मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
ॲक्सीडेंटमुळे वहिदा रहमान यांची ‘या’ अभिनेत्यासोबत झाली भेट
आयुष्यातील पहिल्या भेटीचा योग कधी, कुठे, कसा येईल काहीच सांगता येत नाही. आता हेच पहा ना अभिनेता गुरुदत्तची जन्मभूमी कर्नाटक. कर्मभूमी मुंबई. अभिनेत्री वहिदा रहमानची जन्मभूमी मद्रास. पण या दोघांची पहिली भेट झाली हैदराबाद या शहरामध्ये! ती देखील अतिशय अनपेक्षितपणे. काहीही प्लॅनिंग न करता. पण ही अनपेक्षित आणि अकल्पित सहज घडलेली भेट; यामागे नक्कीच काहीतरी दैवी संकेत असावा कारण या भेटीमुळेच वहिदा रहमान हिंदी सिनेमाच्या दुनियेत आणि गुरुच्या आयुष्यात आली आणि या भेटीला कारणीभूत ठरला एक अपघात! एक ॲक्सीडेंट ! कोणाचा झाला होता अपघात ? काय होत हा किस्सा ? हा किस्सा मोठा इंटरेस्टिंग आहे.(Artist visit)
१९५५ साली गुरुदत्तचे साउथ इंडियातील एका डिस्ट्रीब्यूटरने गुरुदत्तला हैदराबादला बोलवले. त्यांचे म्हणणे असे होते की,”सध्या हैदराबाद मध्ये ‘मिसी अम्मा’ हा चित्रपट प्रचंड गर्दी खेचत आहे. तुम्ही तो चित्रपट पाहावा अशी माझी इच्छा आहे आणि याचा हिंदी रिमिक्स तुम्ही बनवावा.” गुरुदत्तने सुरुवातीला दुर्लक्ष केले पण डिस्ट्रीब्यूटरच्या वारंवार केलेल्या आग्रहामुळे त्याने हैदराबादला जाण्याचा निर्णय घेतला. (Artist visit)
त्या पद्धतीने गुरुदत्त त्यांचा असिस्टंट अब्रार अल्वी आणि प्रोडक्शन कंट्रोलर गुरुस्वामी हे तिघे एक प्रायव्हेट कार घेऊन मुंबईहून हैद्राबादला निघाले. रात्रभराचा प्रवास, त्या काळातील रस्ते आणि गाड्यांची स्थिती पाहता तसा तो त्रासदायकच प्रवास होता. सकाळी हे लोक हैदराबादला पोहोचले पण पोहोचता पोहोचता एक अपघात झाला. हैदराबादच्या रस्त्यावर त्यांच्या कारने एका म्हशीला धडक दिली! म्हशीला काही झाले नाही पण त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले. ताबडतोब त्यांची गाडी गॅरेज मध्ये पाठवण्यात आली. तिथे मेकॅनिकने “किमान तीन दिवस लागतील” असे सांगितले. गुरुदत्त कपाळाला हात लावून घेतला.
