‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
आराधनाच्या प्रीमियरला देवानंदने काय केली भविष्यवाणी…
आज २९ डिसेंबर सुपरस्टार राजेश खन्ना यांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या पहिल्या सुपरहिट आराधनाच्या प्रीमियरचा जबरदस्त किस्सा!
भारतीय सिनेमाच्या इतिहासात जे काही माइल स्टोन सिनेमे आहेत त्यामध्ये १९६९ साली प्रदर्शित झालेल्या ‘आराधना’ या चित्रपटाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. या सिनेमाने यशाची गणित बदलवून टाकली. किशोर कुमार आणि राजेश खन्ना एका रात्रीत सुपरस्टार झाले. दक्षिणेतील नॉन हिंदी बेल्ट मध्ये सलग शंभर दिवस तसेच अनेक चित्रपटगृहात सिल्वर ज्युबिली सादर करणारा हा एकमेव चित्रपट होता. सिनेमाचे दिग्दर्शन शक्ती सामंत यांनी केले होते. या चित्रपटात राजेश खन्ना, शर्मिला टागोर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.(Aaradhana)
चित्रपटाला संगीत सचिन देव बर्मन यांचे असले तरी सहाय्यक संगीतकार राहुल देव बर्मन यांनी चमत्कार घडविला. या चित्रपटाचे गीतकार आनंद बक्षी होते. चित्रपटात कमालीचा फ्रेशनेस होता. मेलडीअस संगीत होतं. कलावंतांचा अप्रतिम अभिनय होता. शक्ती सामंत यांचे देखणे दिग्दर्शक होते. आलोक दास गुप्ता या छायाचित्रकारांची कमाल होती. या सिनेमाचा प्रीमियर मुंबईच्या ऑपेरा हाऊस इथे मोठ्या दिमाखात पार पडला होता. ७ नोव्हेंबर १९६९ रोजी ‘आराधना’ मुंबईत प्रदर्शित झाला. (Aaradhana)
या प्रीमियरला बॉलीवूड मधील सर्व दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्या काळी शक्ती सामंत हे हिंदी सिनेमाच्या दुनियेतील मोठे नाव होते. या सिनेमाच्या प्रीमियर ला सर्वात घाबरून गेला होता आणि नर्वसनेस फील करत होता चित्रपटाचा नायक राजेश खन्ना! कारण त्याच्या दृष्टीने हा सिनेमा खूप महत्त्वाचा होता. या सिनेमापूर्वी त्याचे चार सिनेमे प्रदर्शित झाले होते राज, बहारों के सपने, आखरी खत आणि औरत. यातील ‘बहारों के सपने’ चा अपवाद वगळता कुठल्या सिनेमाला फारसे यश मिळालं नव्हतं. त्यामुळे राजेश खन्ना साठी ‘आराधना’ खूप महत्त्वाचा चित्रपट होता.
राजेश खन्नाने नंतर एका मुलाखतीत सांगितले होते की “चित्रपटाच्या दुनियेत येताना माझ्यापुढे नाही म्हटलं तरी राज दिलीप देव या सदाबहार त्रिकुटाचा मोठा पगडा होता. त्यातल्या त्यात देवानंद चा माझ्यावर खूप प्रभाव होता. त्याच्यासारखी चॉकलेटी इमेज मला तयार करायची होती. तोवर देव आनंदला मी कधीच भेटलो होतो. फक्त एकदा मी माझ्या त्या वेळच्या गर्लफ्रेंडला अंजू महेंद्रू ला भेटायला त्यांच्या ‘ज्वेल थीफ’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी भेटायला गेले होते. तिथे देव आनंद यांचे मला पहिले दर्शन घडले. देव ने मला ओळखणे शक्यच नव्हते कारण त्यावेळी तो मोठा स्टार होता आणि मी एक स्ट्रगलर होतो. पण मी माझ्या दैवताकडे डोळे भरून पाहत होतो. देव आनंद यांचे मोठे बंधू चेतन आनंद यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आखरी खत’ चित्रपटाचा मी नायक होतो. पण देव आनंद यांच्या शी माझा कधीच संबंध आला नाही. त्यामुळे ‘आराधना’ या चित्रपटाच्या प्रीमियर ला देव आनंद यांनी यावे असे मला खूप वाटत होतं!” (Aaradhana)
त्या दिवशी या प्रीमियरला अख्ख बॉलीवूड लोटलं होतं. पण राजेश खन्नाचे डोळे मात्र देव आनंद यांना शोधत होते. अखेर देव साब प्रीमियरला आले. राजेश खन्ना स्वतः प्रवेशद्वारावर सर्वांचे स्वागत करत होते. देव च्या भोवती सर्वांचा गराडा पडला.
