
‘हरे रामा…’ या सिनेमाची आयडिया देवला नेपाळमध्ये सुचली…
कधी कधी अनपेक्षित पणे चित्रपटाची कथा निर्मात्याला सापडते !
निर्माता दिग्दर्शक देव आनंद (Dev Anand) यांच्या बाबतीत असेच झाले होते. देव आनंद यांनी १९७० साली ‘ प्रेम पुजारी’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. दिग्दर्शनातील हा त्यांचा पहिलाच प्रयोग होता. या चित्रपटाला तसे माफक यश मिळाले. यानंतर देव आनंद काठमांडू येथे गेलेले असताना त्यांना तिथे अनेक हिप्पी लोक दिसले. हे तरुण तरुणी नशेमध्ये दंग होऊन गात होते. हा एक नवा संप्रदाय जगाच्या अनेक कानाकोपऱ्यात दिसला जात होता. देव आनंदची शोधक नजर या लोकांवर पडली.
त्याला हा प्रॉब्लेम आणखी जवळचा त्यावेळी वाटला जेव्हा काठमांडूच्या त्या हिप्पी तरुण-तरुणी मध्ये त्यांना एक भारतीय मुलगी दिसली. देवआनंद खूप आश्चर्यचकित झाले. त्यांनी त्या मुलीशी संवाद साधला. त्यातून त्यांना तिचा भूतकाळ लक्षात आला. ती मूळची भारतीय जरी असली तरी अमेरिकेत स्थायिक झालेल्या कुटुंबातील मुलगी होती. तिचे आई-वडील अतिशय गर्भ श्रीमंत होते त्यांना आपल्या पाल्याकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. त्यातूनच ती या उदासीनतेतून या हिप्पी ग्रुप मध्ये आलेली दिसली. देव आनंद (Dev Anand) यांना तिची स्टोरी ऐकून यावर एक चांगला हिंदी चित्रपट तयार होऊ शकतो, याची खात्री पडली. सिनेमाचे टायटल त्यांनी लगेच फायनल केले ‘हरे रामा हरे कृष्णा’. टायटल फायनल करून ते मुंबईला आले.

या चित्रपटात नशेत चूर झालेली ती मुलगी चित्रपटात देव आनंदची (Dev Anand) बहिण दाखवली आहे. आता देव आनंदच्या बहिणीची भूमिका द्यायची कुणाला? प्रेम पुजारी या चित्रपटातील जाहिदा या अभिनेत्रीला त्यांनी विचारले पण तिने साफ नकार दिला. नंतर मुमताजला त्यांनी विचारले. मुमताज ने देखील बहिणीची भूमिका करायला नकार दिला. पण चित्रपटात जर नायिकेची भूमिका देणार असाल तर मी करेन असे देव आनंदला सांगितले. चित्रपटातील नायिकेपेक्षा खरंतर नायकाच्या बहीणची भूमिका जास्त महत्वाची आणि मोठी आहे असे मुमताजला सांगितले तरी ,”मला छोटी भूमिका चालेल पण मला तुमची बहीण व्हायचे नाही” असे सांगितले. कुणीच देवची बहिण व्हायला तयार नव्हते.
याच काळात देवानंदचे लक्ष गेले एका मुलीकडे जिने नुकतीच एशिया पॅसिफिक ब्युटी कॉन्टेस्ट जिंकली होती, ती अभिनेत्री होती झीनत अमान ! देव तिच्याकडे अप्रोच झाले आणि तिनेही भूमिका स्विकारली आणि रेस्ट इज हिस्ट्री !
जाता जाता आता थोडंसं ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटाबद्दल ! या सिनेमाचे टायटल खरंतर मनोज कुमार यांनी आधी बुक करून ठेवले होते. परंतु देव आनंद (Dev Anand) यांनी विनंती केल्यामुळे त्यांना ते टायटल मिळाले. या चित्रपटाला संगीत सचिन देव बर्मन यांनीच द्यावे असे देवला वाटत होते परंतु सचिनदा यांनी या चित्रपटाच्या संगीतामध्ये वेस्टर्न म्युझिक जास्त असल्याने त्यांनी स्वतः त्यांच्या मुलाचे आर डी बर्मन चे नाव सुचवले आणि आर डीचा प्रवेश नवकेतन मध्ये झाला. या चित्रपटातील ‘कांची रे कांची रे’ हे गाणे रणजीत गजमेर या नेपाळी संगीतकाराने आधी नेपाळीत बनवलेले होते. ते गाणे पंचम आणि देवआनंद यांना बेहद आवडल्यामुळे त्यांनी याच गाण्याच्या ट्यूनवर आनंद बक्षी यांच्याकडून गाणे लिहून घेतले. रणजीत गजमेर यांनी या गाण्यांमध्ये मादल या इन्स्ट्रुमेंटचा फार सुंदर वापर केला.
===========
हे देखील वाचा : कोणत्या निर्मात्याने तोडले माला सिन्हा सोबतचे कॉन्ट्रॅक्ट
===========
या चित्रपटानंतर रणजीत गजमेर पंचम यांच्या टीम मध्ये सामील झाले पुढे अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी मादल या वाद्याचा वापर केला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. यातील ‘दम मारो दम’ हे आशा भोसले यांनी गायलेले गाणे त्यावरच्या बिनाका गीतमालेमध्ये सर्वोत्कृष्ट ठरले. खरं तर हे गाणं देव आनंद यांना सुरुवातीला अजिबात आवडलं नव्हतं. पण या गाण्यासोबत एक क्लिपिंग सॉंग म्हणून ‘देखो ओ दिवानो तुम ये काम ना करो राम का नाम बदनाम ना करो…’ हे गाणं रेकॉर्ड केलं. ते देव आनंदला बेहद आवडलं. नंतर दोन्ही गाणी चित्रपटात ठेवायचे ठरले. ‘दम मारो दम’ हे गाणं उषा उथप यांनी देखील गायलं होतं. त्यांचे ते पहिलेच चित्रपटातील गाणे होते. या चित्रपटातील ‘दम मारो दम’ या गाण्यासाठी आशा भोसले यांना सर्वोत्कृष्ट गायिका हा फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला तर झीनत अमान यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ‘दम मारो दम’ या गाण्यातील सुरुवातीचा गिटारचा पीस पार्श्वगायक भूपेंद्र सिंग यांनी वाजवला आहे.