गायक मुकेशचा दिलदारपणा…
बऱ्याचदा असं होतं की, चित्रपट सुपरफ्लॉप होतो पण त्यातील एखादं गाणं मात्र वर्षानुवर्ष गाजत राहतं. काही कालावधीनंतर हे गाणं हीच या चित्रपटाची एकमेव आठवण राहते. असे अनेक चित्रपट आहेत की, आपल्याला नावा व्यतिरिक्त काहीही आठवत नाही. परंतु त्यातील एखादं गाणं मात्र आपल्या स्मृती पटलामध्ये अगदी जिवंत असतं. असाच एक चित्रपट १९७५ साली आला होता. या चित्रपटांमध्ये विनोद मेहरा आणि मौसमी चटर्जी यांची प्रमुख भूमिका होती. चित्रपटाचं दिग्दर्शन दिनेश – रमनेश यांनी केलं होतं. या सिनेमाची गाणी वर्मा मलिक आणि अभिलाष यांनी लिहिली होती. चित्रपटाचे नाव होते ‘रफ्तार’. (Mukesh)
खरंतर तो सर्व ॲक्शन पॅक सिनेमाचा काळ होता. त्यामुळे संगीत थोडंसं मागे पडत होतं. या चित्रपटाला संगीत सोनिक ओमी यांनी दिलं होतं. सोनिक ओमी हे काका पुतणे अतिशय गुणी परंतु केवळ संधी न मिळाल्यामुळे काही निवडक चित्रपटाच त्यांच्या हाती आले. पण ज्या ज्या वेळी त्यांना संधी मिळाली त्या त्या वेळी त्यांनी त्या संधीचे सोने केलं. ‘रफ्तार’ या चित्रपटात गीतकार अभिलाष यांनी एक गाणं लिहिलं होतं.(Mukesh)
या सिनेमाच्या दिग्दर्शकाने अभिलाष यांना सांगितले गेले की, हे गाणे एक व्हायोलिनिस्ट चित्रपटात गातो. एक मुलगी आत्महत्या करायला निघालेली असते हा तिला वाचवतो आणि ‘आयुष्य संपवण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे’ असा मोटिवेशनल संदेश या गाण्यातून अभिलाष यांना लिहायचा असतो. अभिलाष यांचे कदाचित हे पहिले गाजलेले गीत असावे. रसिकांना ठाऊक असेल ऐंशीच्या दशकात एन चंद्रा यांच्या ‘अंकुश’ या चित्रपटात त्यांनी लिहिलेले ‘इतनी शक्ती हमे देना दाता….’ हे गाणे आजही अनेक शाळांमधून प्रार्थना गीत म्हणून म्हटले जाते. रफ्तार या चित्रपटातील हे गाणे मदनपुरी यांच्यावर चित्रित झाले होते.(Mukesh)
गाण्याची सिच्युएशन समजल्यानंतर त्यांनी आपल्या हाती आलेल्या संधीचा चांगला उपयोग करून घेण्याचे ठरवले आणि त्यांनी गाणे लिहिले ‘संसार है एक नदिया दुःख सुख दो किनारे है…’ हे गाणे लिहिल्यानंतर अभिलाष आपले गुरु साहीर लुधियानवी यांना हे गीत दाखवण्यासाठी गेले. साहीर यांना देखील हे गाणे खूप आवडले. अभिलाष यांनी चक्क दहा कडवी या गाण्याची लिहिली होती. यातील निवडक कडवी घेऊन गाणे रेकॉर्डिंग करायचे ठरले.
चित्रपटात हे गाणे एक व्हायोलिन वाजवणारी व्यक्ती गाणे गाणार असल्याने या गाण्यात व्हायोलीन चा खूप जास्त वापर करण्यात आला होता. व्हायोलीन वादकांची एक फौजच संगीतकार सोनिक ओमी यांनी उभी केली होती. शिवरंजनी रागावर हे गाणे रचले होते. या गाण्यासाठी म्युझिक अरेंजर म्हणून उत्तम सिंग होते. उत्तम सिंग हे स्वतः चांगले व्हायोलिन वादक होते. रेकॉर्डिंग सुरू झाले. या रेकॉर्डिंग च्या वेळचा एक गमतीदार किस्सा उत्तम सिंग यांनी विविधभारती वरील एका कार्यक्रमात सांगितला होता. (Mukesh)
============
हे देखील वाचा : ‘या’ चित्रपटातील आनंदची भूमिका राजकपूर यांना द्यायची होती…
============
मुकेश (Mukesh) आणि आशा भोसले यांनी गायला सुरुवात केली. परंतु थोडा वेळ झाला की संगीतकार सोनिक ओमी जोरात कट कट असे ओरडले. एक व्हायलीन वादक (ज्याचे नाव विजय होते) व्यवस्थित व्हायोलिन वाजवत नव्हते. ओमी त्याच्यावर खूप चिडले. पुन्हा रेकॉर्डिंग सुरू झाली. पुन्हा तोच प्रकार झाला. आता ओमी त्याच्यावर खूपच वैतागले. तेव्हा वातावरण खूप तणावपूर्ण झाले होते. गायक मुकेश हा सर्व प्रकार पाहत होते. ते बाहेर येऊन त्या विजय ला म्हणाले,” अरे विजय मी बेसुरा गातोय म्हणजे तू सुध्दा बेसुरे वाजवलेच पाहिजे का ? तू नीट वाजव ना मित्रा!” मुकेश यांच्या या वाक्याने रेकोर्डिंग स्टुडिओत सर्वत्र हसण्याची लाट उसळली. माहौल एकदम बदलला. सोनिक ओमी देखील हसू लागले. सर्वांचा मूड फ्रेश झाला. मुकेशने स्वतःकडे कमीपणा घेऊन वातावरणातील तणाव कमी केला आणि या गाण्याचे रेकॉर्डिंग व्यवस्थित झाले. मुकेश यांचा ग्रेटनेस इथे दिसून येतो. आज हा चित्रपट कोणाला आठवण्याची सुतराम शक्यता नाही पण पन्नास वर्षे होऊन गेली तरी या गाण्याची गोडी आजही कायम आहे !