स्वतः गाणे लिहून देखील त्याचे क्रेडिट न घेणारा गीतकार !
सिनेमाच्या दुनियेत असंख्य कलाकार मोठी स्वप्न घेऊन येतात. पण प्रत्येकालाच यश मिळते अशातला भाग नाही. अर्थात गुणवत्तेचं आणि यशाचं काहीही कनेक्शन नसतं. त्यामुळे कितीतरी प्रतिभावान कलावंत इथे सपशेल अयशस्वी झालेले दिसतात. काही कलाकार तर आयुष्यभर उमेदवारी करताना दिसतात. त्यापैकीच एक होते गीतकार अभिलाष. गीतकार अभिलाष म्हटलं की त्यांचं एक गाणं लगेच आठवतं ते म्हणजे ‘अंकुश’ या चित्रपटातील ‘इतनी शक्ती हमे दे ना दाता…’ आज हे गीत देशातील अनेक शाळांमधून प्रार्थना गीत म्हणून गायलं जातं. (Singer)
अभिलाष यांच्या गीतांमध्ये सच्चा भावना असायच्या ते कलाकार म्हणून जितके ग्रेट होते तितकेच ते एक माणूस म्हणून देखील ! रेडिओवरील एका मुलाखतीत त्यांनी हा एक किस्सा शेअर केला होता. गीतकार अभिलाष विविध भारतीवरील हवामहल हा कार्यक्रम अनेक वर्ष लिहीत होते. १९७५ साली ‘ रफ्तार’ या चित्रपटातील ‘संसार है इक नदिया…’ हे त्यांचं गाणं खूप गाजलं. पण त्यानंतर पुन्हा त्यांचा बेकारीचा कालखंड सुरू झाला. १९७७ साली गीतकार अभिलाष यांना राजश्री प्रॉडक्शनच्या ऑफिसमध्ये बोलावले. त्यावेळी या संस्थेचा ‘ सावन को आने दो’ हा चित्रपट फ्लोअर वर होता. या चित्रपटातील एक गाणे अभिलाष यांना लिहायला सांगितले. राजश्री चे चित्रपट म्हणजे सात्विक संस्कारी. (Singer)
यात आपल्या प्रेयसीचे वर्णन करताना त्याला एक आध्यात्मिक टच देऊन गाणे लिहायला अभिलाष यांना सांगितले. गीतकार अभिलाष यांनी ते आव्हान स्वीकारले आणि अतिशय सुंदर असे गीत त्यांनी लिहिले. गीताचे बोल होते ‘तेरे बिन सुना मेरे मन का मंदीर आरे आ….’ प्रेमाची अतिशय सात्विक संस्कारी भावना या गीतातून व्यक्त होत होत्या. हे गीत येसुदास यांनी तितक्याच ताकतीने गायले. या चित्रपटातील गाणी अनेक गीतकारानी लिहिली होती. तब्बल सात ते आठ गीतकारांची गाणी या चित्रपटासाठी वापरली. उत्तरेकडील पुरुषोत्तम पंकज नावाचे एक कवी होते. त्यांना देखील राजश्री प्रोडक्शन ने या चित्रपटातील गाणी येण्यासाठी पाचारण केले होते. त्यांना देखील एक सिच्युएशन दिली होती. त्यानुसार त्यांनी गाणे लिहायला सुरुवात केली. गाण्याचे बोल होते ‘चांद जैसे मुखडे पे बिंदिया सितारा नही भुलेगा मेरी जान ये आवारा…’ (Singer)
या गाण्याचा मुखडा चित्रपटाचे दिग्दर्शक कनक मिश्रा यांना खूप आवडला. त्यांनी पुरुषोत्तम पंकज यांना या गाण्याचे अंतर लिहायला सांगितले. पण दुर्दैवाने त्याच रात्री पुरुषोत्तम पंकज यांचे हृदयविकारा झटक्याने निधन झाले आणि गाणे अर्धवटच राहिले. आता काय करायचे? ताराचंद बडजात्या यांनी गीतकार अभिलाष यांना बोलावले आणि त्यांना सांगितले की,” माझ्याकडे एका गाण्याचा मुखडा आहे. या गाण्याचे अंतरे तुम्हाला लिहायचे आहे” त्यावर अभिलाष म्हणाले,” ज्या व्यक्तीने मुखडा लिहिला आहे त्यालाच पुढच्या अंतरे लिहायला सांगा. म्हणजे गाणे चांगले होईल!” त्यावर ताराचंद यांनी संपूर्ण किस्सा अभिलाष यांना सांगितला. अभिलाष हा संपूर्ण प्रसंग ऐकून गंभीर झाले.
ते म्हणाले ,”मी गाणे पूर्ण करेल फक्त माझी एक अट असेल. हे गाणे जरी मी लिहिले तरी या गाण्याचे संपूर्ण क्रेडिट तुम्ही पुरुषोत्तम पंकज यांना दिले पाहिजे. तसेच या गाण्याचे जे मानधन तुम्ही मला देणार आहात. ते मला न देता पुरुषोत्तम पंकज च्या कुटुंबीयांना द्या!” त्यावर ताराचंद बडजात्या म्हणाले ,” अहो तुमची कारकीर्द आत्ताच कुठे सुरू होते आहे आणि एवढा त्याग का करता?” त्यावर अभिलाष म्हणाले,” जी गोष्ट माझी नाही त्याचे क्रेडिट मी कसे घेऊ? पुरुषोत्तम पंकज यांनी लावलेले हे रोपटे आहे. मी त्याला फक्त वाढवतो आहे. अशा पद्धतीने या गाण्याचे सर्व अंतरे अभिलाष यांनी लिहिले. चित्रपटात आणि रेकॉर्ड वर मात्र हे गाणे पुरुषोत्तम पंकज यांच्या नावावरच दाखवले गेले. अभिलाष यांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा एक जबरदस्त पैलू या निमित्ताने प्रेक्षकांच्या समोर आला! या सिनेमातील गाणी अनेक गीतकारांनी लिहिली होती. इंदीवर, फौक जामी,मदन भारती,अभिलाष,माया गोविंद,पुरण कुमार होश,गौहर कानपुरी आणि पुरुषोत्तम पंकज हे आठ गीतकार होते. संगीत राजकमल यांचे होते.(Singer)
============
हे देखील वाचा : दुर्दैवी गायिका मुबारक बेगम : हमारी याद आयेगी ?
===========
न केलेल्या कामाचे क्रेडिट घ्यायला आज काल हजारो लोक पुढे येतात. पण स्वतः केलेल्या कामाचे क्रेडिट दुसऱ्यांना देणारे गीतकार अभिलाष खरोखरच ग्रेट म्हणावे लागतील !
,