‘जिलबी’१७ जानेवारीला भेटीला;प्रसाद ओक स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे पहिल्यांदाच एकत्र!
इतर चित्रपटांपेक्षा वेगळा आहे दिग्पालचा ‘शिवरायांचा छावा’ !
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची एक लाटच आली आहे. त्यात मराठ्यांचा इतिहास महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे मराठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात चित्रपटगृहात खेचले जातात. याच ऐतिहासिक चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये घेतलं जाणार प्रमुख नाव म्हणजे ‘दिग्पाल लांजेकर’! दिग्पालने आतापर्यंत ‘शिवराज अष्टक’च्या रूपातून शिवगाथांवर आधारित मराठा इतिहास मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यानंतर आता त्याने आपला मोर्चा शंभूगाथेकडे वळवला आहे. ‘छत्रपती संभाजी महाराज’ हे मराठ्यांच्या इतिहासातलं एक धगधगतं पर्व! त्यांच्या पराक्रमी गाथेतील एक प्रसंग म्हणजे बुऱ्हाणपुरची लूट! याच विषयावर दिग्पालचा नवा चित्रपट ‘शिवरायांचा छावा’ बेतलेला आहे.(Shivrayancha Chhava Movie Review)
चित्रपटाची सुरुवात होते तीच शंभू राजांच्या राज्याभिषेकापासून! शंभू राजांच्या भूमिकेचं धनुष्य पेललं आहे अभिनेता ‘भूषण पाटील’ याने. सुरुवातीलाच समस्त मराठे सरदार, मंत्र्यांची ओळख करून दिली जाते. हा चित्रपटाचा एक जमेचा भाग म्हणता येईल. कारण, इतिहासातील अशी नावे अनेकदा प्रेक्षकांना माहीत नसतात. ऐतिहासिक चित्रपटांमध्ये सिनेमॅटिक लिबर्टी घेण्याशिवाय पर्याय नसतो. पण दिग्पाल अनेकदा लिबर्टी दूर ठेऊन ऐतिहासिक तथ्य समोर ठेवतो.(Shivrayancha Chhava Movie Review)
सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ‘बुऱ्हाणपुरची लूट’ हाच चित्रपटाचा मुख्य विषय असल्यामुळे चित्रपट १६८०-८१ या दोनच वर्षांत घडताना आपल्याला दिसतो. यामध्ये शंभूराजेंच्या जन्मापासून ते शिवरायांच्या निधनापर्यंत आणि त्यादरम्यान रायगडावर झालेला क्लेश हा संपूर्ण भाग अत्यंत काळजीपूर्वक टाळण्यात आला आहे. चित्रपटाच्या फर्स्ट हाफमध्ये संपूर्ण कथानक रंगवून सांगितलं आहे, तर दुसऱ्या हाफमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न दिग्पालने केला आहे.
अभिनयाबद्दल बोलायचं झालं, तर एक ऐतिहासिक पात्रं म्हणून भूषण म्हणावं तितका प्रभाव पाडू शकला नाही. डायलॉग डिलिव्हरीपासून ते एक राजा म्हणून असणारे हावभाव हवे तितके खिळवून ठेवू शकले नाहीत. पण, फाईट सिक्वेन्स, तलवारबाजी यांसारखे सीन त्याने उत्कृष्टरित्या केले आहेत. त्या प्रसंगातून त्याची मेहनत दिसून येत आहे. बॉलिवूडमध्ये खलनायक म्हणून गाजलेला ‘राहुल देव’ या चित्रपटात क्रूर मुघल सरदार ‘काकर खान’ हे पात्रं साकारताना दिसत आहे. त्याने आपला क्रूरपणा आपल्या अभिनयातून उत्तमरित्या दाखवला आहे. राजमाता जिजाऊ आणि छ. शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत अनुक्रमे ‘मृणाल कुलकर्णी’ व ‘चिन्मय मांडलेकर’ यांची छोटी पण प्रभावी भूमिका आहे. ‘समीर धर्माधिकारी’ म्हणजे दिग्पालच्या चित्रपटांची आणखी एक जमेची बाजू! यावेळी त्यांनी साकारलेला औरंगजेब हा देखील तितक्याच ताकदीचा आहे. या चित्रपटाच्या रूपाने ‘अभिजीत श्वेतचंद्र’ याच्यातला कसलेला कलाकार प्रेक्षकांसमोर आला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्याचा पडद्यावरचा वावर हा अत्यंत लक्षवेधी आहे. ‘बिपीन सुर्वे’ याने साकारलेलं नकारात्मक पात्रं, त्याचे हावभाव व हिंदी भाषेची शब्दफेक हे सारं लक्षात राहण्यासारखं आहे.(Shivrayancha Chhava Movie Review)
