दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
अमिताभ बच्चन आणि अमजद खान यांच्यातील याराना
‘शोले’ चित्रपटातील गब्बरसिंग भूमिका करणारे अमजद खान हे रंगभूमीवरील मोठे अभिनेते होते. ’शोले’ चित्रपटाने त्यांच्या आयुष्यात एकदम 360 डिग्रीचा फरक आला. ‘शोले’ तील लार्जर द्या लाइफ भूमिकेने त्यांच्याकडे निर्मात्यांचा प्रचंड ओढा सुरू झाला. त्यांनी देखील भरपूर सिनेमा साईन केले. यात एक चित्रपट होता शक्ती सामंत यांचा ‘द ग्रेट गॅम्बलर’. (Amitabh Bachchan)
आता तुम्ही म्हणाल, “ काय सांगता? आम्ही हा चित्रपट पाहिला त्यात आम्हाला कुठेच अमजद खान दिसले नाहीत!” बरोबर आहे. कारण या चित्रपटाच्या चित्रीकरणाला येताना अमजद खान यांचा फार मोठा एक्सीडेंट झाला होता आणि त्यामुळे हा चित्रपट त्यांच्या हातातून गेला. या अपघाताने पुन्हा एकदा अमजद खान यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. या अपघाताच्या वेळी अमिताभ बच्चन यांनी फार मोठी मदत अमजद खान यांना केली होती. कुठे झाला होता एक्सीडेंट ? काय मदत केली होती अमिताभ बच्चन यांनी ? खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे.
शक्ती सामंत यांनी १९७६ साली ‘द ग्रेट गॅम्बलर’ या सिनेमाची घोषणा केली. या चित्रपटात प्रमुख भूमिकेतील अमिताभ बच्चन यांचा डबल रोल होता. त्यातील त्यांच्या नायिका झीनत अमान आणि नीतू सिंग होत्या. खलनायकाच्या भूमिकेसाठी त्यांनी अमजद खान यांना साईन केले. या चित्रपटाचे चित्रीकरण गोवा आणि कैरो या ठिकाणी होणार होते. चित्रपटाचे पहिले शेड्युल गोवा येथे होते. शक्ती सामंत आपले संपूर्ण कृ मेंबर्स घेऊन गोव्यात दाखल झाले होते. (Amitabh Bachchan)
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) देखील गोव्यात पोहोचले होते. अमजद खान तेंव्हा प्रचंड बिझी असल्याने ते गोव्याला फ्लाईटने जाणार होते. परंतु त्या दिवशी दुर्दैवाने मुंबईहून निघणारे त्यांचे विमान ते पकडू शकले नाही. आता काय करायचे? आपण न गेल्यामुळे शक्ती सामंत यांची मोठी अडचण होऊ शकते. म्हणून अमजद खान यांनी बाय रोड कार ने गोव्याला जायचे ठरवले.अशाप्रकारे त्यांचे ‘बॉम्बे टू गोवा’ हा प्रवास कार ने सुरू झाला. या कारमध्ये त्यांची गरोदर पत्नी, एक दोन वर्षाचा मुलगा आणि ड्रायव्हर होते. संध्याकाळी प्रवास सुरू झाला.
पहाटे चार वाजता सावंतवाडी येथे पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर अमजद खान त्यांच्या ड्रायव्हरला म्हणाले,”संध्याकाळपासून रात्रभर तू ड्रायव्हिंग करतो आहेस. आता तू थोडा आराम कर. मी ड्राईव्ह करतो.” ड्रायव्हरने आधी नकार दिला पण अमजद खान यांनी खूपच आग्रह धरल्यामुळे अमजद खान यांच्या शेजारी बसला पुन्हा प्रवास सुरू झाला. अमजद खान यांनी कॅसेटवर काही गाणी लावली होती. ती गाणी ऐकत गप्पा मला प्रवास चालू होता. एकदा कॅसेट संपली ती रिवाइंड करण्यासाठी अमजद खान यांनी टेप रेकॉर्डर कडे लक्ष दिले आणि हीच चूक त्यांना भोवली.
कारण लक्ष विचलित झाल्याने समोरून येणारा एक ट्रक त्यांच्या कार वर येवून आदळला. हा अपघात इतका भयानक होता की अमजद खान यांच्या मणक्याला मोठी इजा झाली. त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. अमजद खान यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावर खूप मोठ्या जखमा झाल्या. सुदैवाने दोन वर्षाचा मुलगा त्यातून बचावला. ताबडतोब त्यांना पणजीच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. पत्नी आणि मुलगा यांना किरकोळ जखमा झाल्यामुळे त्यांना लगेच मुंबईला पाठवण्यात आले. परंतु अमजद खान यांची प्रकृती गंभीर होती. ते कोमा मध्ये गेले होते. त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. अमजद खान यांच्या गाडीचा एक्सीडेंट झाला ही बातमी शक्ती सामंत यांना कळाल्यामुळे सर्व क्रू मेंबर्स आणि अमिताभ बच्चन यांनी ताबडतोब हॉस्पिटल कडे धाव घेतली. डॉक्टरने त्यांना अमजद वर तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. परंतु तिथे सही करण्यासाठी अमजद खानचे कोणीही नातेवाईक उपलब्ध नव्हते.
==========
हे देखील वाचा : बिग बी यांचा हा सिनेमा तब्बल ३७ वर्षानंतर प्रदर्शित झाला !
==========
तेव्हा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी स्वतः पुढे होवून तिथे सही केली आणि ताबडतोब अमजद खान यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे त्यांचे प्राण वाचू शकले. पुढे अमजद खान सहा महिने व्हीलचेअर वर होते. याच काळात त्यांचे वजन देखील खूप वाढले. ‘द ग्रेट गॅम्बलर’ या चित्रपटातील त्यांची भूमिका नंतर शक्ती सामंत यांनी उत्पल दत्त यांना दिली. अमजद खान यांना पूर्ण बरे व्हायला एक वर्षाचा कालावधी गेला. परंतु या अपघातानंतर त्यांचे वजन वाढतच गेले आणि हेच वाढते वजन त्यांच्या अकाली मृत्यूला कारणीभूत ठरले. अमिताभ बच्चन आणि अमजद खान यांची मैत्री शोलेपासून होतीच पण या अपघातानंतर ती आणखी गहिरी झाली. २६ जुलै १९८३ रोजी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा बेंगलोरला कुली च्या शूटिंगच्या वेळेला मोठा अपघात झाला त्यावेळेला पहिल्यांदा अमिताभला भेटायला जाणाऱ्यांमध्ये अमजद खान होते!