
‘गहरी चाल’ सिनेमात या दोघांनी बहिण भावाची भूमिका केली…
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सुरुवातीच्या काळातील काही चित्रपटांना प्रचंड अपयश आले पण त्या चित्रपटातील भूमिका अमिताभ बच्चन यांनी फार ताकदीने रंगवल्या होत्या. व्यावसायिक दृष्ट्या जरी हे चित्रपट त्या काळात यशस्वी झाले असले तरी अमिताभच्या जमान्यात पुन्हा एकदा रिपीट रन ला रिलीज होऊन त्या चित्रपटाने चांगला बिझनेस केला होता. त्यापैकी एक चित्रपट होता ‘गहरी चाल’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी साफ फ्लॉप झाला होता. (Cinema)
या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीधर यांनी केले होते. जुन्या प्रेक्षकांना आठवत असेल ‘दिल एक मंदिर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील श्रीधर यांनीच केले होते. त्याचप्रमाणे भाई भाई (१९५६) नजरांना (१९६१), प्यार किये जा (१९६६), साथी (१९६८) या लोकप्रिय हिंदी सिनेमाचे दिग्दर्शन श्रीधर यानीच केले होते. गंमत म्हणजे १९६५ साली श्रीधर यांनी हेमामालिनीला घेऊन एका तामिळ चित्रपटाची निर्मिती करायचे ठरवले होते. परंतु तिच्यात त्यांना त्यावेळी हीरोइन मटेरियल न वाटल्यामुळे त्यांनी तिला चक्क रिजेक्ट केले होते ! पण हेमा मालिनी हिम्मत हरली नाही.

तिने महेश कौल यांच्या ‘सपनों का सौदागर’ (१९६८) या चित्रपटातून राज कपूर सोबत दिमाखात हिंदी सिनेमा पदार्पण केले आणि लवकरच ती ड्रीम गर्ल म्हणून लोकप्रिय झाली. त्यानंतर साताठ वर्षांनी श्रीधर यांनी ‘गहरी’ चाल या चित्रपटासाठी तिची निवड केली. जिला आपण एकेकाळी रिजेक्ट केले होते तिलाच हिंदी सिनेमा नाही का ? म्हणून घेण्यासाठी त्यांना तिच्या मिन्नत वाऱ्या कराव्या लागल्या होत्या ! या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात अमिताभ बच्चनने हेमामालिनीच्या चक्क भावाची भूमिका केली आहे. हा एकमेव चित्रपट आहे ज्यात दोघांनी बहिण भावाची भूमिका केली आहे.(Cinema)
या चित्रपटाचा नायक होता जितेंद्र. कथानक जबरदस्त होते. सिनेमा ॲक्शन थ्रिलर ड्रामा होता. पण त्याकाळी अजिबात चालला नाही. अमिताभची यातली भूमिका काहीशी ग्रे शेड्स होती. ‘परवाना’ हा त्याचा चित्रपट १९७१ साली प्रदर्शित झाला होता. त्यातही अमिताभची भूमिका खलनायकाचीच होती. ‘गहरी चाल’ हा चित्रपट अमिताभ आणि जितेंद्र यांचा एकमेव चित्रपट आहे.
उभ्या आयुष्यात त्यांनी केवळ या एकाच चित्रपटात एकत्र भूमिका केली होती. चित्रपटाची गाणी आणि संवाद राजेंद्र कृष्ण यांचे होते तर चित्रपटाला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे होते. ‘जयपुर की चोली मंगवा देरे सैया…’ हे गाणं त्या काळात बिनाका गीतमाला मध्ये चांगले गाजले होते. जितेंद्र आणि हेमामालिनी यांच्यातील प्रेम प्रकरण याच काळात चालू होते. याच वर्षी (१९७३) हेमामालिनीचा ‘सीता और गीता’ हा ब्लॉकब्लस्टर सिनेमा प्रदर्शित झाला होता. यात तिने केलेल्या फाईट सिक्वेन्स प्रेक्षकांना खूप आवडले होते त्यामुळे मुद्दाम ‘गहरी चाल’ या चित्रपटात देखील त्यांनी क्लायमॅक्स मध्ये काही फाईट सिक्वेन्समध्ये हेमा मालिनी फाईट करताना दाखवले होते. या चित्रपटातील प्रेम चोपडा या खलनायकाचे डबिंग सत्येन कप्पू यांच्या आवाजात केले होते.
या सिनेमातील एका कॅब्रे डान्समध्ये सुरुवातीला ब्राझील ला ला ला ला… हे या ट्यूनचा वापर केला होता त्या काळात तेवढा काही लक्षात आला नाही परंतु ३५ वर्षानंतर शकीराने जेव्हा हे गाणे पुन्हा गायले तेव्हा या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली ! आज आपण ‘गहरी चाल’ हा चित्रपट जेव्हा youtube वर पाहतो तेव्हा हे म्युझिक ऐकून आश्चर्य वाटते. (Cinema)
===========
हे देखील वाचा : ‘कहो ना.. प्यार है’ या फिल्मची चोविशी…
===========
असे म्हणतात १९७२ साली सलीम जावेद प्रकाश मेहराला घेऊन राजकमल स्टुडिओमध्ये गेले होते जिथे या गहरी चाल शूटिंग चालू होते तिथेच अमिताभ बच्चन आणि प्रकाश मेहरा यांची पहिली भेट झाली आणि अमिताभची जंजीर साठी निवड झाली ! अमिताभने एका मुलाखतीत ही आठवण सांगितली होती. हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन यांचा ‘कसोटी’ हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित झाला होता’ ज्यात ते दोघे नायक नायिकेच्या भूमिकेत होते. परंतु हा चित्रपट देखील सुपरफ्लॉप ठरला होता.(Cinema)
‘गहरी चाल’ या चित्रपटात अमिताभ बच्चन याने हेमामालिनीच्या भावाची भूमिका केली होती नंतर या दोघांनी अनेक चित्रपटातून नायक नायिकेची भूमिका केली. असा काहीसा प्रकार देव आनंद यांच्या बाबत देखील झाला होता त्यांनी अभिनेत्री नंदा आणि झीनत अमान यांच्यासोबत आधी भावाची भूमिका केली आणि नंतर या दोघी त्याच्या नायिका देखील झाल्या ! ‘गहरी चाल’ एक चांगला सस्पेन्स ड्रामा म्हणून या चित्रपटाकडे पाहता येईल. युट्युब वर एकदा पाहायला हरकत नाही !