राजेश खन्ना यांची कुणी दखल घेत नव्हतं कारण त्याला कोणी फारसं ओळखतच नव्हतं. देव आनंदने देखील ‘हाय’ ‘हॅलो’ करत आत सिनेमा बघायला निघून गेले. हळूहळू सर्व पाहुणे आल्यानंतर चित्रपट घरातले दिवे मालवले गेले आणि पडद्यावर ‘आराधना’ सुरू झाला. राजेश खन्ना खूपच नर्वस होता. लोकांना आपला चित्रपट कसा वाटतो याची त्याला उत्सुकता होती. एकीकडे भीती देखील होती. सिनेमातील आपला डबल रोल लोकांना आवडतो की नाही याची त्याला काळजी होती. तो थिएटरमध्ये पडद्यावर कमी आणि लोकांच्या रिएक्शन जास्त पाहत होता. सिनेमा संपला.दिवे लागले. लोकांनी टाळ्यांच्या गजरामध्ये राजेश चे कौतुक केले. तीन तासापूर्वीचा राजेश खन्ना आता संपूर्णपणे बदलून गेला होता. सर्व बॉलीवूडची नजर आता राजेश खन्नाकडे होती. (Aaradhana)
सर्वजण त्याचे कौतुक करत होते. राजेश खन्नाला हे खरेच वाटत नव्हतं काही तासापूर्वी तो प्रवेशद्वारावर एकटा होता. कुणाचे त्याच्याकडे लक्ष नव्हतं. पण आता ऑपेरा हाऊसमध्ये प्रत्येक जण राजेश खन्नाला शोधत होता आणि त्याचे कौतुक करत होता. हे miracle अवघ्या काही तासात घडलं होतं. आणि त्याच वेळेला राजेश खन्नाच्या खांद्यावर एक हात पडला.
===========
हे देखील वाचा : इंटरव्हल नसलेला पहिला हिंदी सिनेमा
===========
राजेश खन्नाने मागे वळून पाहिलं तर देव आनंद हसत त्याच्याकडे पाहत होता.” ‘हॅलो ssss यंग मॅन.. ग्रेट… काँग्रॅच्युलेशन्स!” राजेश खन्नाचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. ज्या हिरोचे सिनेमे पाहत तो मोठा झाला होता आणि त्याच्यासारखं बनण्याचा जो प्रयत्न करण्यासाठी सिनेमात आला होता; तो साक्षात देव त्याचे अभिनंदन करत होता ! राजेश खन्नाच्या डोळ्यातून पाणी आले. देव आनंदने त्याला थोपटले आणि म्हणाला” लूक यंग मॅन…आता घरी जा.. निवांत झोप. उद्यापासून उद्या सकाळपासून तुझे दिवस सुरू होत आहेत. काँग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट!” त्या दिवशी देव आनंदच्या जिभेवर जणू सरस्वतीच वास करत होती आणि झाले तसेच. ‘आराधना’ सुपर डुपर हिट झाला आणि तिथून पुढचे १७ सिनेमे ओळीने राजेश खन्ना यांनी बंपर हिट करून दाखवले. हा विक्रम आजही अबाधित आहे.