‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘सरफरोश’ सिनेमातील बाला ठाकूर गेला तरी कुठे ?
तुम्ही सर्वांनी आमिर खानचा नव्वदच्या दशकाच्या प्रदर्शित झालेला ‘सरफरोश’ हा जॉन मॅथ्यू यांचा सुपर हिट चित्रपट बघितलाच असेल. आजही हा चित्रपट १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला हमखास कुठल्यातरी चॅनेलवर लागलेला दिसतो. या सिनेमात बाला ठाकूर ही भूमिका करणारा कलाकार आठवतो का ? बाला ठाकूर ही या चित्रपटात राजस्थानमधील एका स्मगलरची भूमिका होती. देखणा गोरापन चेहरा असलेला हा कलाकार कोण होता माहिती आहे का ? हा कलाकार होता राजेश जोशी. होता हा शब्द याकरिता की हा ‘सरफरोश’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच राजेश जोशीचे अपघाती निधन झाले. (Bala Thakur)
आज आपण या राजेश जोशी बद्दल थोडीशी माहिती घेऊयात. हा राजेश जोशी म्हणजे ख्यातनाम अभिनेते मनोज जोशी यांचा धाकटा भाऊ. ३१ जुलै १९६८ या दिवशी महाराष्ट्रातील कोकणात असलेल्या महाड येथे त्याचा एका गुजराती ब्राह्मण कुटुंबात त्याचा जन्म झाला. मोठा भाऊ मनोज जोशी सुरुवातीपासूनच अभिनयाच्या क्षेत्रात होता. मराठी, गुजराती नाटक तसेच हिंदी चित्रपटात त्याने खूप लवकर अभिनयाची यात्रा सुरू केली.
आपल्या मोठ्या भावाची अभिनय क्षेत्रातील वाटचाल पाहून धाकटा भाऊ राजेश जोशी देखील या क्षेत्राकडे वळला. त्याने देखील मराठी रंगभूमी वर काही भूमिका केल्या दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी एकदा एका मराठी नाटकांमध्ये राजेश जोशीला पाहिले आणि त्याला सिनेमासाठी स्क्रीन टेस्टला बोलावले. नव्वदच्या दशकाच्या आरंभी दक्षिणात्य अभिनेता नागार्जुनला घेऊन ते एक चित्रपट बनवत होते ‘द्रोही’ या चित्रपटात त्यांनी राजेश जोशीला लॉन्च केले. पहिल्याच चित्रपटात राजेश जोशीने दमदार अभिनयाचे दर्शन घडवले. राम गोपाल वर्मा तर राजेश जोशीच्या प्रेमातच पडले लगेच त्यांनी आपला पुढचा चित्रपट ‘रंगीला’ (१९९४) मध्ये त्याला आमिर खानच्या मित्राच्या भूमिकेत म्हणजेच पक्याच्या भूमिकेत घेतले. टपोरी बंबईय्या भाषेत बोलणारा आमिर खान आणि तसेच त्याच स्टाईलमध्ये दिसणारा पक्या सर्वांच्या आवडीचा ठरला. आता राजेश जोशीला मोठ्या ऑफर्स येवू लागल्या. (Bala Thakur)
त्यावेळी म्हणजे १९९६ साली अमिताभ बच्चन यांनी आपल्या एबीसीएल कंपनीच्या वतीने ‘तेरे मेरे सपने’ हा पहिला चित्रपट निर्माण केला. या चित्रपटात अर्षद वारसी आणि चंद्रचूड सिंग यांच्यासोबत राजेश जोशीने धमाल भूमिका केली होती. यात त्याने रंगवलेला ज्योतिषी प्रेक्षकांना खूप आवडला होता. राजेश जोशी आता सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसू लागला होता. अक्षय कुमारच्या ‘अफलातून’ या चित्रपटात त्याला मोठी भूमिका मिळाली होती. १९९८ साली त्याला दोन महत्त्वाचे सिनेमे मिळाले. एक होता राम गोपाल वर्मा यांचा ‘सत्या’ आणि दुसरा होता आमिर खानचा ‘सरफरोश’ दोन्ही चित्रपटात त्याच्या भूमिका महत्त्वपूर्ण होत्या. ‘सत्या’ मध्ये तर त्याचा सामना सौरभ शुक्ला आणि मनोज वाजपेयी या तगड्या अभिनेत्यांसोबत होता. ‘सरफरोश’मध्ये त्याने रंगवलेला बाळा ठाकूर जबरदस्त होता. या दोन्ही चित्रपटाचे चित्रीकरण संपले होते. आता राजेश जोशी साठी बॉलीवूड मध्ये मोठा स्पेस निर्माण होणार होता.सर्व मजेत चालले होते. पण दैवाला कदाचित हे मंजूर नसावे. (Bala Thakur)
==========
हे देखील वाचा : दुर्दैवी गायिका मुबारक बेगम : हमारी याद आयेगी ?
==========
कारण त्याच वेळी एक दर्दनाक घटना घडली ११ जानेवारी १९९८ या दिवशी राजेश जोशी आपल्या मोठ्या भावाचे मनोज जोशी चे नाटक ‘गांधी वर्सेस गांधी’ पाहण्या साठी चालला होता. मुंबईच्या वीर सावरकर मार्गावर त्यांच्या गाडीचा मोठा अपघात झाला आणि त्यामध्ये राजेश जोशी गंभीर रित्या जखमी झाला. रात्रभर डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याची शर्थ केली पण पहाटे हिंदुजा हॉस्पिटलमध्ये राजेश जोशी यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर त्या वर्षी ‘सरफरोश’ आणि ‘सत्या’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले आणि प्रचंड लोकप्रिय झाले. पण या दोन्ही सिनेमाचा यश पाहायला राजेश जोशी मात्र राहिले नाही. आज या घटनेला पंचवीस वर्षे उलटून गेली आहेत. मनोज जोशी यांनी एका व्हिडिओ मॅक्झिनला मुलाखत देताना आपल्या भावाबद्दल खूप काही सांगितलं होतं .कारकीर्द फुलण्याआधीच राजेश जोशी यांचे निधन झाले आता आपण जेव्हा कधी पुन्हा ‘सरफरोश’ हा सिनेमा पहाल तेव्हा बाला ठाकूर पाहताना राजेश जोशी कलाकाराची देखील आठवण ठेवा !