दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
अभिनयात अव्वल मात्र कथानकाच्या बाबतीत सुमार असा ‘जुनं फर्निचर’
Juna Furniture Review: ९० च्या दशकानंतर हळूहळू ‘न्यूक्लियर फॅमिली सिस्टम’ म्हणजेच विभक्त कुटुंबपद्धती ही सगळ्यांच्याच अंगवळणी पडली आणि मग मुलगा लग्नानंतर आई वडिलांपासून वेगळा राहू लागला. त्यामागची कारणं वेगवेगळी असतीलही कदाचित, पण या सगळ्यात होरपळून निघाले ते वयोमानाने थकणारे आई-वडील.
यातूनच ज्येष्ठ नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण व्हायला सुरुवात झाली. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे नुकतंच या समस्येवर भाष्य करणारा ‘जुनं फर्निचर’ (Juna Furniture Review) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. खरंतर या विषयावर याआधीसुद्धा मराठी विश्वात बरेच चित्रपट येऊन गेले आहेत.
अगदी ‘तू तिथं मी‘पासून आणि ‘बापजन्म‘सारख्या पाथब्रेकिंग सिनेमांनी हा मुद्दा अगदी उत्तमरीत्या हाताळला, पण महेश मांजरेकर हे मात्र या चित्रपटाला आणि खासकरून या विषयाला न्याय देण्यात कुठेतरी कमी पडले आहेत असं वाटत राहतं.चित्रपट अगदीच टाकाऊ आहे का? तर नाही. मांजरेकरांनी चित्रपट प्रेक्षकाला खिळवून ठेवणाराच बनवला आहे, पण तरी काही बाबतीत मात्र तो खेचलेला जाणवतो हे मात्र निश्चित. (Juna Furniture Review)
सत्तरीमधील एक वयोवृद्ध जोडपं गोविंद पाठक (महेश मांजरेकर) आणि त्यांची पत्नी सुहास पाठक (मेधा मांजरेकर) जे बोरिवलीच्या एका छोट्याशा घरात रहात असतं. त्यांचा मुलगा IAS अधिकारी अभय पाठक (भूषण प्रधान) हा त्याची पत्नी अवनी (अनुषा दांडेकर)सह वेगळा राहत असतो पण त्याचे सासरे म्हणजेच अवनीचे वडील (समीर धर्माधिकारी) यांचा त्याच्यावर वरदहस्त असतो. आपल्या आई-वडिलांना अभय दरमहा काही पैसे देत असतो आणि आपल्या वडिलांचं बँक अकाऊंटही तोच हाताळत असतो. त्यांच्याच भविष्यासाठी अभय त्यांच्या पैशांची योग्य ती गुंतवणूक करत असतो. पण कामाच्या व्यापात अडकलेल्या अभयकडे आई-वडिलांसाठी वेळ नसतो. या गोष्टीवरुनच पुढे त्यांच्यामध्ये कुरबुरी वाढतात. (Juna Furniture Review)
एकेदिवशी सुहासची तब्येत बिघडल्याने गोविंद तिला रुग्णालयात घेऊन जातात पण इलाजासाठी भरावे लागणारी डीपॉझीटची रक्कम मात्र त्यांच्याकडे नसते. यामुळे तिथेच रुग्णालयातच गोविंद यांची पत्नी सुहास शेवटचा श्वास घेते. जेव्हा मुलगा अभयला दुसऱ्या दिवशी पैसे द्यायला घरी येतो आणि त्याला झालेल्या प्रकाराबाबत समजतं तेव्हा तो हैराण होतो आणि इथूनच बाप आणि मुलामधला एक वेगळाच संघर्ष सुरू होतो. (Juna Furniture Review)
गोविंद पाठक हे आपल्या मुलाला कोर्टात खेचतात आणि एक भली मोठी रक्कम नुकसान भरपाई म्हणून मागतात. आता नुकसान भरपाई त्यांना मिळते का? आईचा खून केल्याचा आरोपाखाली मुलाला शिक्षा होते का? हे करण्यामागे गोविंद पाठक यांचा नेमका हेतू काय असतो? ही केस ते जिंकतात की नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढे चित्रपट पाहताना मिळतात. (Juna Furniture Review)
चित्रपटाची (Juna Furniture Review) कथा ही वरवर जरी साधी आणि ड्रमॅटिक वाटत असली तरी त्यात वेगवेगळ्या गोष्टी मांजरेकर यांनी कव्हर केल्या आहेत. विभक्त कुटुंबपद्धती, मानवी नातेसंबंध, इंटरनेट आणि मोबाइलमुळे कुटुंबातील संपलेला संवाद, आई-वडील आणि मुलांच्या नात्यात आलेला दुरावा, पैशांच्या मागे धावणारा महत्वाकांक्षी तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, सरकारी यंत्रणांनी त्यांच्याकडे केलेला कानाडोळा अशा वेगवेगळ्या विषयांवर मांजरेकरांनी कथा आणि पटकथेच्या माध्यमातून उत्तमरित्या भाष्य केलं आहे. पण अत्यंत प्रेडीक्टेबल कथानक असल्याने आणि ट्रेलरमध्येच बऱ्याच गोष्टी सांगितल्याने प्रेक्षकांचा हिरमोड होण्याची शक्यता अधिक आहे.
