणीश्वरनाथ रेणू यांनी ’मार गये गुलफाम’नावाची लघुकथा १९५४ साली लिहिली होती. संवेदनशील मनाच्या गीतकार शैलेंद्र यांना ही कथा वाचता क्षणी आवडली होती.
यावर एक चांगला चित्रपट निर्माण होवू शकेल असं त्यांना वाटत होतं. बरीच वर्षे मनात घोळत असलेल्या या विचारांना मूर्त स्वरूप १९६० साला नंतर आलं. शैलेन्द्र त्यावेळी चोटीचा गीतकार होता. हाती थोडा फार पैसा होता पण तरी शैलेंद्रच्या बर्याच मित्रांनी सिनेमा निर्मितीच्या फंदात पडू नको असाच सल्ला दिला. परंतु शैलेंद्र आपल्या निर्णयावर ठाम होता. याचं दिग्दर्शन बिमलदांनी करावं अशी त्यांची इच्छा होती पण बिमलदांनीच त्यांचे सहायक बासु भट्टाचार्य यांचे नाव सुचविले. (Classic cinema)
राजकपूरनेच यात काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याने शैलेंद्र खुश झाला. मग त्या पाठोपाठ वहिदा रहमान आली. राज-वहि्दा यापूर्वी १९६३ सालच्या ‘एक दिल सौ अफसाने’ मध्ये पहिल्यांदा एकत्र आले होते. सिनेमाची कथानक जबरदस्त होते. नौटंकीत काम करणार्या स्त्रियांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन त्यातून पुरूषी समाजसत्तेतून होणारे स्त्रियांचे शोषण हा मोठा विषय अतिशय सोप्या सुबोध शैलीत मांडला होता.नायक-नायिकांचे विशुध्द प्रेम हि कथानकाची मोठी जमेची आणि तसेच जोखमीची बाजू होती.
यात राज कपूरला ’जागते रहो’ नंतर प्रथमच नॉन ग्लॅमरस भूमिका मिळाली होती.खेड्यातील भोळा भाबडा दुसर्यांच्या बोलण्यावर चटकन विश्वास ठेवणारा गाडीवान हिरामन त्याने रंगवला होता. ही भूमिका करताना त्याचा नेहमीचा चार्ली ट्रॅम्प कुठे येणार नाही याची दक्षता घेतली. या सिनेमाचा आणखी एक प्लस पॉंईट म्हणजे यातील गाणी. (Classic cinema)
आ आभी जा चांद छुपने लगा, दुनिया बनाने वाले काहे को, चलत मुसाफिर मोह लिया रे, सजनरे झूट मत बोलो, सजनवा बैरी गो गये हमार, पान खाओ सैय्या हमारो…हि एस जें नी स्वरबध्द केलेली गाणी मस्त जमून आली होती. सिनेमाचे बजेटच कमी असल्याने हा सिनेमा कृष्णधवल होता. चित्रपटातील ग्रामीण भारतातील समाजजीवन,मूल्यांच्या प्रती असलेल्या त्यांच्या निष्ठा याचं अप्रतिम चित्रण होतं. सत्यजित रे यांच्या अप्पू ट्रॉयोलॉजी चे छायाचित्रकार सुब्रता मित्रा यांचे होते तर पटकथा नवेंदु घोष यांची होती.
===========
हे देखील वाचा : अमिताभचा राजकारणात गेल्यानंतरचा ‘हा’ पहिला सिनेमा
===========
मध्यप्रदेशातील बिना इथे चित्रपटाचे चित्रीकरण झाले. १९६२ साली चित्रपटाच्या निर्मितीची सुरूवात झाली पण पैशाच्या कमतरतेने शूटींग रखडत गेले. चित्रपटाचा शेवट काय असावा यावर मोठा वादंग झाला. वितरक अशा चित्रपटाला हात लावायला तयार नव्हते. भावना प्रधान शैलेंद्रला व्यवहारी जगातील ही क्रूरता सहन होत नव्हती. त्याच्या हळव्या मनाचा कोंडमारा होत होता. (Classic cinema)
शैलेंद्र यामुळे दिवसेंदिवस खंगत गेला. हिशेबी दुनियेतील व्यवहार त्याला कधी समजलेच नाही. सप्टेंबर १९६६ ला दिल्लीत सिनेमाचा प्रीमीयर झाला.उत्तरेत आधी रीलीज केला पण प्रेक्षकांना चित्रपट समजलाच नाही आणि आठवड्याच्या आत सिनेमा थिएटर वरून काढावा लागला. शैलेंद्रसाठी हा फार मोठा धक्का होता, या दु:खानेच वयाच्या अवघ्या ४३ व्या १४ डीसेंबर १९६६ ला तो हे जग सोडून गेला. आज या सिनेमाला आणि शैलेंद्रच्या निधनाला ५० वर्ष पुरी होताहेत.