त्यांच्या डिस्ट्रीब्यूटरला ते तिघे भेटायला गेले. डिस्ट्रीब्यूटर स्वागत करत म्हणाला ,”चला आजच मी तुम्हाला ती सुपरहिट मूव्ही ‘मिसी अम्मा’ दाखवतो.” त्यांना घेऊन तो हैदराबादच्या एका थिएटरमध्ये गेला. प्रचंड गर्दी सिनेमाला होती. मोठ्या अपेक्षेने गुरुदत्त चित्रपट मुंबई हून पाहायला आले पण ‘मिसी अम्मा’ हा चित्रपट गुरुदत्त ला अजिबात आवडला नाही. त्याच्या डोक्याला वैतागच झाला. एक तर रात्रभराच्या प्रवासाने त्याचे माथे ठणकत होते. त्यात पुन्हा मोठ्या अपेक्षेने हा चित्रपट पाहायला ते लोक मुंबईहून आले होते तो चित्रपट देखील गुरुदत्त ला अजिबात आवडला नव्हता आणि त्यांची कार तीन दिवस गॅरेजमध्ये होती. गुरुदत्त प्रचंड वैतागला होता. डिस्ट्रीब्यूटरच्या ऑफिसमध्ये ते बसले होते. तोच त्यांना बाहेर रस्त्यावर मोठा गोंधळ ऐकायला मिळाला. एका कारच्या मागे लोक विशेषत: तरुण ओरडत ओरडत पळत होते.(Artist visit)
गुरुदत्तने त्यांच्या डिस्ट्रीब्यूटरला विचारले,” हा काय प्रकार आहे ?” डिस्ट्रीब्यूटरने सांगितले ,”सर इथे आणखी एक चित्रपट सध्या गर्दी खेळतो आहे मागच्या पंचवीस आठवड्यापासून. या चित्रपटाचे नाव आहे ‘रोजूर मलाई’. या चित्रपटात या अभिनेत्रीने फक्त एका गाण्यापुरती भूमिका केली आहे. पण ते गाणे प्रचंड गाजले आहे आणि त्या गाण्याने लोकांना वेडं केलं आहे.” गुरुदत्त ने त्या अभिनेत्रीचे नाव विचारले त्यांनी सांगितले,” तिचे नाव आहे वहिदा रहमान आहे.” लोकांची गर्दी पाहून वहिदा रहमान कारमधून खाली उतरली आणि तिने लोकांना अभिवादन केले. ते एक दोन क्षणच गुरुदत्त ने तिला बघितले आणि इतक्या लोकप्रिय अभिनेत्रीला आपण भेटलेच पाहिजे असे ठरवले. गुरुदत्त ने त्या डिस्ट्रीब्यूटरला सांगून वहीदा सोबतची मीटिंग फिक्स केली. दुसऱ्या दिवशी वहिदा रहमान आणि तिची आई गुरुदत्त यांना भेटायला आली. या भेटीपूर्वी वहीदाला गुरुदत्त बद्दल एक शब्दही माहीत नव्हता. त्याचे नाव देखील तिने ऐकले नव्हते. गुरुदत्त ने वहिदाला विचारले,” तुला उर्दू बोलता येते का?”वहिदाने काहीतरी थातूरमातूर उत्तर दिले. पण तिच्या डोळ्यातील चमक गुरुदत्तला आवडली. त्यावेळी वहिदाचे वय अवघे सतरा वर्ष होते.(Artist visit)
मुंबईला गेल्यानंतर गुरुदत्त आपल्या नवीन सिनेमाचे प्लॅनिंग करत होता. चित्रपट होता सी आय डी. या सिनेमाचे दिग्दर्शक राज खोसला यांनी केले होते. निर्माता होते गुरुदत्त. गुरुदत्तने या चित्रपटात एका vamp कॅरेक्टरसाठी वहिदा रहमान ला मुंबईला बोलवून घेतले. या सिनेमात तिच्यावर ‘कही पे निगाहे कही पे निशाना…’ हे गाणे चित्रीत झाले होते. या चित्रपटाची नायिका होती शकीला. पण वहिदा रहमान ने तिला ओव्हर शाडो केले होते. ‘सीआयडी’ चित्रपट हिट झाला. वहिदा रहमान देखील क्लिक झाली. आणि तिचा हिंदी सिनेमात प्रवेश झाला. त्यानंतर गुरुदत्तच्या सर्व सिनेमात आणि आयुष्यात देखील तिने प्रवेश केला. वहीदाच्या आगमनाने गुरुदत्तचे करिअर बहरले पण आयुष्याला मात्र ग्रहण लागले !
==========
हे देखील वाचा : प्राण ने स्वत:ला मिळालेला फिल्मफेअर पुरस्कार नाकारला…
==========
गंमत म्हणजे जो सिनेमा गुरुदत्त यांना अजिबात आवडला नव्हता त्याचा रिमेक हिंदी मध्ये झालाच मिस मेरी या नावाने आणि हा चित्रपट तुफान गाजला.’ रोजूल मराई ‘ या चित्रपटातील ज्या गाण्यामुळे वहिदा दक्षिणेकडे गाजली आणि तिचा हिंदी सिनेमा प्रवेश झाला ते गाणे देखील हिंदी सिनेमांमध्ये नंतर आले होते आणि वहीदा रहमान वरच चित्रित होणार होते. परंतु ते गाणे तिच्यावर चित्रित झाले नाही. तो एक भन्नाट किस्सा आहे तो पुन्हा कधीतरी !