मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
‘हा’ सुपरहिट सिनेमा आशा पारेखला कसा मिळाला?
दोन वर्षांपूर्वी अभिनेत्री आशा पारेख यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. त्यावेळी एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या पहिल्या सिनेमाच्या काही रंजक आठवणी सांगितल्या होत्या. खरंतर अशा पारेख यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत १९५२ सालापासून अभिनय करायला सुरुवात केली होती.(जन्म २ ऑक्टोबर १९४२) लहानपणापासूनच तिने नृत्य या कलेत स्वतःला पारंगत करून घेतले होते. बालकलाकार म्हणून तिने ख्यातनाम दिग्दर्शक विमल रॉय यांच्या ‘मां’ (१९५२) आणि ‘बाप बेटी’(१९५४) या दोन चित्रपटात चाईल्ड आर्टिस्ट म्हणून काम केले परंतु दोन्ही सिनेमांना फारसे यश मिळाले नाही. (Asha Parekh)
विजय भट्ट यांनी ‘गुंज उठी शहनाई’ या चित्रपटासाठी आशा पारेख यांची नायिकेच्या भूमिकेसाठी निवड केली. आशा पारेख प्रचंड खुश झाली कारण ज्यांनी ‘बैजू बावरा’ सारखा चित्रपट निर्माण केला त्या दिग्दर्शकाकडे आपल्याला पहिलाच चित्रपट मिळतो आहे हा आनंद खूप मोठा होता. पण हा आनंद फार कमी काळ टिकला चित्रपटाचे काही दिवस शूट झाल्यानंतर दिग्दर्शकाला हीरोइन मध्ये फारसे ‘स्टार मटेरियल’ नाही असे वाटले आणि त्यांनी चक्क आशा पारेख ला आपल्या पहिल्या चित्रपटातून काढून टाकले. आशा पारेख अर्थातच खूप नाराज झाली. (Asha Parekh)
पण त्यानंतर देखील ती फिल्म पार्ट्यांमध्ये जात होती. अशाच एका फिल्मी पार्टीत एकदा फिल्मिस्तानचे शशीधर मुखर्जी यांची तिच्यावर नजर पडली. त्यांनी तिला दुसऱ्या दिवशी आपल्या ऑफिसमध्ये स्क्रीन टेस्ट साठी बोलावले पहिला अनुभव लक्षात घेता अशा पारेख थोडीशी नर्व्हस होती पण तरीही ती स्क्रीन टेस्ट ला गेली. निर्माते शशीधर मुखर्जी आणि दिग्दर्शक नासिर हुसेन यांनी तिची स्क्रीन टेस्ट घेतली आणि तिला सिलेक्ट केले आणि लवकरच आम्ही चित्रपट लॉन्च करत आहोत त्यात तू नायिका असतील असे सांगितले!” आशा पारेख ला खूप आनंद झाला पण तिने तो आनंद कुणासोबत शेअर केला नाही. कारण ‘गूंज उठी शहनाई’ चा एक कटू अनुभव तिच्या पाठीशी होता. त्यामुळे ती फक्त शशीधर मुखर्जी यांच्या फोन कॉल ची वाट पाहत राहिली. दोन दिवस झाले. चार दिवस झाले. आठवडा झाला. पण तिकडून काहीही रिस्पॉन्स मिळत नव्हता. आशा पारेखचा हळूहळू आता धीर खचू लागला होता. तिला वाटले शशीधर मुखर्जी यांना कदाचित दुसरी कुणीतरी चांगली हीरोइन मिळाली असेल त्यामुळे आपला पत्ता कट! तरी मनात कुठेतरी एक आशेचा किरण होताच की आपल्याला चित्रपट मिळणार आहे.(Asha Parekh)
रोज चातकासारखी ती त्यांच्याकडून येणाऱ्या निरोपाची वाट पाहत होती. अखेर दोन आठवड्यानंतर शशीधर मुखर्जी यांचा तिला फोन आला. त्यात त्यांनी सांगितले “उद्या सकाळी नऊ वाजता बरोबर गाडी तुझ्या दारात उभी राहील. शूटिंगला लगेच जायचे आहे!” आता आशा पारेख च्या आनंदाला पारावर राहिला नाही. रात्रभर त्या आनंदात तिला झोप लागली नाही. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी गाडी दारात उभी राहिली आणि आशा पारेख च्या अभिनयाची गाडी सुसाट धावू लागली. हा चित्रपट होता ‘दिल देके देखो’ या चित्रपटाची दिग्दर्शन नासिर हुसेन यांनी केले होते. गंमत म्हणजे या चित्रपटाची नायिका आधी अमिता होती परंतु निर्मात्याला ती फारशी आवडली नसल्यामुळे तिची छुट्टी झाली आणि त्या जागी आशा पारेख ची निवड झाली. आणि आशा पारेख ला ज्या सिनेमातून विजय भट्ट यांनी काढून टाकले होते त्या ‘गूंज उठी शहनाई ‘ मध्ये तिच्या जागी अमिता ला घेतले. एका दृष्टीने दोघींची फिट्टम फाट झाली ! (Asha Parekh)
===========
हे देखील वाचा : राजेंद्र कुमार आणि गीताबाली यांचं अनोखं नातं
============
‘दिल देके देखो’ आशा पारेख साठी खूप महत्त्वाचा ठरला कारण या चित्रपटाने अफाट यश मिळवले या चित्रपटाला संगीत उषा खन्ना यांचे होते तर या चित्रपटाचा नायक रिबेल स्टार शम्मी कपूर होता. हा चित्रपट आशा पारेख च्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील खूप महत्त्वाचा होता कारण या चित्रपटापासून तिच्या जीवनात नासिर हुसैन यांचा प्रवेश झाला यांच्यासोबत पुढची दहा वर्ष तिने प्रत्येक चित्रपटात नायिकेची भूमिका केली. ही आठवण आशा पारेख हिने आपल्या ‘हिट गर्ल’ या आत्मचरित्रात सांगितली आहे.