मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
राकेश रोशन : फ्लॉप ॲक्टर बट सुपरहिट डायरेक्टर
अभिनेता म्हणून फारसे यश न मिळाल्यामुळे दिग्दर्शक झालेले अनेक जण आहेत. पटकन नाव आठवायचं तर एक नाव डोळ्यापुढे ते सुभाष घई यांचे. आणखी एक कलाकार आहे ते म्हणजे अभिनेते राकेश रोशन. ६ सप्टेंबर १९४९ रोजी जन्मलेले राकेश रोशन यांचे पितृछत्र (संगीतकार रोशन) फार लवकर हरपले. त्यावेळी राकेश रोशन अवघे १८ वर्षाची होते. नंतर दिग्दर्शक मोहन कुमार यांच्याकडे त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. (Rakesh Roshan)
देखणं रूप असल्यामुळे त्यांच्याकडे काही निर्मात्यांनी चित्रपटात अभिनेता होण्याचा सल्ला दिला. हिंदी सिनेमात अभिनेता म्हणून त्यांचा प्रवेश झाला मनमंदिर, घर घर की कहानी या चित्रपटातून. या सिनेमानंतर त्यांना ‘पराया धन’ हा चित्रपट हेमामालिनी सोबत मिळाला. नंतर मात्र स्वतंत्र हिरो असलेले त्यांचे चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे त्यांनी सहाय्यक अभिनेत्याची भूमिका करायला सुरुवात केली.
त्यांचे जवळपास ८०% चित्रपट हे सहाय्यक अभिनेते म्हणूनच आहेत. ऋषी कपूर सोबतचा ‘खेल खेल में’, देवआनंद सोबतचा ‘बुलेट’, विनोद खन्ना सोबतचा ‘हत्यारा’ रणधीर कपूर सोबतचा ‘ढोंगी’ जितेंद्र सोबतचा ‘खानदान’ या सर्व चित्रपटातून ते सहाय्यक अभिनेत्याची भूमिका करत होते. लीड हिरो म्हणून ते फार कमी सिनेमातून आले. (खूबसूरत, शुभ कामना, खट्टा मीठा) १९७९ साली ‘आप के दिवाने’ या चित्रपटात ते काम करत होते. या चित्रपटाची निर्मिती त्यांचे मित्र करत होते परंतु त्यांनी हा चित्रपट अर्धवट सोडल्यामुळे हा चित्रपट राकेश रोशन यांनी पूर्ण करायचे ठरवले. सिनेमा सुपरफ्लॉप झाला पण यामुळे एक झालं चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात राकेश रोशन आले. (Rakesh Roshan)
आपल्या चित्र निर्मिती संस्थेचे नाव ठेवले ‘फिल्म क्राफ्ट’. पहिलाच सिनेमा सुपरफ्लॉप झाल्याने झालेले कर्ज भरून काढण्यासाठी त्यांनी दुसऱ्या एका चित्रपटाची निर्मिती केली. त्यांनी ‘कामचोर’ (१९८२) हा चित्रपट निर्माण केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन के विश्वनाथ यांनी केले. चित्रपट हिट झाला, पण कर्ज खूप झाले होते. ‘कामचोर’ च्या यशाने त्यांना हुरूप आला. त्यामुळे त्यांनी ‘जाग उठा इंसान’ (१९८४) आणि ‘भगवानदादा’ (१९८६) हे दोन चित्रपट निर्माण केले. पण दुर्दैवाने दोन्ही चित्रपट सुपरफ्लॉप झाले. (Rakesh Roshan)
