‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
जेव्हा माधुरी दीक्षित आणि ऋषी कपूर पुणे स्टेशनवर बुरखा घालून अवतरले!
बॉलीवूडच्या कलावंतांची लोकप्रियता प्रचंड असते. रसिक वेड्यासारखे त्यांच्यावर प्रेम करीत असतात. मात्र त्यामुळे कधी कधी त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. असाच प्रसंग एकदा अभिनेता ऋषी कपूर(rishi kapoor) आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना आला होता. त्यांना चक्क बुरखा घालून रेल्वे स्टेशनवर जावे लागले होते! आपले रसिक चाहते आपल्याला ओळखणार नाहीत आणि त्यांच्या गर्दीतून आपण सही सलामत ट्रेनमध्ये पोहोचू असे त्यांना वाटले होते. म्हणून त्यांनी दोघांनी बुरखा घालून पुणे स्टेशनवर एन्ट्री केली पण पुढे मात्र फजिती झाली! खूप फनी इन्सिडन्स आहे; जो माधुरी दीक्षितने ऋषी कपूर यांच्या निधनानंतर ट्विट करून सांगितला होता. नक्की काय झालं होतं त्यावेळी? आणि कोणत्या चित्रपटाच्या वेळी झाला होता?
अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अभिनेता ऋषी कपूर(rishi kapoor) हे तसे फक्त तीन चित्रपटात एकत्र आले होते. १९९३ साली ‘साहिबान‘ नावाच्या चित्रपटात हे दोघे पहिल्यांदा एकत्र आले. या दोघांचा पहिला चित्रपट ‘साहिबान’ हा रमेश तलवार यांनी दिग्दर्शित केला होता. सिनेमाची संपूर्ण टीम यश चोप्रा यांचीच होती. चित्रपटाला संगीत शिवहरी यांनी दिले होते. यात संजय दत्त याची देखील प्रमुख भूमिका होती. हिमालयाच्या पार्श्वभूमीवरील ही प्रणयी त्रिकोणाची कथा प्रेक्षकांनी मात्र साफ अव्हेरली.
त्यानंतर ‘याराना’ (१९९६) या चित्रपटात या दोघांनी एकत्र स्क्रीन शेअर केला आणि त्यानंतर शेवटचा चित्रपट ‘प्रेमग्रंथ’ (१९९६) हा चित्रपट राजीव कपूर यांनी दिग्दर्शित केला होता. या तीन चित्रपटात हे दोघे एकत्र आले. या दोघांचा यातील कुठलाही चित्रपट फारसा यशस्वी झाला नाही पण या दोघांची पडद्यावरची केमिस्ट्री खूप चांगली रंगली होती. विशेषता ‘प्रेमग्रंथ’ हा चित्रपट खरोखर उत्तम बनला होता पण प्रेक्षकांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. आता येऊ मूळ किस्स्याकडे.
दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी माधुरी आणि ऋषी कपूरला(rishi kapoor) घेऊन ‘याराना’ (१९९५) हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग हैदराबादला रामोजी फिल्म सिटीमध्ये झाले. माधुरी आणि ऋषी हे त्या काळातले बिझी स्टार होते. काही कारणाने हैदराबादला जाणारे त्यांचे फ्लाईट कॅन्सल झाले आणि त्यांनी पुण्याहून ट्रेनने हैदराबादला जाण्याचा निर्णय घेतला. पण पुणे रेल्वे स्टेशनवर खचाखच भरलेल्या गर्दीतून कसे जायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे पडला. कारण दोन दोन सेलिब्रिटी ते देखील रेल्वे स्टेशनवर म्हणल्यावर लोक गडबड करतील याची त्यांना जाणीव होते. म्हणून त्यांनी एक आयडिया केली.
त्या दोघांनीही काळा बुरखा घातला आणि स्टेशनवर एन्ट्री केली! त्यांच्या सिक्युरिटीतील लोक सिव्हिल ड्रेस मध्ये त्यांना फॉलो करत होतेच. संध्याकाळी पाचची वेळ. पुणे रेल्वे स्टेशन खचाखच भरले होते. सुदैवाने एक नंबर प्लॅटफॉर्मवर गाडी येणार होती. हे दोघे बरोब्बर गाडी येण्याच्या वेळी प्लॅटफॉर्मवर गेले. लोकांची तोबा गर्दी होती. फर्स्ट क्लासच्या डब्याकडे लगबगी ने जावू लागले पण थोडी गडबड झाली आणि ऋषी कपूरचा(rishi kapoor) बुरखा निसटला! आणि त्याचे बिंग फुटले!!!
======
हे देखील वाचा :
======
लोकांनी लगेच ऋषी कपूर, चिंटू चिंटूsss म्हणून ओरडायला सुरुवात केली. ताबडतोब त्यांच्या सिक्युरिटीने त्यांच्या भोवती सुरक्षेचे कडे केले आणि त्यांना पटकन डब्यात घुसवले. आणि त्यांच्या कुपेमध्ये नेऊन पोहोचवले. ऋषी कपूर(rishi kapoor) यांनी नंतर एका मुलाखतीत सांगितले “माधुरी आणि ऋषी कपूर(rishi kapoor) हे दोघे ट्रेनमध्ये आहेत ही बातमी पसरायला वेळ लागला नाही. तरी नशीब त्या वेळेला मोबाईल नव्हते. पण प्रत्येक स्टेशनवर लोक फर्स्ट क्लासच्या डब्याच्या भोवती चकरा घालत होते. त्यांच्या नावाने जोरजोराने आवाज देत होते!”
दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस बंदोबस्तात ते ट्रेनमधून बाहेर पडले आणि शूटिंगच्या ठिकाणी गेले. माधुरी दीक्षित यांनी ऋषी कपूरच्या(rishi kapoor) हा बुरखाहरणाचा किस्सा हसून हसून संपूर्ण शूटिंगच्या दरम्यान सांगितला! ऋषी कपूर गेल्यानंतर देखील माधुरीने एका चॅनेलशी बोलताना हा किस्सा शेअर केला होता.