दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
वैजयंतीमाला हिला राम और शाम या चित्रपटातून का काढले ?
दक्षिणेतील सुप्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक बी नागि रेड्डी यांनी साठच्या दशकाच्या उत्तरार्धात दिलीप कुमार यांना घेऊन एक चित्रपट बनवत होते. हा चित्रपट होता ‘राम और शाम’. या चित्रपटात दिलीपची दुहेरी भूमिका होती. चित्रपटाने चांगले व्यावसायिक यश मिळवले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन चाणक्य यांनी केले होते. यात दिलीप कुमारची नायिका वैजयंतीमाला होती.
वैजयंतीमाला (Vyjayanthimala) आणि दिलीप कुमार हे तसं त्या काळातील अतिशय गाजलेलं पेअर. त्यांचे ‘लीडर’, ‘गंगा जमुना’ , ‘संघर्ष’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते. वैजयंतीमाला अतिशय गुणी आणि नृत्य निपुण कलाकार. वैजयंतीमालाने राज कपूर सोबत ‘संगम’ या चित्रपटात जबरदस्त भूमिका केली होती. त्याशिवाय या दोघांचा ‘नजराना’ नावाचा एक चित्रपट देखील होता.
देव आनंद आणि वैजयंतीमाला यांचा ‘ज्वेल थीफ’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी झाला होता. नृत्य हा वैजयंतीमालाचा (Vyjayanthimala) प्लस पॉइंट होता. ‘राम और शाम’ या चित्रपटात दिलीप कुमार सोबत ची तिची भूमिका पाहायला लोक उत्सुक होते. या सिनेमाचे शूटिंग सुरु झाले आणि चार रिळे देखील तयार झाली होती. याच काळात वैजयंतीमालाचे डॉक्टर चमनलाल बाली यांच्यासोबत १९६८ साली लग्न झाले होते.
एकदा ‘राम और शाम’ या सिनेमाच्या सेटवर वैजयंतीमाला (Vyjayanthimala) खूप उशिरा पोहोचली. सर्व युनिट तिची वाट पाहत थांबलेले होते. साउथकडे प्रचंड शिस्तीमध्ये चित्रपटाची निर्मिती होते. प्रत्येक दिवसाचे नव्हे तर प्रत्येक तासाचे शेड्युल ठरलेले असते. तिकडे ठराविक दिवसांमध्ये चित्रपट पूर्ण होत असतात. थोडा देखील त्यामध्ये बदल होत नसतो. अशा परिस्थितीमध्ये वैजयंतीमाला सेटवर उशिरा पोहोचली. बी नागी रेड्डी यांना ते योग्य वाटले नाही. त्यांनी तिच्याकडे निरोप पाठवण्याचा प्रयत्न केला पण ती काही लवकर आली नाही. त्यात भरीस भर म्हणजे उशिरा सेटवर आल्यानंतर कुणालाही सॉरी न म्हणता ती आपल्या मेकअप रूममध्ये गेली हे देखील निर्मात्याला खटकले.
त्यानंतर यांनी तिला कालच्या शॉटची कंटिन्यूटी राखण्यासाठी तीच साडी परिधान करून यायला सांगितले. वैजयंतीमाला नेमकी ती साडी त्या दिवशी घेऊन आली नव्हती. ती दुसरीच साडी घालून सेटवर आली. आता मात्र बी नागी रेड्डी यांचा संयम संपला. यांचे पित्त खवळले. त्यांनी सर्वांच्या समक्ष वैजयंतीमाला (Vyjayanthimala) खडे बोल सुनावले आणि ,”उद्यापासून तू सेटवर येऊ नकोस. इथे आम्ही या पद्धतीने काम करत नाही. इथे प्रचंड शिस्तीमध्ये काम चालते हे तुला माहिती आहे. असे असतानाही तुझे गैरवर्तन अजिबात समर्थनीय ठरू शकत नाही. तुझा हिशेब तू पूर्ण कर. उद्याच्या उद्या तुला मुंबईचे तिकीट काढून देतो. तुझा या चित्रपटाचा संबंध संपला!” शिस्त म्हणजे शिस्त. एका क्षणात निर्मात्याने मोठा धाडसी निर्णय घेतला.
खरं तर त्या वेळेला वैजयंतीमाला (Vyjayanthimala) ही लेडी सुपरस्टार होती. दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला ही पेअर खूप लोकप्रिय होती. असे असतानाही त्यांनी तिला आपल्या सिनेमातून काढून टाकले. संगीतकार नौशाद यांनी निर्मात्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. वैजयंतीमालाने देखील माफी मागितली. परंतु याचा काही एक परिणाम निर्मात्यावर झाला नाही ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. वैजयंती माला ला ‘राम और शाम’ चित्रपटातून काढून टाकण्यात आले. तिच्या जागी लगेच वहिदा रहमान ला साईन करण्यात आले. वैजयंतीमाला याची लग्नानंतरची हिंदी आणि तामिळ सिनेमातली कारकीर्द इथेच संपली. १९७० साली राजेंद्र कुमार सोबत आलेला ‘गंवार’ हा तिचा शेवटचा हिंदी सिनेमा ठरला. खरंतर १९६८ सालीच ज्या वर्षी वैजयंतीमालाचे लग्न झाले होते त्याच वर्षी माला सिन्हा आणि शर्मिला टागोर यांचे देखील लग्न झाले परंतु या दोघींनी लग्नानंतर देखील बराच काळ सिनेमांमध्ये आपली अभिनयाची यात्रा चालू ठेवली.
============
हे देखील वाचा : राकेश रोशन : फ्लॉप ॲक्टर बट सुपरहिट डायरेक्टर
============
वैजयंतीमाला (Vyjayanthimala) हिने मात्र सिनेमा पासून स्वत:ला अलिप्त ठेवले. नंतर तिने समाजकार्य आणि राजकारणात स्वतःला झोकून दिले या काळात तिला अनेक चित्रपट निर्माते एप्रोच झाले होते परंतु तिने कोणालाही फारशी दाद दिली नाही. काही वर्षांपूर्वी ‘बॉण्डिंग’ हे तिचे आत्मचरित्र प्रकाशित झाले होते त्यात तिच्या सिनेमा नंतरच्या जीवनावर बराच प्रकाश टाकला गेला आहे.