रफीच्या स्वराचा वारसदार शब्बीर कुमार गेला कुठे?
३१ जुलै १९८० या दिवशी भारतीय चित्रपट संगीतातील बेताज बादशाह मोहम्मद रफी यांचे निधन झाले. रफीचे जाणे सर्वांसाठी इतके अनपेक्षित होते की संपूर्ण चित्रपट सृष्टी हादरून गेली कारण रफीला नजरेसमोर ठेवून अनेक संगीतकारांनी आपल्या रचना तयार करून ठेवल्या होत्या त्याचे काय करायचे? त्यानंतर मग रफीसारखे गाणारे खूप जण या इंडस्ट्रीमध्ये येवू लागले. यातच एक जण होता शब्बीर कुमार(Shabbir Kumar).
२६ ऑक्टोबर १९५४ या दिवशी जन्मलेले शब्बीर कुमार (Shabbir Kumar) हे रफीचे डाय हार्ड फॅन होते. लहानपणापासून फक्त आणि फक्त रफीचे गाणे ते गात होते. पुढे बडोद्यामध्ये अनेक ऑर्केस्ट्रामधून ते रफीची गाणी गाऊ लागले. पुण्याच्या मेलडी मेकर्स या ऑर्केस्ट्रा मधून त्यांनी रफीची गाणी गायली आणि त्यांचा आवाज देशभर पसरला. रफी यांच्या निधनानंतर ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले. संगीतकार उषा खन्ना यांनी पहिल्यांदा त्यांना तजुर्बा (१९८१) या चित्रपटात गायची संधी दिली. यानंतर मनमोहन देसाई यांच्या ‘कुली’ या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित सर्व गाणी शब्बीर कुमार यांनी गायली. हा त्यांच्यासाठी फार मोठा ब्रेक होता.
शब्बीर करीता हे सर्व स्वप्नवत होते. लता मंगेशकरसोबत गाणं हे त्यांचं आणखी एक स्वप्न होतं आणि ते पूर्ण झालं ‘बेताब’ या चित्रपटाच्या वेळी. म. रफीप्रमाणेच लताच्या स्वरांचे देखील ते भक्त होते. शब्बीर कुमार यांनी एका मुलाखतीत सांगितलं होत, ”बडोद्याला आमच्या घराच्या शेजारच्यांकडे रेकॉर्ड प्लेयर होता आणि त्यांच्याकडे लताची भरपूर गाणी दिवसभर वाजवली जायची. मी भिंतीला कान लावून यातील प्रत्येक गाणं मनात साठवून घ्यायचो.” ‘बेताब’ या चित्रपटाचे संगीत राहुल देव बर्मन यांनी दिले होते. त्यांनी शब्बीर कुमार (Shabbir Kumar) यांना कल्पना दिली की, ”उद्या तुला लता मंगेशकरसोबत ड्यूएट गायचे आहे.” त्या रात्री शब्बीर कुमार झोपू शकले नाही. तो प्रचंड नर्वस झाला होता. एवढी मोठी गायिका तिच्यासोबत गायचं? हे प्रचंड मोठं दडपण त्याच्यावर आले होते.
दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग सुरू झालं. लता मंगेशकर यांनी त्यांचा पोर्शन गायला पण शब्बीर कुमार (Shabbir Kumar) यांच्या तोंडातून शब्दच फुटेना. ते प्रचंड घाबरले, नर्वस झाले. सर्वांगाला घाम येऊ लागला. लता मंगेशकर यांनी गाण्याचे रेकॉर्डिंग थांबवले आणि शब्बीर कुमार यांच्यासाठी कॉफी मागवली आणि लता मंगेशकर त्याच्याशी अगदी मोकळेपणाने बोलू लागल्या. त्याची चौकशी केली. घरच्यांची चौकशी केली. त्याला धीर देत म्हणाल्या “काही काळजी करू नकोस तू बरोबर गात आहेस” लताच्या शब्दांनी त्याला धीर आला आणि लता मंगेशकर सोबतच पहिलं युगलगीत त्याने गायले. गाण्याचे बोल होते ‘बादल यूं गरजता है डर कुछ ऐसा लगता है….’ यानंतर मात्र भीतीचे मळभ दूर झाले आणि शब्बीर कुमार यांचा जमाना सुरू झाला.
========
हे देखील वाचा : …आणि संगीतकार खय्याम यांच्या ‘उमराव जान’च्या संगीताने इतिहास घडवला!
========
ऐंशीच्या दशकातील प्रत्येक नायकासाठी त्याने आपला स्वर दिला. अमिताभ बच्चनपासून चंकी पांडेपर्यंत! याच काळात शब्बीर कुमार यांना जुन्या जमान्यातील काही संगीतकारांसोबत देखील काम करण्याची संधी मिळाली त्यामध्ये संगीतकार नौशाद, चित्रगुप्त, आणि शंकर जय किशन यांचा समावेश होतो. शब्बीर कुमार (Shabbir Kumar) स्वतःला खूप भाग्यवान समजतो की “संगीताच्या दुनियेतील आजी आणि माजी दोन्ही संगीतकारांसोबत मला गाण्याची संधी मिळाली.”
या काळात शब्बीर कुमार यांची गाणी प्रचंड गाजली. याद तेरी आयेगी (एक जान ही हम), जिहाले मस्ती मुकून (गुलामी), प्यार किया नाही जाता हो जाता है (वो सात दिन),तुमसे मिलकर ना जाने क्यू (प्यार झुकता नही), गोरी है कलाईया (आज का अर्जुन), तुम याद न आया करो (जीने नही दुंगा) जिंदगी हर कदम एक नई जंग है (मेरी जंग) सोचना क्या है (घायल) ये मेरी जिंदगी (बेताब) नव्वदच्या दशकात मात्र संगीताने पुन्हा कात टाकली आणि नवीन खेळाडू मैदानात आले.शब्बीर कुमारने काळाची पावले ओळखत स्टेज शोकडे आपले लक्ष वेधले आणि जगभर त्यांनी रफीची आणि स्वतःची गाणी गाऊन रसिकांची दाद मिळवली!