‘झपाटलेला ३’मध्ये पुन्हा दिसणार महेश-लक्ष्या यांची जोडी?
भयपट म्हणजेच हॉरर चित्रपट हा भारतीय मनोरंजनविश्वातील तसा बराच दुर्लक्षित आणि अंडररेटेड असा जॉनर आहे. हॉलिवूडमध्ये या जॉनरचे जेवढे चित्रपट आलेत त्यांच्या तुलनेत भारतात अगदी हातावर मोजता येतील इतकेच हॉरर चित्रपट आले.
हिंदीत रामसे बंधुपासून राम गोपाल वर्मा पर्यंतच्या कित्येक दिग्दर्शकांनी उत्तम असे भयपट दिले आहेत. मराठीत मात्र सध्या काही प्रयोग होत असले तरी फारसे दिग्दर्शक कुणी या सिनेमांच्या वाट्याला गेल्याचं पाहायला मिळत नाही.
परंतु एक मराठी दिग्दर्शक आहेत ज्यांनी हॉरर आणि कॉमेडी यांची योग्य सांगड घालून प्रेक्षकांना एक उत्तम भयपट दिला ते म्हणजे महेश कोठारे.
‘झपाटलेला‘ (Zapatlela 3) आणि ‘पछाडलेला‘ या दोन चित्रपटांच्या माध्यमातून महेश कोठारे यांनी मराठीला अविस्मरणीय असे भयपट दिले. पण त्यांच्यानंतर मात्र कुणीच याकडे फार लक्ष दिलं नाही. एक्का दुक्का चित्रपट आलेही असतील कदाचित पण महेश कोठारे यांना जेवढं यश मिळालं तितकं यश इतर दिग्दर्शकांच्या नशिबी नव्हतं.
१९९३ मध्ये आलेल्या ‘झपाटलेला‘ (Zapatlela 3) या चित्रपटाने एक वेगळाच इतिहास रचला होता. यातील तात्या विंचू नामक बाहुला इतका लोकप्रिय झाला की त्याने कित्येकांची झोप उडवली. अगदी हिंदी चित्रपटसृष्टीलाही या चित्रपटाने भुरळ घातली.
चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांची जोडी सुपरहीट ठरली. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या फिल्मी करियरमधला हा एक अत्यंत महत्त्वाचा चित्रपट ठरला. आता तब्बल ३० वर्षांनी पुन्हा एकदा महेश कोठारे आणि लक्ष्या यांची ही जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. (Zapatlela 3)
हो हो! अगदी बरोबर वाचलत. ही अजरामर जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे, निमित्त आहे २०२५ मध्ये येणारा ‘झपाटलेला ३‘ (Zapatlela 3) हा महेश कोठारे यांचा आगामी चित्रपट. नुकतंच महेश कोठारे यांनी त्यांचा सुपुत्र आदिनाथ कोठारेबरोबर ‘झपाटलेला ३’ या चित्रपटाची घोषणा करत याचे पहिले पोस्टरही प्रदर्शित केले.
तेव्हापासूनच या तिसऱ्या भागासाठी प्रेक्षक फार उत्सुक असल्याचं समोर आलं आहे. यावेळी सगळ्यांनाच लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण आली. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे दिसणार असल्याचं नुकतंच समोर आलं आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून पुन्हा रीक्रिएट करण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. खुद्द दिग्दर्शक महेश कोठारे यांनी याबद्दल खुलासा केला आहे. नुकतंच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये महेश कोठारे यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. (Zapatlela 3)
ते म्हणाले, “लक्ष्या माझा जिवलग मित्र होता आणि अजूनही आहे. तो आजही माझ्याबरोबर आहे आणि तो मला सतत मार्गदर्शन करतोय असं मला वाटतं. मला त्याच्याबरोबर पुन्हा काम करायची इच्छा आहे. AI चा वापर करून मला लक्ष्याला पुन्हा क्रिएट करायचं आहे आणि मी ते करणार. मी त्याला पुन्हा स्क्रीनवर आणणार. महेश-लक्ष्या ही जोडी पुन्हा पाहायला मिळणार.”
महेश कोठारे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांच्या आगामी ‘झपाटलेला ३’ (Zapatlela 3)मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे AI च्या माध्यमातून पाहायला मिळणार का? असा प्रश्न कित्येक चाहत्यांना पडला आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून या तिसऱ्या भागात लक्ष्याचे पात्र पुन्हा क्रिएट करण्यासाठी त्यांची संपूर्ण टीम प्रचंड धडपड करत असल्याचंही महेश कोठारे यांनी सांगितलं.
इतकंच नव्हे तर या चित्रपटात तात्या विंचूचे AI रूपही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटाशी निगडीत काही कामासाठी महेश कोठारे आता ऑस्ट्रेलियामध्ये जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
२०१३ मध्ये महेश कोठारे यांनी ‘झपाटलेला २‘ हा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणला होता. परंतु त्याला प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद दिला नव्हता. या चित्रपटातही आदिनाथ कोठारे, महेश कोठारे, सोनाली कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर यांच्यासारखे दिग्गज कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये होते.
दुसऱ्या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने बनणाऱ्या या तिसऱ्या भागासाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत आणि यात महेश-लक्ष्या ही जोडी पुन्हा दिसणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे. (Zapatlela 3)