डिंपल कपाडिया चा कमबॅक करणारा : सागर !
आपल्याकडे हिंदी सिनेमा नायिकेच्या वैवाहिक स्टेटस बद्दल प्रेक्षक खूप जागरूक असतात. पूर्वी असा समज होता की, नायिकांनी एकदा का लग्न केलं की, त्यांचे फिल्मी करिअर संपुष्टात येते. काही अंशी हा समज खरा जरी असला तरी अभिनेत्री नूतन, शर्मिला टागोर यांनी तो खोटा करून दाखवला. अभिनेत्री मौसमी चटर्जी तर लग्न केल्यानंतर रुपेरी पडद्यावर दाखल झाली.
बॉलीवूडमध्ये एक अभिनेत्री अशी होती जिने एकच चित्रपट केला आणि लगेच लग्न करून रुपेरी पडद्यापासून दूर झाली आणि नंतर पुन्हा दहा वर्षानंतर तिने कमबॅक केला आणि सुपरहिट ठरली ! कोण होती ही अभिनेत्री ? ही अभिनेत्री होती डिंपल कपाडिया. ९ जून १९५७ रोजी जन्मलेली डिंपल ‘बॉबी’ चित्रपटाच्या वेळी अवघ्या सोळा वर्षाची कन्या होती. चित्रपट शूट चालू असतानाच तिने सुपरस्टार राजेश खन्ना सोबत लग्न केले. त्यानंतर दोन मुलींची ती आई झाली. परंतु लवकरच वैवाहिक जीवनामध्ये मतभेद निर्माण झाल्याने राजेश आणि डिंपल वेगळे राहू लागले आणि तिने पुन्हा सिनेमात कमबॅक करण्याचा विचार केला. १९८२ साली दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी डिंपल ला ‘सागर’ या चित्रपटासाठी साईन केले. या सिनेमात तिचा नायक ‘बॉबी’ चा ऋषी कपूर होता. सहनायकाच्या भूमिकेत कमल हसन होता.
डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) सिनेमात परत येते आहे ही त्या काळात मोठी ब्रेकिंग न्यूज होती. साउथ कडील बालू महेंद्रा याने ‘ सदमा’ या चित्रपटासाठी श्रीदेवीच्या जागी डिम्पललाच साइन केले होते परंतु डिंपलने (Dimple Kapadia) प्राधान्य हिंदी सिनेमाला दिले. गंमत म्हणजे ‘सागर’ या सिनेमाची स्क्रिप्ट पूर्ण झालेली नव्हती. तरीदेखील या सिनेमाची शूट सुरू झाले ! शैलेंद्र सिंग आणि आशा भोसले यांनी गायलेल्या ‘पास आओ ना…’ या गाण्याने चित्रपटाचा मुहूर्त झाला.
तब्बल दहा वर्षानंतर डिंपल कॅमेरा फेस करत असल्यामुळे या गाण्याला भरपूर रिटेक्स झाले. याच काळात डिंपलने ‘मंजिल मंजिल’, ‘जखमी शेरनी’ आणि ‘ऐतबार’ हे चित्रपट देखील साईन केले. हे सर्व सिनेमे तिने ‘सागर’ नंतर साइन केले होते परंतु ‘सागर’ या चित्रपटाचे शूट लांबल्यामुळे हे तीनही चित्रपट तिचे सागर पूर्वीच प्रदर्शित झाले. मात्र ‘सागर’ हा चित्रपट डिंपल (Dimple Kapadia) साठी खऱ्या अर्थाने कमबॅक करणारा सिनेमा होता.
या सिनेमासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली या सिनेमातील एका दृश्याची आज देखील मोठी चर्चा होते. यात डिंपलने टॉपलेस सीन दिला होता. चित्रपटात जरी तो समुद्रकिनारी वाटत असला तरी तो मुंबईच्या मढ आयलँड जवळील एका स्विमिंग पूल वर चित्रित केला गेला होता. चित्रपटात हा सीन सूर्योदयाच्या वेळी दाखवला असला तरी याचे शूट मध्यरात्री करण्यात आले होते. ही सर्व कमाल कॅमेरा मन एस एम अन्वर यांची होती.
गोव्याच्या न्यायनरम्य लोकेशनवर चित्रित झालेला ‘सागर’ हा सिनेमा १९८५ सालचा सुपरहिट सिनेमा होता. यातील डिंपलच्या सुरुवातीच्या समुद्र किनाऱ्यावरून पळत येण्याच्या शॉट च्या वेळेस चा आर डी बर्मन यांनी बनवलेली धून प्रचंड लोकप्रिय ठरली होती. ‘जलपरी धून’ म्हणून हे लोकप्रिय झाली होती. या चित्रपटाची सर्व गाणी जावेद अख्तर यांनी लिहिली होती. कथा पटकथा आणि संवाद देखील त्यांचेच होते. चित्रपटातील ‘सागर किनारे दिल ये पुकारे’ या गाण्याची धून आर डी बर्मन यांनी सचिन देव बर्मन यांच्या ‘ठंडी हवाय लहरा के आये…’ या गाण्यावरून घेतली होती. याच ट्यूनवर बॉलीवूडमध्ये अनेक गाणी बनली आहेत.
============
हे देखील वाचा : वैजयंतीमाला हिला राम और शाम या चित्रपटातून का काढले ?
============
‘या सिनेमात रमेश सिप्पी यांनी माझ्यापेक्षा कमल हसन आणि डिंपल कापडिया (Dimple Kapadia) यांचे कॅरेक्टर वर जास्त लक्ष देऊन ते चांगल्या पद्धतीने प्रेझेंट केले’ असा आरोप ऋषी कपूर यांनी त्याच्या ‘खुल्लम खुल्ला’ आत्मचरित्रामध्ये केला होता. कमल हसन मात्र या सिनेमानंतर बॉलीवूड मधून गायबच झाले. कारण हा सिनेमा बनायला तब्बल तीन साडेतीन वर्षे लागले. ‘दक्षिणेत चित्रपट निर्मितीमध्ये जे शिस्त असते ती बॉलीवूड मध्ये अजिबात नसते त्यामुळ साउथ कडील अनेक चांगले चित्रपट त्याच्या हातून निसटले’ असे त्याचे म्हणणे होते. डिंपल आणि ऋषी कपूर यांची केमिस्ट्री लोकांना ‘बॉबी’ पासून माहिती होती त्यामुळे चित्रपटाला चांगले यश मिळाले आणि डिंपल या सिनेमात खूप सुंदर दिसली होती. दुर्दैवाने हा त्या दोघांचा शेवटचा चित्रपट ठरला यानंतर पुन्हा ते कधीच एकत्र आले नाही !