मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
नजीकच्या काळात येऊ घातलेले पाच मराठी सिनेमे..
सरतं वर्ष सरलं आणि नववर्ष नवा अंदाज घेऊन आता आपल्यापुढे ठाकलं. सरत्या वर्षातल्या चार चांगल्या गोष्टी पुढे नेत आता प्रत्येकजण नव्या संधी आणि अपेक्षांच्या शोधात पुढे निघालाय आणि आपली मराठी इंडस्ट्री सुद्धा या सगळ्यासाठी सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतय.. येत्या काही दिवसांतच आपल्या भेटीला अनेक सिनेमे येऊ घातलेत, ते कोणते, त्यांचे विषय कोणते या सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात.
तर नवीन वर्षात येऊ घातलेल्या सिनेमांच्या यादीतला पहिला सिनेमा आहे, पंचक. या सिनेमाची सगळ्यात भारी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, डॉ. श्रीराम नेने आणि आपल्या सगळ्यांची लाडकी धकधक गर्ल माधुरी म्हणजेच माधुरी दीक्षित नेने या मराठमोळ्या जोडीने हा खास मराठी सिनेमा सर्व मराठी प्रेक्षकांसाठी आणला आहे. जयंत जठार, राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशी तगडी स्टारकास्ट आहे.
घरात पंचक लागल्याने आता कोणाचा नंबर लागणार, याची भीती घरातल्या सर्वांनाच भेडसावत असतानाच प्रत्येक जण आपापल्यापरीने यावर उपायही शोधत आहे. या सगळ्यात कोणाची सर्कस सुरू आहे तर कोणाचा ऑपेरा सुरु आहे. आता खोतांच्या घराला लागलेले ‘पंचक’ कसे सुटणार, हे बघताना प्रेक्षकांना नक्कीच मजा येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशन साठी सध्या माधुरी आणि श्रीराम नेने अनेक मीडिया चॅनल्सना भेटी देताना, मुलाखती देताना आपल्याला दिसतायत.. माधुरी दीक्षितची कायमच हिंदीत हवा असल्याने, तिने मराठीत छोटीशी जाहिरात जरी केली तरी त्याची चर्चा होते, प्रेक्षकांच्या ती पसंतीस उतरते.. आणि आता तर पंचक या मराठी सिनेमाच्या निमित्ताने माधुरी निर्माती झाली आहे त्यामुळे हा चित्रपट नेमका कसा असणारे आणि किती सक्सेसफूल ठरणारे हे पहाणं सगळ्यांसाठीच इंट्रेस्टिंग ठरणार आहे. हा सिनेमा येत्या 5 जानेवारीला रिलीज होणार आहे.
आता वळूया दुसऱ्या सिनेमाकडे.. आपल्या यादीतला दूसरा सिनेमा आहे सत्यशोधक.. महात्मा फुले यांनी समाजात पुरोगामी विचार रुजवत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली… त्यांचा हा संपूर्ण जीवनप्रवास प्रेक्षकांना आता या सिनेमाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे… चित्रपटात महात्मा फुलेंची भूमिका अभिनेता संदीप कुलकर्णी, तर सावित्रीबाईंची भूमिका राजश्री देशपांडे यांनी साकारली आहे…
महात्मा फुलेंसारख्या दिसणाऱ्या संदीप कुलकर्णींच्या हुबेहूब लूकची चर्चा सध्या सगळीकडे खास करून सोशल मीडियावर होताना आपल्याला दिसतेय.. शिवाय संदीप कुलकर्णी आणि राजश्री देशपांडें यांच्यासह या सिनेमात गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी ही कलाकार मंडळी सुद्धा झळकणार आहेत, महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत.. ‘सत्यशोधक’ चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन निलेश जळमकर यांनी केलं आहे आणि महत्वाचं म्हणजे १९व्या शतकाची सुरूवात आणि तो काळ पडद्यावर साकारण्यासाठी या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान भव्य सेट उभारण्यात आले होते… या चित्रपटाचा प्रदर्शनापूर्वीच आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आलाय ही फार मोठी गोष्ट आहे.. सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारीला साजरी केली जाते… याचच औचित्य साधून येत्या ५ जानेवारीला ‘सत्यशोधक’ हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे.