त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढला. अक्षरशः दिवाळखोरीत निघायची वेळ आली. पण त्यांनी आता स्वत: चित्रपट दिग्दर्शन करायचे ठरवले आणि पहिला चित्रपट दिग्दर्शित केला ‘खुदगर्ज’ (१९८७) जितेंद्र, शत्रुघन सिन्हा, गोविंदा, भानुप्रिया, अमृता सिंग यांना घेऊन या चित्रपट बनवला होता. ‘संकट आली की समूहांनी येतात’ सिनेमा बनला पण डिस्ट्रीब्यूटर त्याला हात लावायला तयार नव्हते. जो अभिनेता म्हणूनच यशस्वी झाला नाही तो डायरेक्टर म्हणून काय यशस्वी होणार? असे कुजकट टोमणे राकेश रोशन यांना ऐकायला येऊ लागले. सर्वत्र नकारात्मक वातावरण होतं. या सिनेमाच्या प्रीमियरच्या वेळी राकेश रोशन प्रचंड टेन्शनमध्ये होते. लागोपाठच्या दोन चित्रपटाच्या अपयशाने ते पुरते खचले होते. त्यांच्या सर्व आशा आकांक्षा खुदगर्ज वर टिकल्या होत्या. (Rakesh Roshan)
या सिनेमाच्या प्रीमियरला बॉलिवूडमधील अनेक नामवंतांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ऋषी कपूर आणि जितेंद्र यांच्यासोबत राकेश रोशन (Rakesh Roshan) बोलत होते. तिघेही खूप जुने मित्र होते. आप के दिवाने या चित्रपटात हे तिघेही होते. पण तितक्यात फोटोग्राफर तिथे आले आणि त्यांनी राकेश रोशन यांना बाजूला व्हायला सांगितले आणि “आम्हाला फक्त ऋषी कपूर आणि जितेंद्र यांचा फोटो घ्यायचा आहे !” असे निर्लज्ज पणे सांगितले. जड अंतकरणाने राकेश रोशन बाजूला झाले. फोटोग्राफर ऋषी कपूर आणि जितेंद्र चे फोटो घेण्यामध्ये मग्न झाले हा सर्व प्रसंग राकेश रोशन यांची पत्नी पिंकी रोशन देखील पाहत होती. तिचे डोळे भरून आले. आपल्या पतीचा होणारा अपमान तिला आतून हेलावून टाकत होता. राकेश रोशनला वाटले बहुतेक हा चित्रपट देखील आपला फ्लॉप होणार.
============
हे देखील वाचा : मुमताजची बॉलिवूडमधील इन्स्पायरिंग जर्नी…
============
पण पुढच्या तीन तासांमध्ये चित्र पालटले. सिनेमा सर्वांना आवडला.समीक्षकांना आवडला. पुढे पब्लिकला देखील खूप आवडला. चित्रपट सुपर डुपर हिट झाला. आणि राकेश रोशनचे (Rakesh Roshan) होते नव्हते तेवढे सर्व कर्ज फेडले गेले. जेव्हा या सिनेमाच्या सिल्वर जुबली ची पार्टी हॉटेल हॉलिडे इन मध्ये राकेश रोशन यांनी आयोजित केली त्यावेळी मात्र चित्र बदलले होते. सर्व फोटोग्राफर आता राकेश रोशन यांना शोधत होते. सर्व मीडिया आता त्यांची मुलाखत घेण्यासाठी उत्सुक होता. एका सिनेमाच्या यशाने आयुष्य बदलून गेले. त्या पार्टीमध्ये राकेश रोशन स्टेजवरून आपल्या पत्नीला जोरात म्हणाले ‘पिंकी मै वापस आ गया हू इंडस्ट्री में !” यानंतर राकेश रोशन यांच्या यशाची घोडदौड सुरू झाली. खून भरी मांग, करण अर्जुन, कोयला या सिनेमानंतर त्यांनी आपल्या मुलाला लॉन्च केले. ‘कहो ना प्यार है’ या सिनेमाने तर सर्व रेकॉर्ड मोडून टाकले. उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्या मायानगरीतील कायदे कानून खूप वेगळे आहे राकेश रोशन यांनी खूप अनुभव घेतला आहे !