ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
‘मानाचि’ संघटनेचा ९ वा वर्धापनदिन दिमाखात संपन्न
‘हा माझा नाही, माझ्यातल्या सरस्वतीच्या अंशाचा सन्मान ! ’असं ज्येष्ठ नाटककार आदरणीय श्री. सुरेश खरे, आपल्या लेखन कारकीर्द सन्मानाला उत्तर देताना म्हणाले ‘लेखकांनी.. लेखकांची.. लेखकांसाठी..’ स्थापन केलेल्या मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘लेखक सन्मान संध्या’ सोहळ्यात ते बोलत होते. गतवर्षीचे कारकीर्द सन्मान विजेते ज्येष्ठ नाटककार श्री. गंगाराम गवाणकर, अॅड-गुरू श्री. भरत दाभोळकर, मानाचिचे अध्यक्ष श्री. विवेक आपटे आणि श्री. पुरुषोत्तम बेर्डे यांनी श्री. सुरेश खरे यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला. हा सोहळा दिनांक ६ मे २०२४ रोजी संध्याकाळी, मुंबईतल्या शिवाजी मंदिर नाट्यगृहात मोठ्या दिमाखात पार पडला. श्री. गंगाराम गवाणकर, सुरेश खरे यांच्या सन्मानार्थ म्हणाले की, ‘माझ्या कारकीर्दीला सुरेश खऱ्यांच्या नाटकाचा बॅकस्टेज वर्कर म्हणून सुरूवात झाली. पुढे सुरेश खरे आणि मी दोघंही नाट्यसंमेलनाचे अध्यक्षही झालो आणि मानाचिच्या लेखन कारकीर्द सन्मानाचे मानकरीही झालो.’(Manachi Lekhak Sanghatana Vardhapan Din)
या सन्मान संध्येत, मालिका, नाटक, चित्रपटांच्या प्रशंसनीय लेखनासाठी श्री. राकेश सारंग, श्री.अनिल पवार, सौ. अदिती मारणकर, श्री. कौस्तुभ देशपांडे, श्री. स्वप्निल जाधव, श्री. सचिन जाधव, श्री. क्षितिज पटवर्धन, श्री. नितीन सुपेकर यांचा सन्मान करण्यात आला. त्या बरोबरच अन्य क्षेत्रातल्या प्रशंसनीय लेखनाबद्दल, नाट्यसमीक्षक श्री. रवींद्र पाथरे, गेली पंचवीसहून अधिक वर्ष, ‘अर्थ आणि बँकिंग’ सदर लिहिणारे श्री.राजीव जोशी, गणेशोत्सव देखाव्यांच्या लेखनासाठी श्री.विजय कदम यांनाही सन्मानित करण्यात आलं. मानाचिच्या वाटचालीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री. गणेश गारगोटे आणि श्री. उमेश ओमाशे यांचाही सन्मान करण्यात आला. श्री. आशिष पाथरे यांच्या खुसखुशीत निवेदनानं ही सन्मान संध्या रंगली.
त्या पूर्वी, मानाचि लेखक संघटनेनं आयोजित केलेल्या उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पाच एकांकिकांचं सादरीकरण झालं. नवीन लेखकांना प्रोत्साहन मिळावं, नवनवीन लेखक लिहिते व्हावेत या उद्देशाने मानाचि गेली नऊ वर्ष विविध शिबिरं, परिसंवाद, आणि मार्गदर्शक चर्चासत्रांचे आयोजन करत आली आहे. त्याच उद्देशाने यंदा उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रभरातून १४ संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
===========================
हे देखील वाचा: ‘जय जय शनिदेव’ मालिकेच्या कलाकारांनी घेतले शनी शिंगणापूर येथे शनिदेवाचे दर्शन
===========================
अंतिम फेरीत संहिता क्रिएशन्स मुंबईच्या, ‘१४ इंचाचा वनवास’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत लेखन, दिग्दर्शन, अभिनेता, संगीत व सर्वोत्कृष्ट कथाविस्तार या पारितोषिकांवर मोहर उमटवली. तर बीएमसीसी पुणे यांनी सादर केलेल्या ‘A tale of Two’ या एकांकिकेने दुसरा क्रमांक पटकावत, लेखन, दिग्दर्शन, प्रकाश योजना, नेपथ्य, रंगभूषा अशी पारितोषिकं पटकावली.