
‘आय ॲम ॲन ॲक्सीडेंटल हिरो’ : अशोक कुमार
भारतीय चित्रपट सृष्टीतील पितामह अशोक कुमार (Ashok Kumar) यांनी अभिनयाची सुरुवात नायक म्हणून केली. नंतर चरित्र अभिनेता चांगली लोकप्रियता हासील केली. अशोककुमार तब्बल साठ हून अधिक वर्ष रुपेरी पडद्यावर कार्यरत राहिले. अशोक कुमार, किशोर कुमार आणि अनुप कुमार या तीन गांगुली बंधूंची धमाल प्रेक्षकांनी अनेक चित्रपटात बघितली, अशोक कुमार देखील एक मजेदार आणि दिलखुलास व्यक्तिमत्व होते. त्यांना खरं तर अभिनेता व्हायचंच नव्हतं. त्यांना मारून मुटकून हिरो बनवलं गेलं होतं. त्यामुळे ते स्वतःला ‘आय ॲम ॲन ॲक्सीडेंटल हिरो’ असं म्हणायचे! कारण त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की,” माझ्या आयुष्यामध्ये ॲक्सीडेंटल घटना खूपच घडल्या. त्यातीलच ही एक घटना होती!” या मुलाखतीत त्यांनी खूप मनोरंजक माहिती दिली होती.

त्यांनी सांगितले,” माझ्या जन्मापासूनच ही अपघाताची मालिका सुरू झाली होती” अशोक कुमार (Ashok Kumar) यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९११ या दिवशी झाला. त्या दिवशी शुक्रवार होता. फ्रायडे द थर्टीन्थ हा कन्सेप्ट युरोपात जरी असला तरी त्याचा इम्पॅक्ट सर्व जगभर आहे. या दिवशी अशुभ घटना घडतात असे समजले जाते. अशोक कुमार म्हणतात माझा जन्म बरोबर शुक्रवारी आणि १३ तारखेला झाला. घराण्यात पहिलाच सुपुत्र जन्माला आला म्हणून त्यांची आजी प्रचंड खुश झाली. आणि गावभर ‘नातू झाला नातू झाला’ म्हणून ओरडत फिरू लागली. या गडबड गोंधळामध्ये तिचा पाय घसरला आणि तिने जोरदार आपटी खाल्ली. तिचे डोके एका दगडावर आपटले आणि ब्रेन हॅमरेज होऊन बिचारी आपल्या नातवाचे मुख पाहण्याआधीच स्वर्गवासी झाली ! अशोक कुमार पुढे सांगतात,” माझ्या नामकरणाच्या दिवशी सर्व मंडळी घरात जमा झाली होती.
परंतु गुरुजींचा मात्र पत्ताच नव्हता. या ब्राह्मणाला बोलवण्यासाठी काही लोक गेले आणि हात हलवत परत आले. कारण असे लक्षात आले की, नामकरणाच्या विधीसाठी येणारे ब्राह्मण तयार होऊन निघाले असतानाच त्यांना अचानक अटॅक आला आणि ते निधन पावले !” अशोक कुमार ज्या दिवशी पहिल्यांदा शाळेत जाणार होते त्या दिवशी त्या काळातील प्रथेप्रमाणे पाटी पूजन करायचे होते. शाळेचे मुख्यध्यापक स्वतः घरी येऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते व स्वतःच्या हाताने लेखणी अशोक कुमारच्या हातात देऊन शिक्षणाचा ओनामा करणार होते. त्या दिवशी देखील मुख्यध्यापक घरातून निघताना जिन्यावरून त्यांचा पाय घसरला आणि गडबडत गडबडत ते खाली पडले. पायाचे हाड मोडले !
अशोक कुमार (Ashok Kumar) त्यानंतर आपल्या मेहुण्याच्या शशीधर मुखर्जी यांच्या बॉम्बे टॉकीज मध्ये लॅब असिस्टंट म्हणून जॉईन झाले. त्यांना अभिनयात काडीचा रस नव्हता. तेव्हा हिमांशु राय आणि त्यांची पत्नी देविकरानी हे बॉम्बे टॉकीज चे मालक होत. १९३५ साली बॉम्बे टॉकीज चा ‘जवानी की हवा’ हा चित्रपट बनत होता. या चित्रपटाचे चित्रीकरण चालू असताना चित्रपटाचा नायक नजमल हुसेन आणि चित्रपटाची नायिका देविकारानी यांचे सूत जुळले आणि नजमल हुसेन यांनी आपल्या चित्रपटाची नायिका आणि आपल्या कंपनीची मालकीण देविका राणी हिला घेऊन ते पळून गेले! त्यांचा शोध घेण्यासाठी शशीधर मुखर्जी आणि अशोक कुमार कलकत्त्याला पोहोचले. तिथे या दोघांना त्यांनी रंगे हाथ यात पकडले. देविका राणीला ते परत घेऊन आले आणि नजमल हुसेन याला हाकलून लावले. आता बॉम्बे टॉकीज मध्ये नायक म्हणून कोणाला घ्यायचे हा प्रश्न पडला. त्यावेळी बॉम्बे टॉकीज दोन चित्रपट ‘ममता’ आणि ‘मिया बीबी’ फ्लोअर वर होते. चित्रपटाचे गीतकार जे एस कश्यप यांनाच चेहरा रंगवून नायक बनवले. नायिका देविका रानी च होती.
१९३६ साली मात्र ‘जीवन नैय्या’ हा महत्त्वपूर्ण सिनेमा बॉम्बे टॉकीज ने तयार करायचे ठरवले. त्यावेळी पुन्हा एकदा नायकाचा शोध सुरू झाला. हिमांशु राय यांची नजर आपल्या लॅब असिस्टंट वर पडली व त्यांनी अशोक कुमारला चित्रपटाचा नायक होण्यास सांगितले. अशोक कुमारची (Ashok Kumar) खूप घाबरून गेले त्याने सांगितलं” मी कुठल्याही अँगलने नायक वाटत नाही आणि मला अभिनयात कुठलाही रस नाही मला तुम्ही या फंदात पाडू नका!” पण अशोक कुमार याला नायक बनवायचे त्यांनी ठरवलेच होते.
===========
हे देखील वाचा : जेव्हा ‘जयकिशन’ च्या लग्नात पल्लवीचे कन्यादान शंकरने केले !
===========
शशीधर मुखर्जी यांनी देखील त्याला तोच सल्ला दिला. त्या रात्री अशोक कुमारने (Ashok Kumar) काय करावे” तो सरळ एका न्हाव्या कडे गेला आणि आपले सर्व केस कापून टक्कल केले. दुसऱ्या दिवशी टकला अशोक कुमार बॉम्बे टॉकीज मध्ये आला. हिमांशु राय यांनी डोक्याला हात लावला. पण त्यांनी सांगितले,” तू असे काहीही केले तरी आम्ही तुलाच हिरो बनवणार आहोत. तुझ्या डोक्यावरचे केस उगवण्याची आम्ही वाट पाहतो !” अशा पद्धतीने दोन महिन्यानंतर त्यांनी अशोक कुमारला देविकारानी समोर उभे केले आणि अशोक कुमार नायक बनला !!