आता चित्रपटाच्या इतर बाबींकडे वळूया. चित्रपटातील वेशभूषा, मेकअप आणि दमदार डायलॉग्स व दिग्दर्शन ही या चित्रपटाची मोठी व प्रभावशाली पकड म्हणावी लागेल. संवादातील इमोशनल बॉंडमुळे चित्रपट प्रेक्षकांना अधिक जोडून ठेवतो. १६ व्या शतकातील काळ, त्या काळातील सर्व पात्रं उभी करण्याची ताकद दिग्पालकडे आहे, हे या चित्रपटातून पुन्हा एकदा सिद्ध होतं. मराठ्यांचा इतिहास हा भावनांशी जोडून असल्यामुळे आपला प्रत्येक चित्रपट दिग्पाल त्या पद्धतीने सादर करतो. ऐतिहासिकदृष्ट्या पाहायचं झालं तर राज्याभिषेकानंतर अवघ्या १५ दिवसांनी महाराजांनी बुऱ्हाणपुरची मोहीम हाती घेतली होती. त्यासाठी शंभू राजेंनी केलेली योजना सिनेमॅटिक लिबर्टी घेऊनही योग्यरीत्या मांडण्यात आली आहे. एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, औरंगजेबाने शहजादा अकबराला लिहिलेल्या पत्रात बुऱ्हाणपुराचा उल्लेख ‘विश्वसुंदरीच्या गालावरचा तिळ’ असा केला होता, हीच गोष्ट चित्रपटाच्या एका संवादात सांगण्यात आली आहे. इतक्या बारकाईने अभ्यास करून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.
चित्रपटाची काही अंशी फसलेली बाजू म्हणजे, संगीत! ते इतर ऐतिहासिक चित्रपटांसारखं प्रभाव पाडणारं नाही. यातील गाणी काहीशी आधुनिक पद्धतीची वाटत आहेत, त्यांना कुठेही १६व्या शतकाची जोड नाही. दोन गाण्यांतील नृत्य देखील काहीसं आजच्या काळातील आहे. राजाराम महाराज देखील दाखवले गेले नाहीत. चित्रपटातील शंभू राजे व वाघाच्या युद्धाचा सिन हा ‘पुअर व्हीएफएक्स’ म्हणून गणला जाऊ शकतो. काही डायलॉग्सची मराठी व हिंदी भाषा ही आजच्या काळातील वाटते. त्यामुळे काही बाबतीत चित्रपट अजून चांगला करता आला असता असं सतत वाटंत राहतं.(Shivrayancha Chhava Movie Review)
===========
हे देखील वाचा : रेडिओचे चित्रपटाशी घट्ट नाते…
===========
छत्रपती संभाजी महाराजांवर या एकाच वर्षात तीन चित्रपट येणार होते. दोन चित्रपट प्रदर्शित झाले, त्यात एक म्हणजे ‘संभाजी १६८९’ आणि दुसरा ‘शिवरायांचा छावा’! तिसरा चित्रपट लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित असून त्यामध्ये ‘विकी कौशल’ छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. हा बिग बजेट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे आता यातला कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात अधिक यशस्वी होतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.(Shivrayancha Chhava Movie Review)
एकंदरीत दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ प्रेक्षकांनी एकदातरी सिनेमागृहात जाऊन पहावा असा चित्रपट आहे.
‘कलाकृती मीडिया’ या चित्रपटाला ३.५★ देत आहेत.