आईला मुलाच्या मृत्यूची बातमी १३ वर्ष समजलीच नाही…!
कधी कधी काही गोष्टी ऐकल्या की, काळीज पिळवटून टाकतात. एका मातेला तिच्या एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूची बातमी समजलीच नाही! किती वर्ष ? तब्बल तेरा वर्ष !! ती असं समजत होती की, माझा मुलगा लंडनला काही कामासाठी गेला आहे आणि लवकरच तो परत येईल. वस्तूतः तिचा हा कर्तबगार मुलगा मृत्यू पावलेला असतो आणि ही घटना तुम्ही आम्ही ओळखणाऱ्या एका सुप्रसिद्ध कलावंताच्या बाबत घडली होती. कोण होती ही दुर्दैवी माता ? कोण होता तिचा कर्तबगार मुलगा ? तिचा मुलगा म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील सर्वोच्च लोकप्रियता हासिल केलेला संगीतकार राहुल देव बर्मन तथा पंचम ! आणि ही दुर्दैवी माता होती मीरा सचिनदेव बर्मन. (R. D. Burman)
आपल्या संगीताने आणि स्वराने मागच्या तीन पिढ्यांना नादावून सोडणारा पंचम अनपेक्षितपणे वयाच्या ५३ व्या वर्षी ४ जानेवारी १९९४ या दिवशी आपल्यातून निघून गेला. सर्वांसाठीच ही मोठी शॉकिंग न्यूज होती. पंचम यांचे आई मीरा देव बर्मन त्यावेळी अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. या अल्झायमर किंवा स्मृतिभ्रंश या आजारामध्ये रुग्णाला मागचे फारसे आठवतच नाही. फक्त काही ठराविक गोष्टी लक्षात असतात त्याच आठवत असतात. हा आजार मीरा देव बर्मन यांना बऱ्याच दिवसापासून होता.(R. D. Burman)
३१ ऑक्टोबर १९७५ या दिवशी त्यांचे पती आणि संगीतकार सचिन देव बर्मन यांचे निधन झाले. त्यानंतर त्या एकाकी पडल्या. सत्तरच्या दशकाच्या प्रारंभी पंचम आपल्या पहिल्या पत्नीपासून विभक्त झाले नंतर १९८० च्या दरम्यान त्यांनी गायिका आशा भोसले यांच्या सोबत लग्न केले. मीरा देव बर्मन यांना आधार मिळाला. पण लवकरच त्या अल्झायमर या आजाराच्या शिकार झाल्या. आशा भोसले यांनी त्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली. परंतु ४ जानेवारी १९९४ या दिवशी राहुल देव बर्मन यांचे निधन झाले.
आपल्या एकुलता एक पुत्राचे निधन ही बातमी त्यांना सांगायची कशी ? हा मोठा प्रश्न पडला. तेव्हा जवळच्या नातेवाईकांनी ‘पंचम लंडनला कामासाठी गेले आहेत आणि लवकरच परत येतील’ असे मीरा देव बर्मन यांना सांगितले. हीच बातमी त्यांच्या डोक्यात फिट बसली. पुढची १३ वर्षे ते कायम ‘पंचम लंडनला गेला आहे आणि त्याचे काम संपले की मला भेटायला येईल’ असे सर्वांना सांगत. त्यांचे हे बोलणे ऐकून समोरच्याच्या काळजामध्ये कालवा कालवा व्हायची पण त्यांना सत्य सांगून काय उपयोग होणार होता ? त्यांचा लाडका पंचम त काही परत येणार नव्हता. त्यामुळे सर्वांनी अशाच पद्धतीने त्यांना संभ्रमात ठेवले. पुढे त्यांचा आजार वाढत गेला. १५ ऑक्टोबर २००७ या दिवशी मीरा सचिन बर्मन यांची प्राणज्योत मालवली.(R. D. Burman)
=============
हे देखील वाचा : सुनील दत्त नर्गिस च्या लग्नाची दुसरी गोष्ट !
=============
जाता जाता थोडंसं मीरादेव बर्मन यांच्याबद्दल. त्या मुलाच्या मीरा दासगुप्ता. कोमिला येथे त्यांचा जन्म १९१२ साली झाला. संगीतकार सचिन देव बर्मन आणि मीरा बर्मन यांची भेट कलकत्ता येथे झाली. तेव्हा मीरा नोबेल पारितोषिक विजेत्या अमर्त्य सेन यांच्या आईच्या विद्यार्थिनी होत्या. रवींद्रनाथ टागोर यांच्या विश्वभारती शांती निकेतन मध्ये त्या शिकत होत्या. काव्यसंगीत याची त्यांना देखील खूप आवड होती. १९३७ साली त्यांची भेट सचिन देव बर्मन यांचा सोबत झाली. ते परस्परांच्या प्रेमात पडले आणि त्याच वर्षी त्यांनी लग्न केले. लग्नानंतर मीरा देव बर्मन ह्या कायम सचिन देव बर्मन यांच्यासोबत असायच्या. त्यांची सांगितिक कारकीर्द फुलवण्यामध्ये मीरा देव यांचा मोठा सहभाग होता. त्या स्वतः उत्तम गीतकार आणि गायिका होत्या. बंगालमधील अनेक गाणी त्यांनी लिहिली होती तर काही गाण्यांना त्यांनी आपला स्वर देखील दिला होता.