आपल्या यादीतला आता तिसरा आहे नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव आणि मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘ओले आले’ हा सिनेमा.. हा सिनेमा येत्या ५ जानेवारीलाच प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने प्रेक्षकांना वडील-मुलाच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट अनुभवता येणार आहे.. ‘ओले आले’ चित्रपटाचं दिग्दर्शन विपुल मेहता यांनी केलं आहे. या चित्रपटाला बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी सचिन-जिगर यांचं संगीत लाभलं आहे.
‘ओले आले’ या चित्रपटाच्या माध्यमातून सचिन व जिगर यांनी मराठी संगीत क्षेत्रात पदार्पण केलंय… ‘एक अशा प्रवासाची गोष्ट, ज्याने शिकवले जीवन जगण्याचे सूत्र!’ अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे.. विशेष म्हणजे या सिनेमात सायली आणि सिद्धार्थ ही युथफुल जोडी आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसणार आहे… दोन विरुद्ध स्वभावधर्माच्या तरीही एकमेकांच्या प्रेमात असणाऱ्या या जोडीचा धम्माल प्रवास प्रेक्षकांना अनुभवता येणारे.. शिवाय आजवर नानांच्या विविध भूमिका आपण पाहिल्या आहेत… त्यांची प्रत्येक भूमिका आपल्याला काही ना काही तरी देऊनच जाते. आणि अशीच ‘ओले आले’ चित्रपटातली नानांची भूमिका ”जगणं समृद्ध करायला शिकवणारी आहे” असं ते सांगतात… त्यामुळे सिनेमा खास असणार हे वेगळ सांगायला नको.
थोडक्यात येत्या 5 जानेवारीला मराठीत तीन सिनेमे प्रदर्शित होतायत, त्यामुळे प्रेक्षकांना मेजवानीच आहे म्हणायचं.. असो तर आता आपण येऊ आपल्या यादीतल्या चौथ्या सिनेमाकडे.. चौथा येऊ घातलेला सिनेमा म्हणजे आपल्या चतुरचा आईच्या गावात मराठी बोल हा सिनेमा.. हो तोच चतुर.. 3 idiots वाला.. ज्याने आपल्या खतरनाक अॅक्टिंगने सगळ्यांना हसवलेलं.. आठवला का ? चतुरची भूमिका साकारणारा अभिनेता ओमी वैद्यने आता प्रेक्षकांच खास लक्ष वेधून घेतलंय… हाच ओमी वैद्य आता बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर मोठ्या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करायला येणार आहे… ‘आईच्या गावात मराठीत बोल’ या धम्माल आणि विनोदी चित्रपटातुन ओमी वैद्य मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतोय… या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलिज करण्यात आला. या चित्रपटाद्वारे ओमी वैद्यची भन्नाट मराठी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे आणि त्यावर ते तद्दन खूश होणारेत आणि हसून हसून लोटपोट सुद्धा होणार आहेत असं बोललं जातय… या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य, संस्कृती बालगुडे, पार्थ भालेराव आहेत तसेच विद्याधर जोशी, इला भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, नेहा कुलकर्णी, ओंकार थत्ते, ध्रुव दातार, सायली राजाध्यक्ष आणि सुधीर जोगळेकर यांच्या ही महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट येत्या १९ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे…
आणि आपला पाचवा येऊ घातलेला अजून एक भारी सिनेमा म्हणजे नवरदेव bsc agri… नवरदेव B Sc. Agri चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळतंय. नवरदेव B Sc. Agri हा चित्रपट सध्याच्या ज्वलंत विषयावर आहे. या चित्रपटात अभिनेता क्षितीश दाते हा मुख्य भूमिकेत आहे, सोबत हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकर, मकरंद अनासपुरे, प्रवीण तरडे, रमेश परदेशी, गार्गी फुले, नेहा शितोळे, हार्दिक जोशी, संदीप पाठक ही स्टारकास्ट आहे.. गेल्या काही वर्षांपासून मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत.
विशेष: ग्रामीण आणि शेतकरी असलेल्या मुलांचं लग्न होण फार जास्त कठीण होऊन बसलय. प्रत्येक मुलीला पुणे आणि मुंबईचाच मुलगा हवाय. आणि हा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून मोठा होत जातोय आणि आता याच ज्वलंत प्रश्नावर चक्क एक अस्सल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शक राम खाटमोडे आहेत आणि हा चित्रपट चांगलाच धमाका करेल अस सांगितलं जातंय. हा चित्रपट येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीला रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्येच मोठी क्रेझ बघायला मिळतेय. तर हे होते वर्षांच्या सुरवातीलाच म्हणजेच जानेवारी महिन्यात येऊ घातलेले 5 मराठी सिनेमे.