‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
आर के फिल्म्स मधील किशोरचे पहिले गाणे!
चाळीसच्या दशकाच्या अखेरीस किशोर कुमारने (Kishore Kumar) हिंदी सिनेमा सृष्टीत पाऊल टाकले. याच काळात अनेक नामवंत कलाकार चित्रपटसृष्टीत आले. किशोर कुमारला पार्श्वगायक म्हणून पन्नास आणि साठच्या दशकात अनेक गाणी गायला मिळाली पण त्याला खरी आयडेंटिटी मिळाली साठच्या दशकाच्या उत्तरार्धात ‘आराधना’ नंतरच! चाळीसच्या दशकाच्या अखेरीस राज कपूरच्या आर के फिल्म स्थापना झाली. पण या आर के फिल्म्स मध्ये किशोर कुमारला पहिल्यांदा गाणे गायला मिळाले १९७१ साली आलेल्या ‘कल आज और कल’ या चित्रपटात! म्हणजे चित्रपट सृष्टीत आल्यानंतर तब्बल २५ वर्षानंतर किशोर कुमारची एन्ट्री आर के फिल्म झाली! ती कशी झाली याचा एक इंटरेस्टिंग किस्सा आहे.
‘मेरा नाम जोकर’(१९७०) या चित्रपटाच्या अपयशानंतर राज कपूर पूर्णपणे हताश झाले होते. त्यावेळी त्यांचे मोठे सुपुत्र रणधीर कपूर यांनी आर के फिल्मचा पुढचा चित्रपट दिग्दर्शित करायचे ठरवले. चित्रपटाचे नाव होते ‘कल आज और कल’ यामध्ये कपूर कुटुंबातील तीन पिढ्या काम करणार होत्या. पृथ्वीराज कपूर, राज कपूर आणि रणधीर कपूर. या चित्रपटाचे संगीत आर के चे नेहमीचे संगीतकार शंकर जयकिशन यांचे होते. चित्रपटातील गाणी कोणी गायची यावर चर्चा सुरू झाली. आर के फिल्मचा नायक नवीन त्यामुळे गायक देखील नवीन असावा यावर सर्वांचे एकमत झाले. (Kishore Kumar)
तेव्हा किशोर कुमार (Kishore Kumar) याचा जबरदस्त कम बॅक झाला होता. त्यामुळे ‘कल आज और कल’ या चित्रपटातील नायकावर चित्रित होणारी सर्व गाणी किशोर कुमार यांनी गावी असे ठरले. रणधीर कपूर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होता. त्याने संगीतकार शंकर जयकिशन यांना लवकरात लवकर गाणी बनवायला सांगितले. त्या पद्धतीने हसरत जयपुरी आणि शंकर यांनी म्युझिक सिटींग झाली. या मिटिंग ला राज कपूर आणि रणधीर कपूर देखील होते. गाण्याच्या जागा आणि सिचुएशन फायनल झाले. ते दोघे घरी पोहोचेपर्यंत शंकर यांचा फोन आला आणि त्यांनी आपण पहिले गाणे तयार केले आहे ते ऐकायला संध्याकाळी या असे सांगितले. रणधीरला खूप आश्चर्य वाटले. कारण तासाभरात गाणे कसे काय तयार होऊ शकते? याचे त्याला आश्चर्य वाटले. त्यांनी राज कपूर यांच्याकडे याबाबत विचारणा केली तेव्हा राज कपूर फक्त हसले!
संध्याकाळी राजकपूर आणि रणधीर कपूर शंकर यांच्याकडे गेले. शंकर यांनी लगेच ‘रंगीन फुलो का गुंचा है मेरा दिल कबसे संभाले रखा है दिल’ या गाण्याचे बोल ऐकवले. रणधीर कपूर यांना ते शब्द खूप आवडले. राज कपूर यांनी फक्त सुरुवातीची ‘रंगीन फुलो का गुंचा है मेरा दिल’ हे शब्द बदलायला सांगितले. हसरत जयपुरी यांनी लगेच तिथल्या तिथे ‘भंवरे की गुंजनहै मेरा दिल’ हे शब्द टाकले. या सिनेमाचे हे पहिले गाणे होते. सिनेमाचा मुहूर्त याच गाण्याने होणार होता. याच मिटींगला ताबडतोब किशोर कुमार यांना देखील बोलावले. राजकपूर यांच्या आर के फिल्मस मध्ये गाणं गायला मिळते आहे हा किशोर कुमार यांना मोठा गौरव वाटला. राज कपूरने मोठ्या जोशात त्यांचे स्वागत केले. आणि किशोर कुमारला एक विनंती केली, ”आर के फिल्म मध्ये तुमचे स्वागत आहे. माझी एकच विनंती आहे. या गाण्यात तुम्ही तुमच्या यॉडेलिंग उपयोग करा!” संगीतकार शंकर आणि हसरत जयपुरी म्हणाले, ”यात यॉडेलिंगची तशी कुठेच जागा नाहीए, जिथे किशोर कुमारला यॉडेलिंग वापरता येईल!” त्यावर किशोर कुमार (Kishore Kumar) म्हणाला, ”ते माझ्यावर सोडा. मी बरोबर तशी जागा क्रिएट करेन!”
========
हे देखील वाचा : लता दीदी आणि दिलीप यांची ‘ही’ भेट ठरली शेवटची
========
दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंगच्या वेळेला किशोर कुमारने (Kishore Kumar) गाणे संपवताना त्यातील शेवटची ओळ पूर्ण न गाता यॉडेलिंगच्या स्वरूपात ती ओळ आणि ते गाणे पूर्ण केले! आणि ते इतके अप्रतिम झाले की राजकपूर यांनी किशोर कुमार यांना मिठी मारून सांगितले, ”तुमच्या इतके सुंदर गाणे दुसरे कोणीच गाऊ शकले नसते!” ‘कल आज और कल’ या चित्रपटात किशोर कुमार यांनी चार गाणी गायली होती. मुकेश आणि मन्नाडे यांना एक गाणे होते. लता मंगेशकर यांनी या चित्रपटात एकही गाणे गायले नव्हते. ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटात देखील लताचे एकही गाणी नव्हते. यातील सर्व गाणी आशा भोसले यांनी गायली होती. किशोर कुमारने राजकपूरच्या विनंतीला मान देऊन या गाण्यात आपली यॉडेलिंग वापरले.
पण या नंतर आर के फिल्म मध्ये किशोर कुमार (Kishore Kumar) यांचा आवाज फक्त ‘बीवी ओ बीवी’ (१९८०) या चित्रपटातच वापरला गेला. ते काहीही असो; पण रणधीर कपूर यांनी मात्र आयुष्यभर किशोर कुमार यांचाच स्वर वापरला. त्यांच्या २८ चित्रपटात तब्बल ५५ गाणी किशोर कुमार यांनी गायलेली आहेत!