‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
सरस्वती चंद्र च्या गाण्याचा भन्नाट किस्सा!
चित्रपटामध्ये गीतकार आणि संगीतकार यांच्यातील नातं हे फिल्मी भाषेत सांगायचं तर ‘चोली दामन का साथ होता है’. दोघांमध्ये जर व्यवस्थित ट्युनिंग असेल तर अप्रतिम गाणे तयार होते. जनरली संगीतकार आधी ट्यून तयार करतो आणि गीतकार त्या वर शब्द फिट करतो. असा प्रकार आपल्या हिंदी सिनेमात रूढ आहे. पण दरवेळी असंच होतं का? तर नाही.
कधी कधी गीतकार आपलं गाणं लिहून संगीतकाराकडे देतो आणि संगीतकार त्या शब्दांना चाल चालतो. या म्युझिक सिटिंगच्या वेळी
बऱ्याचदा गीतकार आणि संगीतकार यांच्यात चर्चा होऊन काही शब्द बदलले जातात. काही गीतकार आपल्या शब्दांबाबत खूप आग्रही असतात. त्यातून अनेकदा वाद देखील होतात. असाच एक प्रसंग गीतकार इंदीवर (Indeevar) आणि संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्या एका लोकप्रिय गाण्याच्या बाबत झाला होता. कोणते होते हे गाणे? काय झाला होता वाद? खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे.
साठच्या दशकाच्या उत्तरार्धात दिग्दर्शक गोविंद सरय्या यांनी ‘सरस्वतीचंद्र’ या गोवर्धन राम त्रिपाठी यांच्या कादंबरीवर एक अप्रतिम चित्रपट बनवला होता. खरंतर हा चित्रपट कृष्णधवल होता; चित्रपटाचे बजेट कमी होते पण एक कल्ट क्लासिक म्हणून आज देखील या सिनेमाला ओळखले जातो. या चित्रपटात अभिनेत्री नूतन आणि अभिनेता मनीष यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. नूतनच्या अप्रतिम अभिनयासाठी आज देखील हा चित्रपट आठवला जातो. या सिनेमातील सर्व गाणी आज देखील रसिकांच्या आवडीची आहेत. या चित्रपटातील एका गाण्याच्या मेकिंग च्या वेळेसचा हा किस्सा आहे. हे गाणं होतं ‘छोड दे सारी दुनिया किसी के लिये…..’ इंदीवर (Indeevar) यांनी हे गाणं आधीच लिहून ठेवलं होतं. त्याला संगीतकार कल्याणजी यांनी चाल लावली. जेव्हा या गाण्याचा मुखडा त्यांनी ऐकला त्यांना हे गाणं प्रचंड आवडलं.
परंतु संपूर्ण गाणं वाचल्यानंतर त्यांना या गाण्यातील एक शब्द खटकला आणि तो शब्द बदलण्यासाठी त्यांनी इंदीवर (Indeevar) यांच्याकडे आग्रह धरला. हा शब्द होता ‘मुनासिब’. ‘छोड दे सारी दुनिया किसी के लिये ये मुनासिब नही आदमी के लिये…’ अशी ती ओळ होती. गीतकार इंदीवर यांनी ‘मुनासिब’ हाच अतिशय योग्य शब्द आहे असे सांगितले. मात्र संगीतकार कल्याणजी आनंदजी या जोडीला हा शब्द खटकत होता. ते म्हणाले ,”दुसरा कुठला तरी शब्द इथे वापरा. संपूर्ण गाणे शुध्द प्रासादिक हिंदीत वाटते तर हा शब्द उर्दू वाटतो. आणि इथे मिस फिट वाटतो.” त्यावर इंदिवर म्हणाले, ” दुसरा कुठलाही शब्द येथे फिट होऊ शकत नाही. ‘मुनासिब’ या शब्दाचा अर्थ शक्य नाही, उचित नाही, योग्य नाही असा आहे. इथे मुमकिन हा शब्द देखील चालणार नाही. मुमकिन या शब्दांमध्ये कुठेतरी शक्यता गृहीत धरलेली आहे. पण इथे तो प्रकार नाही. कुणाच्या तरी प्रेमाने संपूर्ण आयुष्य उध्वस्त करून टाकणं बरोबर नाही. असा यातून संदेश मला द्यायचा आहे!”
हे देखील वाचा : हम बने तुम बने एक दुजे के
तब्बल आठवडाभर गीतकार आणि संगीतकार यांच्यात वाद होत राहिले अनेक शब्द, अनेक डिक्शनऱ्या, अनेकांना फोन केले गेले. पण दुसरा योग्य शब्द काही सापडला नाही. शेवटी नाराजीने त्यांनी तोच शब्द वापरायचे ठरवले. पण इंदीवर म्हणाले,” तुम्ही आज या शब्दाबाबत नाराज आहात पण उद्या पहा हेच गाणं प्रचंड गाजणार आहे आणि कुणालाही हा शब्द खटकणार नाही!” गायिका लता मंगेशकर यांनी देखील या मताला दुजोरा दिला आणि गाण्याचे रेकॉर्डिंग झाले. चित्रपट प्रदर्शित झाला. हे गाणे प्रचंड गाजले. चित्रपट देखील सुपरहिट झाला.
इंदीवर (Indeevar) यांचे म्हणणे खरे ठरले. गीतकार इंदीवर (Indeevar) यांनी हा किस्सा विविध भारती वरील एका मुलाखतीत सांगितला होता. या मुलाखतीत त्यांनी आणखी दोन गाण्यांचा उल्लेख केला जी राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केली होती आणि ती इंदीवर यांनी खूप आधीच लिहिली होती. राजेश रोशन यांनी यातील एकही शब्द न बदलता त्याला चाल लावली. आणि ती दोन्ही गाणी लोकप्रिय ठरली. ही गाणी होती ‘आखिर क्यू’ या चित्रपटातील. ‘दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है उम्रभर का गम हमे इनाम दिया है’ हे लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं आणि दुसरं गाणं मोहम्मद अजीज यांनी गायलं होतं या गीताचे बोल होते ‘एक अंधेरा लाख सितारे….’