‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
सुभाष घई यांनी एका फ्लॉप सिनेमाचा सुपरहिट रिमेक
भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये रिमेक करण्याचा पायंडा फार पूर्वीपासून आहे. १९४० साली प्रदर्शित झालेल्या ‘औरत’ या चित्रपटाचा रिमेक मेहबूब यांनीच १९५७ साली ‘मदर इंडिया’ च्या रूपाने केला होता. रिमेक बनवताना तीन गोष्टी असतात एक तर सिनेमाचा ऑफिशियल रीमेक असतो किंवा सिनेमा कॉपीड असतो किंवा सिनेमा इन्स्पायरड असतो. जनरली यशस्वी सिनेमाचे रिमिक्स बनवले जातात कारण तिथे यशाची खात्री असते. फ्लॉप सिनेमाचा रिमेक बनवायच्या फंदात कुणी सहसा पडत नाही. पण शोमन सुभाष घई (Subhash Ghai) यांनी एका फ्लॉप चित्रपटाचा रिमेक करण्याचे धाडस दाखवले. जो चित्रपट आठवडाभर देखील थिएटर वर टिकू शकला नाही त्याच सिनेमाची कथा घेऊन सुभाष घई(Subhash Ghai) यांनी एक बंपर हिट सिनेमा चक्क एका वर्षाच्या आत बनवला. हा सिनेमाच फक्त सुपरहिट झाला असे नाही तर यातील कलाकार देखील सुपरस्टार बनले! ही खूप मोठी गोष्ट होती. कोणता होता हा चित्रपट? काय होता हा नेमका किस्सा?
संवाद लेखक सलीम जावेद यांची जोडी ऐंशीच्या दशकामध्ये फुटली. नंतर दोघे ही स्वतंत्र काम करू लागले. त्या नंतर जावेद अख्तर ‘सिलसिला’ (१९८१) पासून गीत लेखनाकडे वळाले तर सलीम खान स्टोरी/ स्क्रीन प्ले या प्रकाराकडे वळाले. सलीम खान यांनी त्या काळात नाम, जुर्म, कब्जा, पुकार, पत्थर के फूल हे चित्रपट लिहिले. काही सिनेमांना चांगले यश मिळाले होते तर काही फ्लॉप ठरले होते. सलीम यांच्या लेखणीतून उतरलेला ‘फलक’ हा एक चित्रपट १ एप्रिल १९८८ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशीलाल नायर यांनी केले होते. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, मोहन भंडारी, शेखर कपूर, सुप्रिया पाठक, माधवी, विक्रम गोखले, किरण कुमार आणि राखी यांच्या भूमिका होत्या.
चित्रपटाचे कथानक दोन भावांच्या जीवनावर होते. एक सूड कथा होती. यात एक भाऊ वकील असतो जी भूमिका मोहन भंडारी यांनी केली होते.. ते दोघेही आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी एकत्र येतात. या सिनेमाचे स्क्रीनिंग सांताक्रुज इथल्या एका थिएटरमध्ये दिग्दर्शकाने ठेवले होते. बॉलीवूडमधील नामचीन दिग्दर्शक या स्क्रीनिंग उपस्थित होते. सुभाष घई (Subhash Ghai) देखील तिथे उपस्थित होते. चित्रपट संपल्यानंतर सर्वांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. सुभाष घई हे दिग्दर्शक शशिलाल नायर आणि सलीम खान यांना भेटले. सलीम खान यांना ते म्हणाले ,” चित्रपटाचे कथानक चांगले आहे. पण स्क्रीन प्ले खूपच स्लो आहे. डायलॉग चांगले आहेत. पण कथेला फ्लो नाही. पण तरीही मला हा प्लॉट आवडला आहे. या प्लॉटवर मी नक्कीच एक चांगला कमर्शियल मेगा हिट सिनेमा बनवू शकतो!”
सुभाष घई एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी लगेच यावर काम देखील सुरू केले आणि एक वर्षात चित्रपट पूर्ण करून प्रदर्शित देखील केला. हा चित्रपट होता राम लखन! जॅकी श्रॉफ , अनिल कपूर, माधुरी दीक्षित, डिम्पल, अमरीश पुरी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. ‘फलक’ आणि ‘राम लखन’ या दोन्ही चित्रपटाचे कथानक सारखेच होते परंतु ट्रीटमेंट दोन्ही सिनेमाला वेगवेगळी होती. फलक मधील वकील भाऊ इथे पोलीस अधिकारी दाखवला होता. राखी मात्र दोन्ही कडे सारख्याच भूमिकेत होती. सुभाष घई यांनी प्रत्येक पात्राला एक वेगळा रंग दिला. मग ते पॉझिटिव असो वा निगेटिव्ह. प्रत्येक पात्राला एक वेगळी ओळख दिली. त्यामुळे सुभाष घई यांच्या सिनेमातील प्रत्येक पात्र आपल्याला आज देखील लक्षात राहतात.
=======
हे देखील वाचा : राजश्रीचा तो सिनेमा ठरला ऑल टाईम हिट
=======
या सिनेमात माधुरी दीक्षित ची एन्ट्री कशी झाली? खरंतर माधुरीला घेऊन सुभाष घई ‘कर्मा’ या चित्रपटात एक गाणे करणार होते पण ते शक्य झाले नाही. त्यावेळी त्यांनी सांगितले की मी तुला लवकरच माझ्या सिनेमात चांगल्या पद्धतीने लॉन्च करेल. पण ‘कर्मा’ या चित्रपटाचे शूटिंग लांबल्यामुळे त्या आधीच तिचा ‘तेजाब’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि ती स्टार म्हणली. या स्टार डम चा फायदा राम लखन ला देखील झाला. ‘राम लखन’ हा सिनेमा सुपर डुपर हिट ठरला. सलीम खान यांच्या एका फ्लॉप चित्रपटाच्या हिट कहानीला घेऊन सुभाष घई यांनी लार्ज स्केलवर एक मेगा एंटरटेनमेंट फिल्म बनवली. या सिनेमा ने अनिल कपूर, माधुरी दीक्षित यांची कला कारकीर्द बहरली. जॅकी श्रॉफ यांच्या कला जीवनाला देखील वेगळा आधार मिळाला.
जर दिग्दर्शकाकडे कल्पकता असेल तर तो कोणत्याही प्लॉटला यशस्वी बनवू शकतो हेच यातून सिद्ध झालं.