दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
जेव्हा अलका याज्ञिक ए आर रहमान यांच्याकडे गायला चक्क नकार दिला!
भारतीय चित्रपट संगीतातील गोल्डन इरा मधील गाणी ऐकणारी जशी पिढी आहे तशीच नव्वदच्या दशकातील मेलडीयस गाणी ऐकणारी देखील एक नवीन पिढी आहे. नव्वदच्या दशकातील म्युझिक हे काही वेगळंच होतं. त्याची जादू जबरदस्त होती. मैने प्यार किया, कयामत से कयामत तक या चित्रपटापासून या दशकाच्या मेलडीयस युगाला प्रारंभ झाला. या दशकाची अनभिषिक्त सम्राज्ञी होती गायिका अलका याज्ञीक(alka yagnik). या दशकात अलका प्रचंड गायली आणि अतिशय चांगली गाणी तिने या काळामध्ये गायली.
पण तुम्हाला माहिती आहे का? याच दशकात आलेल्या ए आर रहमान यांच्या ‘रोजा’ (१९९३) या चित्रपटातील गाणी गायला तिने चक्क नकार दिला होता! काय कारण होते? हा किस्सा नव्वदच्या दशकातील आहे. त्या काळात अलका याज्ञिक(alka yagnik) प्रचंड बिझी सिंगर होती. दिवसाला ती तीन-चार गाणी गात असायची. एकदा तिच्या घरी लँडलाईनवर मद्रासहून फोन आला आणि तिला दुसऱ्या दिवशी मद्रासला एका गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी बोलावले. फोन करणाऱ्याने मी ए आर रहमान यांच्या वतीने बोलतो आहे असे सांगितले. अलका याज्ञिकला ए आर रहमान माहीत असण्याची काहीच शक्यता नव्हती. कारण ए आर रहमान यांचा ‘रोजा’ हा पहिलाच सिनेमा होता.
अलकाला वाटलं कोणीतरी नवीन संगीतकार आहे म्हणून तिने सोडून दिले. संध्याकाळी कुमार सानू यांचा देखील तिला फोन आला त्यांना देखील मद्रासहून फोन आला होता. दोघे म्हणाले, ”कोणी तरी ए आर रहमान म्हणून नवीन मुलगा दिसतो आहे!” म्हणून त्यांनी चक्क दुर्लक्ष केले आणि तिकडे जायचे टाळले. ‘आम्ही येऊ शकत नाही’ असे देखील त्यांनी कळवून टाकले. नंतर वर्षभराने जेव्हा ‘रोजा’ चित्रपटाची गाणी बाहेर आली तेव्हा मात्र अलका याज्ञिकने (alka yagnik) कपाळाला हात लावला! एक फार मोठी संधी आपल्या हातून आपल्या चुकीमुळे गेली असं तिला वाटले.नंतर तिची ए आर रहमान यांची तिची भेट झाली तेव्हा ए आर रहमानने देखील तिला विचारले, ”तू माझ्या पहिल्याच चित्रपटात गायला नकार का दिला होता? त्यावेळी अलकाला ओशाळल्यासारखे झाले.
पण पुन्हा एकदा अशीच संधी तिच्याकडून चुकणार होती पण ती चुकली नाही. हा किस्सा १९९९ सालचा आहे. तेव्हा सुभाष घई यांच्या ‘ताल’ चित्रपटाला ए आर रहमान संगीत देत होते. तेव्हा सुद्धा चेन्नईहून अलकाच्या घरी फोन आला. फोन अलका याज्ञिकच्या(alka yagnik) आईने उचलला. त्यात सांगितले होते की आज रात्री मद्रासला रेकॉर्डिंगसाठी अलकाला यायचे आहे!” संध्याकाळी जेव्हा अलका घरी आली तेव्हा आईने तो निरोप दिला. त्यावेळी ती म्हणाली, ”मी कुठेही जाणार नाही. खूप थकले आहे. दिवसभर चार गाण्याचे रेकॉर्डिंग झाले आहे आणि आज माझी तब्येत पण बरी नाही.” अलकाच्या आईने तो निरोप सुभाष घई यांना पोहोचवला.
========
हे देखील वाचा : ‘खाई के पान बनारस वाला…’ हे गाणं ‘डॉन’ साठी लिहिलेलं नव्हतं?
========
सुभाष घई म्हणाले, ”अलकाला फोन द्या.” अलकाला(alka yagnik) ते म्हणाले, ”तू वेडी झालीस का? अगं माझ्या ‘ताल ‘ सिनेमातील एका महत्वाच्या टायटल सॉंगचे रेकोर्डिंग करायचे आहे. ताल सिनेमाचे टायटल सॉंग आहे. तू ताबडतोब इकडे ये!” अलकाला प्रसंगाचे महत्व कळले . ती लगेच फ्लाईटने चेन्नईला पोहोचली. रात्री अडीच वाजता गाण्याचे रेकॉर्डिंग सुरू झाले. ते गाणे होते ‘ताल से ताल मिला…..’ हे गाणे पुढे इतके लोकप्रिय झाले की हे गाणे तिचे सिग्नेचर सॉंग ठरले. या गाण्याला पुढे फिल्मफेअरचा पुरस्कार देखील मिळाला!
अलका याज्ञिक (alka yagnik) यांनी तब्बल २५ भाषांमधून २१ हजाराहून गाणी गायली आहेत. याची नोंद गिनीज ऑफ बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेतली आहे. त्यांनी गायलेल्या दोन गीतांना राष्ट्रीय पुरस्कार तर सात वेळेला फिल्म फेअर पुरस्कार त्यांना मिळाला आहे. ज्या दोन गाण्यांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ती गाणी होती घुंगट के आडसे दिलबर का (हम है राही प्यार के) आणि कुछ कुछ होता है (टायटल सॉंग) अलकाच्या ज्या सात गाण्यांसाठी तिला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता ती गाणी होती एक दो तीन (तेजाब) चोली के पीछे क्या है (खलनायक) जरा तस्वीर से तू निकल के सामने आ (परदेस) ताल से ताल मिला (ताल) दिल ने ये कहां है दिल से (धडकन) ओ री छोरी (लगान) हम तुम (हम तुम)