Jar Tar Chi Gosht: ‘जर तर ची गोष्ट’च्या शंभरी निमित्त प्रिया बापटच्या आवाजातील गाणे प्रदर्शित
आजवर ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. प्रत्येकवेळी नाट्यगृहाबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला. नाट्यरसिकांच्या या प्रेमामुळेच हे नाटक आता ‘शंभरी’ साजरी करतेय. नुकताच या नाटकाचा शतक महोत्सव साजरा झाला आणि दुग्धशर्करा योग म्हणजे या नाटकातील गाणेही प्रदर्शित झाले आहे. प्रिया बापटच्या आवाजातील हे सुंदर गीत नात्यातील गुपित दर्शवणारे असून संगीतप्रेमींना हे गाणे आता कुठेही ऐकता येईल.(Jar Tar Chi Gosht)
प्रिया बापट आणि उमेश कामत हे इंडस्ट्रीतील क्यूट कपलपैकी एक आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकत्र पाहाण्याची त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. सुमारे एका दशकानंतर ही इच्छा ‘जर तर ची गोष्ट’च्या निमित्ताने पूर्ण झाली. पाहाता पाहाता आता या नाटकाने यशाचे शिखर गाठले आहे. सर्व वयोगटाला आवडेल. असे हे कौटुंबिक नाटक असल्याने प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकवर्ग या नाटकाला लाभत आहे आणि हीच या नाटकाची जमेची बाजू ठरत आहे. यात प्रिया बापट, उमेश कामत यांच्यासह आशुतोष गोखले, पल्लवी अजय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
कथा, दिग्दर्शन, कलाकार हे सगळे उत्तम जुळून आल्यानेच ही सर्वोत्कृष्ट कलाकृती आज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सोनल प्रोडक्शन निर्मित, प्रिया बापट सादर करत असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर, रणजित पाटील यांनी केले असून इरावती कर्णिक यांचे लेखन या नाटकाला लाभले आहे. नंदू कदम या नाटकाचे निर्माते आहेत.(Jar Tar Chi Gosht)
=================================
हे देखील वाचा:
=================================
या नाटकाबद्दल प्रिया बापट म्हणते, ‘ खरंतर हे सांगताना खरंच खूप आनंद होतोय की, आज आमच्या शंभराव्या प्रयोगचा टप्पा आम्ही गाठला आहे आणि इतर प्रयोगांप्रमाणे हा प्रयोगही हाऊसफुल्ल होता. एकाच वेळी मनात अनेक भावना आहेत. आनंद आहे, भारावले आहे, जबाबदारी आहे. या गोष्टी शब्दांत मांडणे अशक्यच. परंतु एक आवर्जून सांगेन, हा पल्ला गाठणे, रसिकप्रेक्षकांच्या प्रेमामुळेच शक्य झाले. तुमचे प्रेम आमच्यावर असेच राहू दे. या नाटकातील गाणेही प्रदर्शित झाले आहे. त्यामुळे ही डबल ट्रीट आहे.’’