===
हेदेखील वाचा : एका चुंबनाभोवती फिरणारा खुसखुशीत चित्रपट
===
तसं पाहायला गेलं तर मध्यंतरानंतर एक ट्विस्ट येतो खरा, पण तरी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंट कोळून प्यायलेला आजचा प्रेक्षक अगदी सहजरीत्या हा ट्विस्ट प्रेडीक्ट करू शकतो. चित्रपटातील काही सीन्स हे फारच खेचलेले आणि अनावश्य होते जे कमी केले असते तर कदाचित चित्रपट आणखी प्रभावी झाला असता. (Juna Furniture Review)
संवादाच्या बाबतीतही फारशी कमाल हा चित्रपट करत नाही, कोर्टातील काही सीन्समध्ये मांजरेकर यांची डायलॉगबाजी भाव खाऊन जाते पण असे काही मोजके सीन्स सोडले तर फारसे लक्षात राहतील किंवा काळजाला भिडतील असे संवाद यात नाहीत. (Juna Furniture Review)
अभिनयाच्या बाबतीत मात्र हा चित्रपट तुम्हाला खिळवून ठेवतो. महेश मांजरेकर यांनी साकारलेले गोविंद पाठक हे तुम्हाला भिडतात. कदाचित या चित्रपटात मांजरेकर हे केवळ अभिनेता म्हणून दिसले असते तर कदाचित एक वेगळच कथानक आपल्याला पाहायला मिळाला असतं. (Juna Furniture Review)
कोर्टातील मांजरेकरांचे काही सीन्स अक्षरशः अंगावर काटा आणणारे आहेत, खासकरून मध्यंतरानंतर चित्रपटातील मांजरेकर यांचा अभिनयच प्रेक्षकांना बांधून ठेवतो. चित्रपटात येणार ट्विस्ट आणि एकूणच नंतरचं कथानक हे फारच प्रेडीक्टेबल आणि काहीसं बालिश आहे. (Juna Furniture Review)
मेधा मांजरेकर यांना यात फारसा स्क्रीन प्रेझेंस नसल्याने त्यांना दिलेली भूमिका त्यांनी चोख बजावली आहे. अनुषा दांडेकरचा वावर आणि संवादफेक मात्र कथानकाचे गांभीर्य घालवतो. बाकी शिवाजी साटम, सचिन खेडेकर, डॉ. गिरीश ओक, शरद पोंक्षे, विजय निकम यांची कामं अपेक्षेप्रमाणे चांगली झाली आहेत. ‘अॅनिमल’पासून भाईच्या भूमिकेत सातत्याने दिसणाऱ्या उपेंद्र लिमयेचं कामंही चांगलं झालं आहे.
बाकी शिवाजी साटम, सचिन खेडेकर, डॉ. गिरीश ओक, शरद पोंक्षे, विजय निकम यांची कामं अपेक्षेप्रमाणे चांगली झाली आहेत. ‘अॅनिमल’पासून भाईच्या भूमिकेत सतत दिसणाऱ्या उपेंद्र लिमयेचं कामंही चांगलं झालं आहे. कदाचित ‘अॅनिमल’मुळे त्याच्याही कामात तोचतोचपणा जाणवू शकतो. (Juna Furniture Review)
‘जुनं फर्निचर’ (Juna Furniture Review) हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांची समस्या एका मनोरंजक आणि प्रभावी पद्धतीने लोकांसमोर मांडतो खरी. पण कथा, संवाद आणि सादरीकरणाच्या बाबतीत मात्र हा चित्रपट ‘जुनाच’ वाटतो. महेश मांजरेकर यांचा दमदार अभिनय आणि काही हृदयाला भिडणारे मोजके संवाद सोडले तर मांजरकरांच्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांनी फार अपेक्षा न ठेवलेल्याच बऱ्या.
ज्यांना फॅमिली ड्रामा पाहायला आवडतात त्यांनी हा चित्रपट एकदा पाहायला काहीच हरकत नाही, पण माजरेकरांच्या सिनेमांचे आणि दिग्दर्शनाचे चाहते असाल तर त्यांनीच काढलेला हिंदीतला अमिताभ बच्चन, शर्मिला टागोर, जॉन अब्राहम यांचा ‘विरुद्ध‘ किंवा अशाच नातेसंबंधावर बेतलेला त्यांचा मराठी सिनेमा ‘मातीच्या चुली‘ हे चित्रपट पुन्हा पहावेत. त्यांच्या या दोन कलाकृतींच्या मानाने ‘जुनं फर्निचर’ (Juna Furniture Review) हा तसा सुमार चित्रपटच म्हणावा लागेल.
– अखिलेश विवेक नेरलेकर
चित्रपट: जुनं फर्निचर
कलाकार : महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनूषा दांडेकर, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, उपेंद्र लिमये
निर्माते: यतीन जाधव, महेश मांजरेकर
संगीत: एस.आर.एम. अलीन, डी. एच. हरमनी, हितेश मोडक
कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन : महेश मांजरेकर
रेटिंग: ३ स्टार